केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे आज (१ एप्रिल) केरळच्या वायकोम सत्याग्रहाचा शताब्दी सोहळा साजरा करत आहेत. ३० मार्च १९२४ रोजी त्रावणकोर संस्थानातील वायकोम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. ज्याच्या परिणामस्वरुप नंतर देशभरात अशा प्रकारच्या आंदोलनांना सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला महाडचा सत्याग्रह आणि काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हे त्यानंतरचे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च १९२७ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे चवदाळ तळे आणि २ मार्च इ. स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळाराम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह केला होता.

स्वातंत्र्यपूर्व काळात संपूर्ण भारतात जातिभेद आणि अस्पृश्यता पाळली जात होती. पण त्रावणकोर संस्थानात जातीभेद अतिशय कठोरपणे पाळला जात होता. केरळमधील एझावा (Ezhava) आणि पुलायार (Pulaya or Pulayar) या जातींना अस्पृश्य मानले जात होते. उच्चवर्णीयांच्या घरासमोरून जाण्यास किंवा ते वापरत असलेल्या सार्वजनिक रस्त्यांचा वापर करण्यास या दोन जातींना मज्जाव होता. त्रावणकोर येथील मंदिरांमध्येही या जातींचा प्रवेश निशिद्ध होता. वायकोम सत्याग्रह हा याच असमानता आणि जुलमी प्रथेच्या विरोधात पुकारण्यात आला होता. त्या वेळी देशभरात ब्रिटिशांच्या विरोधात अहिंसेच्या मार्गाने आंदोलने सुरू होती. स्वातंत्र्याची चेतना अनेक भारतीयांना या आंदोलनासाठी प्रेरित करत होती. वायकोममध्येही या सत्याग्रहाचा आधार घेऊन आंदोलन करण्यात आले.

विसाव्या शतकातील त्रावणकोरचे सामाजिक संदर्भ

त्रावणकोर हे सरंजामशाही, स्वतःचे सैन्य असलेले आणि स्वयंघोषित क्रूर यंत्रणा राबविणारे संस्थान होते, असे सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ ए अयप्पन यांनी आपल्या “Social Revolution in a Kerala Village: A Study in Culture (1965)” या पुस्तकात लिहिले. भारतातील इतर प्रांतापेक्षा त्रावणकोर संस्थानात जातीव्यवस्था नवी नव्हती. मात्र त्याची अतिशय निर्दयी पद्धतीने अंमलबजावणी केली जात होती. त्याला एक सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त झाले होते. पोर्तृगीज पर्यटक डॉर्टे बारबोसा (Duarte Barbosa) यांनी आपल्या डायरीत नोंद केल्याप्रमाणे, त्रावणकोरमधील उच्चवर्णीय नायर लोक जर रस्त्याने चालत असतील आणि अस्पृश्य त्यांना आडवे गेले तर त्यांची काही खैर नसे. अनेक वेळा अस्पृश्यांना क्रूर शिक्षा केली जात असे.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस केरळमधील अनेक भागांमध्ये सामाजिक सुधारणांचे वारे वाहू लागले. ईस्ट इंडिया कंपनीने ख्रिश्चन मिशनरींना पाठिंबा दिला होता. त्यामुळे जातिव्यवस्थेत पिचलेल्या कनिष्ठ जातींचे धर्मांतर करण्यात मिशनरी यशस्वी होऊ लागल्या. त्यासोबतच ब्रिटिश शिक्षण घेतलेले आणि ब्रिटिशांचा दबावापुढे संस्थानाचा कारभार करणारे अनेक राजे-महाराजे आपल्या संस्थानात सामाजिक सुधारणा करत होते. त्रावणकोरचे महाराजा अयलाम थिरुमल याचे एक उदाहरण होते.

एझावा समुदायाचा उदय

दरम्यान, एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस एझावा समुदाय हा शिक्षणात पुढारलेला आणि संघटित अस्पृश्य समुदाय म्हणून पुढे येऊ लागला. राजकीय इतिहासकार मेरी एलिझाबेथ लिहितात की, गांधींनी दाखविलेल्या अहिंसेच्या लढ्यापासून प्रेरणा घेत दक्षिण भारतात अनेक ठिकाणी आंदोलने होत होती. १९२४-२५ दरम्यान झालेले वायकोम सत्याग्रह हे त्याचेच फलित होते. ब्रिटिशांनी सर्वांना शिक्षण खुले केल्यामुळे एझावा समुदाय शिक्षण घेऊन प्रगतीच्या नव्या वाटा शोधू लागला. सरकारी नोकऱ्यांसाठी एझावा समुदायाचे लोक पात्र ठरू लागले. शिक्षणाच्या अभावामुळे तोपर्यंत केवळ उच्चवर्णीय अशा नोकऱ्या पटकावत होते. १९१८ मधील ब्रिटिशांच्या अहवालानुसार महसूल विभागातील चार हजार पदांपैकी ३८०० पदांवर हिंदू धर्मातील विविध जातींचे लोक होते.

शिक्षण आणि नोकरी मिळाल्यामुळे एझावा समुदायात अभिजात वर्ग उदयास आला. तरीही समाजातील धार्मिक भेदभाव, जातिभेद कायम होता. या भेदभावाविरोधात त्यांच्या मनात असंतोष खदखदत होता. विसाव्या शतकाच्या सुरुवातील त्रावणकोर संस्थानातील काही मोजक्या लोकांकडे चारचाकी गाड्या होत्या. त्यापैकी एझावा समुदायातील अलूम्मोटील चन्नार हे एक होते. एझावांना अनेक सार्वजनिक रस्ते वापरण्यास बंदी होती. त्यामुळे चन्नार यांना आपल्या गाडीतून उतरून काही प्रसंगी रस्ता बदलून पायी जावे लागत असे.

शैक्षणिक, आर्थिक प्रगती साधूनही जातिव्यवस्थेचे चटके सोसावे लागत असल्यामुळे एझावा समुदाय आणि इतर मागासवर्गीय जातींमध्ये असंतोष खदखदत होता. या असंतोषात वायकोम आंदोलनाची बीजे पेरली गेली.

वायकोम सत्याग्रहाची ठिणगी पडली

वायकोम येथील मंदिरात प्रवेशाची पहिली ठिणगी १९१७ साली पडली. एझावा समुदायाचे नेते टीके माधवन यांनी आपल्या देशाभिमान या दैनिकात एक संपादकीय लिहून हा विषय मांडला. महात्मा गांधी यांच्या असहकार आंदोलनापासून प्रेरणा घेऊन टीके माधवन यांनी निषिद्ध असलेल्या रस्त्यांवरून चालायला सुरुवात केली. पण याची तीव्र प्रतिक्रिया संपूर्ण त्रावणकोर संस्थानात उमटली. उच्चवर्णीय जातींनी माधवन यांच्या कृतीच्या विरोधात आंदोलन केले. ज्यामुळे महाराजांना या सुधारणांवर बंदी आणावी लागली. तोपर्यंत ब्रिटिशांनीही धार्मिक आणि सामाजिक प्रश्नांत दखल देणे सुरू केले होते. सामाजिक सलोखा टिकावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, असा ब्रिटिशांचा विचार होता. ब्रिटिशांच्या या भूमिकेमुळे एझावांना आंदोलन करण्यासाठी आणखी बळ मिळाले.

१९२१ साली महात्मा गांधी दक्षिण भारतात आले असताना माधवन यांनी महात्मा गांधींना गाठून त्यांच्यासोबत मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाबाबत चर्चा केली. या चर्चेनंतर आंदोलनाला मूर्त स्वरूप प्राप्त व्हायला दोन वर्षांचा काळ लागला. १९२३ साली काकीनाड येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात केरळ प्रांत काँग्रेस कार्यकारिणीने अस्पृश्यता प्रथेविरोधात ठराव मांडला आणि त्याला मंजुरीदेखील मिळाली. यामुळे संपूर्ण दक्षिण भारतात मंदिर प्रवेश आणि सार्वजनिक रस्त्यांच्या वापराबाबत जनजागृती होण्यास सुरुवात झाली.

वायकोम या छोट्याशा शहरात प्राचीन शिवमंदिर आंदोलनासाठी निवडण्यात आले. या सत्याग्रह आंदोलनाचा उद्देश केवळ मंदिरात प्रवेश मिळावा इतकाच सीमित नव्हता. तर मंदिराच्या आसपासच्या रस्त्यांवर आणि शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरून वर्दळ करण्यास परवानगी मिळावी, या सत्याग्रहाचा मूळ उद्देश होता.

अखेर सत्याग्रह सुरू झाला

३० मार्च १९२४ च्या भल्या पहाटे, काँग्रेस आणि इतर सुधारणावादी विचारांचे नायर, एझावा आणि पुलाया समाजातील लोक पारंपरिक खादी वस्त्र परिधान करून, हातात हार-फुले घेऊन मंदिराच्या दिशेने चालू लागले. हजारो लोक यावेळी रस्त्यांवर उपस्थित होते. इतिहासकार रॉबिन जेफ्री यांनी लिहिले की, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काही लोकांची धरपकड करून आंदोलन विस्थापित केले. मात्र निरनिराळे आंदोलक हाच परिपाठ सुरू ठेवायचे. प्रत्येक सकाळी आंदोलकांवर कारवाई करून पोलीसही हतबल झाले होते. अखेर १० एप्रिल रोजी पोलिसांनी मंदिराच्या आसपासच्या परिसरात तटबंदी उभारून त्या भागात मनाई आदेश लागू केला.

एप्रिल ते सप्टेंबर या काळात पोलिसांनी बळाचा वापर करून परिसरात कडेकोट बंदोबस्त केला तरी आंदोलनाची धगधग दूरवर पसरली. आंदोलकांनी तटबंदीच्या समोर बसून उपोषण सुरू केले, देशभक्तिपर गाणी गात, घोषणाबाजी करत आंदोलनाचा माहौल तयार होत होता. त्या वेळच्या राष्ट्रीय माध्यमांनीही आंदोलनाची दखल घेतली. दक्षिणेतील क्रांतिकारी नेते पेरियार आणि सी. राजगोपालाचारी यांनीदेखील आंदोलनस्थळी भेट दिली. दुसरीकडे उच्चवर्णीय हिंदू या आंदोलनाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरत, ज्यामुळे अधूनमधून हिंसा भडकत असे.

ऑगस्ट १९२४ मध्ये, त्रावणकोर महाराजाचे निधन झाले. त्यांच्या पश्चात राणी सेथूलक्ष्मी यांच्या ताब्यात संस्थानाची जबाबदारी आली. सेथूलक्ष्मी यांनी सर्व कैद्यांना मुक्त करण्याचा निर्णय घेतला. मात्र एकेदिवशी आंदोलकांचा एक जत्था राजवाड्यावर चालून आल्यामुळे संतापलेल्या राणीने मंदिरात सर्वजातींना प्रवेश देण्यास विरोध केला.

मार्च १९२५ मध्ये महात्मा गांधी यांनी त्रावणकोर येथे भेट देऊन आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी मध्यस्थी केली. या वेळी मंदिराच्या परिसरातील चार रस्त्यांपैकी तीन रस्ते सर्वांसाठी खुले करण्यात आले. पूर्वेकडील एक रस्ता केवळ ब्राह्मण समाजासाठी राखीव ठेवण्यात आला. हा निर्णय अमलात येण्यासाठी नोव्हेंबर १९२५ उजाडले. सरकारने तीनही रस्त्यांचे विभाजन केल्यानंतर या रस्त्यांचा वापर सुरू झाला.

Story img Loader