निसर्गाच्या अन्नसाखळीत जेवढे वाघाचे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व सरीसृपांचे देखील आहे. वाघ, बिबटे यांसारख्यांवर संशोधन होत असताना आणि केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल विभागाकडून त्याला सर्व पाठबळ मिळत असताना पाल, सरडे यासारख्या सरीसृपांच्या (सरपटणारे प्राणी) प्रजाती मात्र कायम दुर्लक्षित राहतात. मात्र, अलीकडच्या काळात तरुण संशोधकांनी या परिस्थितीतसुद्धा सरीसृपांच्या संशोधनात केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे, ईशान अग्रवाल यांसारख्या तरुण संशोधकांच्या फळीने २०१९ पासून ५० हून अधिक सरीसृपांच्या प्रजातींवर संशोधन केले आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरीसृपांच्या संशोधनाकडे दुर्लक्ष का? 

डेहरादून येथे केंद्राच्या अखत्यारितील वन्यजीवांवर संशोधन करणारी भारतीय वन्यजीव संशोधन संस्था आहे. या संस्थेतील शास्त्रज्ञांचा कलसुद्धा वाघ, बिबटे यांसारख्या प्राण्यांकडेच अधिक आहे. प्रसिद्धीचे जे वलय या प्राण्यांना आहे, ते सरीसृपांना नाही. त्यामुळे वन्यजीव क्षेत्रात काम करणारे अभ्यासक, संस्था सरीसृपांच्या संशोधनाकडे वळत नाहीत. यावर संशोधन करण्यासाठी निधी लवकर मिळत नाही. सामाजिक दायित्व निधी, सरकारी संस्था यांच्याकडे हात पसरावे लागतात. संशोधनाचे महत्त्व पटवून द्यावे लागते. त्यानंतर थोडाफार निधी मिळतो.

हेही वाचा – विश्लेषण: ॲथलेटिक्स सुवर्णपदकविजेत्यांना ऑलिम्पिकमध्ये रोख पदके… हा निर्णय क्रांतिकारी कसा? मूळ नियम काय आहेत

सरीसृपांच्या संशोधनामागील आव्हाने कोणती?

जगातील इतर प्राणी आणि पक्ष्यांच्या तुलनेत सरीसृपांचा फारसा अभ्यास झालेला नाही. वाघ, बिबटे, हत्ती, माळढोक, गिधाडे यांसारख्या प्राणी आणि पक्ष्यांना केंद्र तसेच राज्य सरकार आणि वन्यजीव संशोधक व संशोधन संस्थांकडून अधिक महत्त्व देण्यात येते. या प्राणी आणि पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी योजना आखल्या जातात. त्यासाठी भरघोस निधीची तरतूद केली जाते. सरकारी व खासगी संशोधन संस्था यात सहभागी होतात. त्याचवेळी सरीसृपांकडे सरकारसह सर्वांचेच दुर्लक्ष झाले. त्यामुळे ना त्याच्या संरक्षण, संवर्धनासाठी योजना आखण्यात येतात, ना त्याच्यासाठी निधीची तरतूद करण्यात येते. 

संशोधनातील अडचणी कोणत्या? 

संशोधनाच्या परवानगीपासूनच अडचणी सुरू होतात. त्यानंतर निधीची तरतूद ही सरीसृपांच्या संशोधनातील एक प्रमुख अडचण आहे. संशोधन व अभ्यासासाठी सरीसृपांना निधी मिळत नाही. नवीन प्रजातीचा शोध घेताना त्याच्याशी संबंधीत देशातील सर्व प्रजातींचा अभ्यास करावा लागतो. इंग्रज भारतात असताना त्यांनी सरीसृपांचा अभ्यास केला, पण देश सोडून जाताना त्यांनी अभ्यास करताना गोळा केलेल्या सर्व टाईप्स सोबत नेल्या. त्या आता इंग्लंडमधील संग्रहालयात आहेत. त्यामुळे एखादी नवीन प्रजाती शोधल्यानंतर त्याचा अभ्यास करताना अडचणी निर्माण होतात. प्रसंगी इंग्लंडला जावे लागते. वनखात्याच्या अखत्यारितील प्रदेशात संशोधनासाठी परवानगी घेताना त्यांना त्या प्रजातीचे महत्त्व पटवून द्यावे लागते.

सरीसृपांविषयी गैरसमजूती व अंधश्रद्धा… 

सरीसृपांविषयी आणि प्रामुख्याने पालींविषयी अजूनही समाजात बऱ्याच प्रमाणात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गैरसमजुती आणि अंधश्रद्धा कायम आहेत. या प्राण्यांच्या शरीराची रचना, त्यांची वैशिष्ट्ये यामुळे ही प्रजाती कायम दुर्लक्षित राहिली. सरीसृप प्रजातीतील प्राणी घाणेरडे आणि विषारी असतात, याच दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिले जाते. पाल किंवा सरडा विषारी नाही, पण पाल अंगावर पडली की अजूनही अनेकजण अंगावरून पाणी घेतात. पाल घरात असणे चांगले नसते, यासारख्या गैरसमजुती व अंधश्रद्धा अजूनही कायम आहेत. या प्रजाती स्वच्छ असतात आणि त्यातील अनेक सुंदरदेखील असतात. 

हेही वाचा – समाजवादाकडून हिंदुत्वाकडे झुकलेल्या तळकोकणात रंगतदार सामन्याची प्रतीक्षा… राणे वर्चस्व राखणार की राऊत हॅटट्रिक करणार?

पर्यावरण संतुलनात सरीसृपांचे महत्त्व काय? 

सरीसृपांच्या स्थानिक प्रजाती या त्याठिकाणीची स्थानिक परिसंस्था आणि जैवविविधतेचे निदर्शक आहेत. त्यामुळे त्यांचे संरक्षण केले तरच ती परिसंस्था आणि जैवविविधता टिकून राहील आणि पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल. मात्र, सरीसृप आणि त्यांचा अधिवास नष्ट झाला तर निसर्गाच्या अन्नसाखळीला देखील धोका निर्माण होतो. परिणामी जैवविविधतेचे मोठे नुकसान यामुळे होऊ शकते. झुरळ, डास, माश्या, छोटे कीटक हे पालींचे खाद्य आहे आणि रोगांच्या प्रसारासाठी घातक ठरणाऱ्या कीटकांना त्या खात असल्याने हा प्रसार टाळता येतो. 

सरीसृप संशोधनाचा फायदा काय? 

सरीसृप संशोधनात काय ठेवले आहे, त्याचा फायदा काय असा प्रश्न वन्यजीव क्षेत्रातील अभ्यासकांसोबतच इतरांनाही पडतो. कारण सरीसृपांचे संशोधन करताना त्यांच्या डीएनएचादेखील अभ्यास करावा लागतो. तो करत असताना त्या प्राण्याची उत्क्रांती कळते. भारतातील त्या प्राण्याचा, भारताचा इतिहास माहिती होतो. वन्यजीव संरक्षण कायद्यात अलीकडे जे बदल करण्यात आले, त्यात आता पाली, सरडे, बेडूक या सरीसृपांच्या प्रजातींचादेखील समावेश करण्यात आला आहे. 

rakhi.chavhan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reptiles are as important as tigers but why are they still neglected print exp ssb