संदीप नलावडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फ्रान्समध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारविरोधात दहा लाखांपेक्षा अधिक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. मॅक्रॉन सरकारने नवी ‘निवृत्तिवेतन योजना’ तयार केली असून या योजनेमध्ये निवृत्तीचे वय ६२ वरून ६४ वर्षे करण्यात आले आहे. त्याशिवाय संपूर्ण निवृत्तिवेतनासाठी आवश्यक सेवाकाळाचा अवधीही वाढविला आहे. फ्रान्सच्या नागरिकांचा या योजनेला तीव्र विरोध असून त्याविरोधात जनआंदोलन उसळले आहे.

फ्रान्स सरकारची नवी ‘निवृत्तिवेतन योजना’ काय आहे?

फ्रान्स सरकारने निवृत्तिवेतन कायद्यात सुधारणा केली असून नवी निवृत्तिवेतन योजना तयार केली आहे. या योजनेनुसार निवृत्तीचे वय वाढविण्यात आले आहे. सध्या फ्रान्समध्ये ६२ वर्षे वयोमान पूर्ण झाल्यावर कर्मचारी निवृत्त होतो. मात्र आता त्यात दोन वर्षांची वाढ करण्यात आली असून आता निवृत्तीची मर्यादा ६४ वर्षे करण्यात आली आहे. त्याशिवाय संपूर्ण निवृत्तिवेतन पाहिजे असल्यास आवश्यक सेवाकालही वाढविण्यात आला आहे. पंतप्रधान एलिजाबेथ बोर्न यांच्या मतानुसार २०२७पासून संपूर्ण निवृत्तिवेतानासाठी ४३ वर्षे काम करणे आवश्यक असेल. सध्या किमान सेवाकाल ४२ वर्षे आहे. फ्रान्स सरकारचे म्हणणे आहे, की काम करणारे आणि सेवानिवृत्त यांच्यातील गुणोत्तर कमी झालेले असून ते वाढविण्यासाठी निवृत्तीचे वय वाढविण्याचा विचार सरकार करत आहेत. यासंदर्भातील विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आला असून लवकरच फ्रान्सच्या प्रतिनिधीगृहात तो मांडला जाणार आहे.

विश्लेषण: इस्रायलमध्येही सरकार वि. सर्वोच्च न्यायालय… काय आहे नेमका वाद?

नागरिकांच्या जनआंदोलनाची तीव्रता किती?

फ्रान्स सरकारच्या ‘निवृत्तिवेतन योजने’ला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. देशभरात १० लाखांपेक्षा अधिक नागरिक रस्त्यावर उतरले असून त्यांनी सरकारविरोधात जनआंदोलनास सुरुवात केली आहे. तब्बल ८० हजार आंदोलक पॅरिसच्या रस्त्यावर उतरले आहेत, तर देशातील २०० शहरांमध्ये आंदोलन पेटले आहे. शिक्षक, रेल्वेचालक, सार्वजनिक सेवा कर्मचारी, तेलशुद्धीकरण विभागातील कर्मचारी या आंदोलनात उतरले आहेत. त्यामुळे त्याचे परिणाम सार्वजनिक सेवा, शाळा आणि वाहतुकीवर झाला आहे. जनआंदोलनामुळे सार्वजनिक परिवहन सेवा आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. रेल्वेचालक सहभागी झाल्याने काही भागांतील रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आल्या. फ्रान्समधील मुख्य माध्यमिक शिक्षक संघटनेने सांगितले की ६५ टक्के शिक्षक संपावर गेल्याने शाळांवर परिणाम झाला. आंदोलनाचा परिणाम विमान वाहतूक सेवेवरही झाला.

नागरिकांचा ‘निवृत्तिवेतन योजने’ला विरोध का?

फ्रान्समधील नवी ‘निवृत्तिवेतन योजना’ मंजूर झाल्यास निवृत्तीचे वय ६४ वर्षे होणार असून नागरिकांना जास्त काळ काम करावे लागणार आहे. याला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. बहुतेक देशांमध्ये निवृत्तीचे वय ६० ते ६२ असताना फ्रान्समध्ये ते वाढविण्याचे कारण काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्याशिवाय नागरिकांना निवृत्तिवेतनासाठी ४३ वर्षांची सेवा द्यावी लागणार असून त्यासही नागरिकांचा विरोध आहे. ‘आयएफओपी’ या फ्रान्समधील केलेल्या सर्वेक्षणानुसार बहुतेक नागरिकांनी ही योजना नाकारली आहे. ६८ टक्के सांगतात की, ही योजना ते कधीही स्वीकारणार नसून सरकारला ती मागे घेण्याशिवाय पर्याय नाही.

विश्लेषण : Subway vs Suberb, ब्रँडची नक्कल केल्याच्या वादावर दिल्ली उच्च न्यायालयाने दिला निर्णय, नक्की प्रकरण काय होतं?

फ्रान्स सरकारने हे आंदोलन कसे हाताळले?

नव्या निवृत्तिवेतन योजनेविरोधात उसळलेल्या जनआंदोलनाला थोपवण्यासाठी फ्रान्स सरकारने अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर १० हजारांहून अधिक पोलीस तैनात केले जाणार आहेत, असे फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डरमॅनिन यांनी सांगितले. उग्र आंदोलनामुळे काही ठिकाणी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही ठिकाणी वाद झाल्याचे दिसून आले. आंदोलकांनी पोलीस बळाला न जुमानता सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

अन्य देशांमधील निवृत्तीचे वय काय?

युरोपमधील अनेक देशांची लोकसंख्या कमी असल्याने काम करणारे आणि सेवानिवृत्त यांच्यातील गुणोत्तर कमी झालेले आहे. त्यामुळे युरोपमधील अनेक देशांनी सेवानिवृत्तीचे वय वाढविले आहे. इटली आणि जर्मनी या देशांमध्ये निवृत्तीचे वय ६७ वर्षे आहे, तर स्पेनमध्ये ६५ वर्षे आहे. ब्रिटन व डेन्मार्कमध्ये ६६ आणि ग्रीसमध्ये ६७ वर्षे आहेत. भारत, चीन या देशांमध्ये लोकसंख्या अधिक असल्याने सेवानिवृत्तीचे वय कमी आहे. या दोन्ही देशांमध्ये सरकारी कर्मचारी ६० वर्षे वयोमान झाल्यास निवृत्त होतो. बांगलादेशात निवृत्तीचे वय ५९ आहे, तर पाकिस्तानात ६० आहे. अमेरिकी खंडांमधील बहुतेक देशांमध्ये निवृत्तीचे वय ६५ आहे. अमेरिका, चिली, कॅनडा, ब्राझिल या देशांमध्ये निवृत्तीचे वय ६५ वर्षे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retirement age in france increased from 62 to 64 opposed print exp pmw