संजय जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकटेपणाची समस्या अनेकांना जाणवत असते पण त्याबद्दल फारशी चर्चा होत नाही. मात्र, आता एका नव्या संशोधनातून एकटेपणाची समस्या किती भीषण आहे हे समोर आले आहे. जगभरातील चारपैकी एका प्रौढ व्यक्तीला एकटेपणा जाणवत आहे. जगभरातील १४२ देशांमध्ये सर्वेक्षण करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यातून ही समस्या प्रकर्षाने उघड झाली आहे. विशेषत: तरुणांमध्ये ही समस्या सर्वाधिक आढळते आहे.

नेमके संशोधन काय?

मेटा-गॅलप यांनी हे सर्वेक्षण केले आहे. जगभरातील १४२ देशांतील १५ पासून पुढील वयोगटातील व्यक्तींचा त्यात समावेश होता. त्यात तुम्हाला किती एकटेपणा वाटतो, याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यातून त्यांच्या एकटेपणाची पातळी जाणून घेण्यात आली. प्रत्येक देशातील एक हजार नागरिकांचे यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यात दूरध्वनीद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून प्रश्न विचारण्यात आले. या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या देशांचा जागतिक लोकसंख्येत सुमारे ७७ टक्के वाटा आहे.

हेही वाचा >>> अमेरिकेतील ३३ राज्यांची इन्स्टाग्राम, फेसबूकच्या ‘मेटा’ कंपनीविरोधात तक्रार, नेमके प्रकरण काय?

संशोधनातील निष्कर्ष काय?

या सर्वेक्षणात सहभागी २४ टक्के जणांना एकटेपणाची समस्या असल्याचे निदर्शनास आले. तरुणांमध्ये एकटेपणाची समस्या सर्वाधिक असल्याचे समोर आले. सर्वाधिक एकटेपणा १९ ते २९ वयोगटातील २७ टक्के तरुणांमध्ये आढळून आला. सर्वेक्षणातील निष्कर्ष हे चिंताजनक वाटत असले तरी याहीपेक्षा जास्त प्रमाणात ही समस्या असल्याचे संशोधकांचे मत आहे. एकटेपणाची सर्वांत कमी समस्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळून आली असून, ६५ वर्षे व त्यावरील केवळ १७ टक्के ज्येष्ठ नागरिकांना एकटेपणाची समस्या आहे. विशेष म्हणजे ४५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील प्रौढांना एकटेपणाची समस्या फारशी जाणवत नाही. या वयोगटातील बहुतांश प्रौढांनी अतिशय कमी एकटेपणा वाटत असल्याचे उत्तर दिले आहे.

महिला, पुरुषांमध्ये प्रमाण किती?

महिला आणि पुरुषांमध्ये एकटेपणाच्या समस्येचे प्रमाण सर्वसाधारणपणे सारखेच दिसून आले. मात्र, काही देशांमध्ये त्यात मोठी तफावत आढळून आली आहे. संबंधित देशातील संस्कृतीनुसार एकटेपणाचे प्रमाण लिंगनिहाय बदलत असल्याचे दिसून आले. एकूण १४२ देशांपैकी ७९ देशांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांमध्ये एकटेपणाचे प्रमाण जास्त आढळले. म्हणजेच निम्म्याहून अधिक देशांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांना ही समस्या अधिक भेडसावत आहे.

एकटेपणाचे धोके किती?

जागतिक आरोग्य संघटनेच्या डिसेंबर २०२० मधील अहवालात एकटेपणाचा आणि त्याचे धोके अधोरेखित केले होते. याचबरोबर अमेरिकेचे सर्जन जनरल यांनी मे महिन्यात सादर केलेल्या अहवालात एकटेपणाचे धोके मांडले होते. एकटेपणामुळे व्यक्तीच्या बौद्धिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असून, त्यातून अकाली मृत्यूही होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी नमूद केले होते. गॅलपमधील वरिष्ठ संशोधन सल्लागार एलिन मेईस यांच्या म्हणण्यानुसार, ज्येष्ठ नागरिकांमधील एकटेपणा आणि सामाजिक विलगता यांच्या धोक्यांकडे अनेक संशोधनातून प्रकाश टाकण्यात आला आहे. परंतु, ही समस्या सर्व वयोगटातील व्यक्तींना भेडसावत आहे.

हेही वाचा >>> लोकसभेची आचार समिती म्हणजे काय? जाणून घ्या…

समाजमाध्यमांची भलामण का?

तरुण एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी समाजमाध्यमावर प्रामुख्याने अवलंबून असलेले दिसतात. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही जर केवळ प्रतिसादात्मक म्हणून समाजमाध्यमाचा वापर करीत असाल तर त्याचा फायदा होत नाही. केवळ चांगल्या पोस्ट लाइक करणे आणि त्याची तुलना वास्तवाशी करणे, असा प्रकार सुरू होतो. केवळ स्टेटस अपडेट अथवा छायाचित्र पोस्ट करण्याऐवजी समाजमाध्यमांवर सक्रिय सहभाग घ्यायला हवा, मित्रांच्या पोस्टवर संवाद साधायला हवा, त्यांना खासगी संदेश पाठवायला हवेत- अन्यथा समाजमाध्यमे घातक ठरू शकतात… मात्र ‘मेटा’ ही फेसबुक व अन्य समाजमाध्यमांची मालक कंपनीच या सर्वेक्षणात सहभागी होती!

उपाय काय करावेत?

सर्वेक्षणात सहभागी ४९ टक्के जणांनी अजिबात एकटेपणा वाटत नसल्याचे मत नोंदविले आहे. याचवेळी निम्म्या जणांनी अतिशय कमी प्रमाणात एकटेपणा वाटत असल्याचे म्हटले आहे. यापैकी बहुतेकांनी करोनाकाळानंतर एकटेपणातून बाहेर येऊन सामाजिक संपर्क कायम ठेवला. आजूबाजूला लोक असल्यामुळे एकटेपणापासून संरक्षण मिळते अथवा फारसा एकटेपणा जाणवत नाही. नवीन मित्र बनवणे, एखाद्या कामात स्वयंसेवक म्हणून सहभागी होणे, नवीन अभ्यासक्रम शिकणे यातून तुम्ही नवीन लोकांना भेटता. या मार्गांनी तुम्ही एकटेपणा येऊ न देता इतर गोष्टींचा आनंद घ्यायला शिकता, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

sanjay. jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Review loneliness in young people analysis of young adults experiences of loneliness print exp zws
Show comments