After Nalanda, Vikramshila Set to Rise Again in Bihar: भारतीय इतिहास आणि संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही आपल्याला देशभरात जागोजागी पाहायला मिळतात. यात समृद्ध इतिहासातील भारतीय ज्ञानपरंपरा ही प्राचीन विद्यापीठांच्या स्वरूपात आढळते. मध्ययुगात नालंदा, तक्षशिला यांसारख्या भारतीय विद्यापीठांमध्ये जगभरातील विद्यार्थी प्रवेश घेत होते. हीच भारतीय ज्ञानपरंपरा अखंड चालू ठेवण्यासाठी विद्यमान सरकारने नालंदा या प्राचीन विद्यापीठाच्या परिसरात नव्या विद्यापीठाची उभारणी केली. या गोष्टीला एक दशक लोटले असून बिहारमध्ये आणखी एका प्राचीन ज्ञानकेंद्राला उभारी देण्याचं काम सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर या प्राचीन विद्यापीठाच्या इतिहासाचा घेतलेला हा आढावा.
नालंदा नंतर विक्रमशिला
भारतीय पुरातत्त्व खातं गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून प्राचीन विक्रमशिला विद्यापीठाच्या ठिकाणी पर्यटन वाढवण्यासाठी विकासकामे करत आहे. तर, दुसरीकडे बिहार सरकारने अलीकडेच भागलपूर जिल्ह्यातील अंतिचक गावात केंद्रीय विद्यापीठासाठी २०२.१४ एकर जमीन निश्चित केली आहे. केंद्र सरकारने हा प्रकल्प २०१५ साली मंजूर केला असून त्यासाठी ५०० कोटी रुपये मंजूर केले होते. परंतु, राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी योग्य त्या भूमीची निवड न झाल्यामुळे प्रकल्पास विलंब झाला. २४ फेब्रुवारी रोजी भागलपूरमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “विक्रमशिला विद्यापीठ हे संपूर्ण जगासाठी ज्ञानाचे केंद्र होते. आपण प्राचीन नालंदा विद्यापीठाची परंपरा नव्या नालंदा विद्यापीठाशी जोडली आहे. आता नालंदा नंतर विक्रमशिला आहे. आपण तिथे केंद्रीय विद्यापीठ सुरू करत आहोत.”
संवर्धनाची तयारी
प्राचीन विक्रमशिला विद्यापीठाच्या प्राचीन स्थळावर महाविहाराच्या अवशेषांच्या ठिकाणी साफसफाई सुरू आहे. मातीचे थर अगदीच अलगतपणे बाजूला केले जात आहेत. मातीच्या खालील रचनांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत केला जात आहे. संवर्धन आणि संरक्षण प्रक्रियेचा एक भाग म्हणून संपूर्ण परिसर ग्रिडमध्ये विभागलेला आहे. विटांचा स्तूप विक्रमशिला स्थळाचा मुख्य भाग आहे. स्तूपाभोवती २०८ कक्ष आहेत. प्रत्येक बाजूला ५२ कक्ष आहेत. या ठिकाणी विद्यापीठातील भिक्षु विद्यार्थी तंत्रयानाचा अभ्यास करत होते.
धर्मपालचा राजाश्रय
विक्रमशिला हे बिहार राज्यातील एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ आहे. तिबेटी परंपरेनुसार मगधचा पालवंशी राजा धर्मपाल (७८०−८१५) याचा बौद्ध धर्माला राजाश्रय होता. त्यानेच विक्रमशिला विहाराची स्थापना केली होती. या विहाराला विक्रम नावाच्या यक्षाचे नाव देण्यात आले. याच विहाराचे रूपांतर नंतरच्या कालखंडात विक्रमशिला विद्यापीठात झाले. धर्मपालाचे दुसरे नाव विक्रमशील असल्यामुळे या विद्यापीठाचे नाव विक्रमशीला ठेवण्यात आले. हे विद्यापीठ नालंदा विद्यापीठाच्या काळात अस्तित्वात होते आणि भरभराटीस आले होते.
तांत्रिक व गूढ विद्यांचे विद्यापीठ
“नालंदा विद्यापीठाची भरभराट गुप्त कालापासून (इ.स. ३२०–५५५) ते १२ व्या शतकापर्यंत झाली. असे असले तरी या विद्यापीठाचा खरा विकास हा पाल राजवंशाच्या कालखंडात झाला. नालंदाला जरी विविध विषयांच्या अध्यापनासाठी आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली, तरी विक्रमशिला हे एकमेव विद्यापीठ होते जे तांत्रिक आणि गूढ विद्यांच्या शिक्षणासाठी विशेष प्रसिद्ध होते. प्रत्यक्षात, धर्मपालाच्या कारकिर्दीत विक्रमशिला सर्वोच्च स्थानावर होते आणि नालंदाच्या कामकाजावरही त्याचे नियंत्रण होते, असे मानले जाते,” असे भारतीय पुरातत्त्व खात्याच्या पाटणा सर्कलचे अधीक्षक (पुरातत्त्ववेत्ता) सुजीत नयन यांनी सांगितले.
तंत्रमार्ग आणि तांत्रिक साधना
नालंदा हे या दोन विद्यापीठांपैकी जुने असले तरी दोन्ही विद्यापीठांना धर्मपालाचाच राजाश्रय होता. त्यामुळेच या प्राचीन विद्यापीठांमध्ये शिक्षक आणि ज्ञानाची देवाणघेवाण होत राहिली. येथील शिक्षकांना ‘आचार्य’ म्हटले जात असे. विक्रमशिला विद्यापीठात धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, व्याकरण, पारमार्थिक विचार (metaphysics) आणि तर्कशास्त्र यांसारख्या विषयांचे शिक्षण दिले जात होते. परंतु, सर्वात महत्त्वाची शाखा तंत्र ही होती. कारण विक्रमशिला हे तांत्रिक परंपरेच्या काळात विकसित झाले. या कालखंडात गूढ शास्त्रे हा बौद्ध धर्मात तसेच हिंदू धर्मातही अभ्यासाचा प्रमुख विषय होता. बौद्ध धर्मातील विविध संप्रदाय, वेद, अध्यात्मविद्या, व्याकरण, न्यायशास्त्र आदी विषयांचे या विद्यापीठात अध्यापन होई. तंत्रमार्गाच्या अध्यापनावर, विशेषतः वज्रयान व सहजयान यांवर येथे विशेषभर होता. इ. स. दहाव्या-अकराव्या शतकांत तंत्रमार्ग आणि तांत्रिक साधना हे बौद्ध धर्माचे प्रमुख अंग होते.
चिनी प्रवाशांच्या नोंदी काय सांगतात?
या विद्यापीठात परदेशांतून तसेच भारतातील विविध भागांतून अध्ययनासाठी विद्यार्थी येत होते. द्वारस्थ आचार्यांकडून परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांना या विद्यापीठात प्रवेश मिळे. तिबेटी भिक्षू येथे अध्ययन करून संस्कृत ग्रंथांचा तिबेटी भाषेत अनुवाद करीत. विद्यापीठीय परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांस पंडीत, महापंडित इ. पदव्या राजदरबारात देण्यात येत व अशा पंडितांना ‘राजपंडित’ हे बिरूद मिळे. अशा प्रख्यात राजपंडितांमध्ये आचार्य रत्नकीर्ती, जेतारी, ज्ञानश्रीमित्र, अतीश दीपंकर, रत्नवज्र, वागीश्वरकीर्ती इत्यादींचा समावेश होता. येथील ग्रंथालय समृद्ध होते. विद्यापीठाचे प्रशासन महाधिपतींकडे असून त्यांच्या मदतीला सहा आचार्यांचे मंडळ असे. काही काळ नालंदा विद्यापीठाचा कारभारही या मंडळाच्या नियंत्रणाखाली होता. तेथील प्रशासन उत्कृष्ट होते. ह्यूएन त्सांग (सु. ६०२-६६४) व इत्सिंग (सू. ६३४−७१३) ह्या चिनी प्रवाशांच्या वृत्तांतून या विद्यापीठाचे कार्य व प्रगती यांबाबत माहिती मिळते.
प्रगत विद्यापीठ
पालवंशाच्या धर्मपाल राजाने महाविहाराची स्थापना करून बौद्ध धर्मातील चार प्रमुख पंथांमधील प्रत्येकी २७ असे एकूण १०८ अध्यापक चार विभागांमध्ये नेमले आणि महाविहाराला देणग्या दिल्या. त्यानंतरच्या पाल राजांनीही या विद्यापीठाला उदारपणे आर्थिक मदत केली. इतर श्रीमंत दात्यांनीही या स्थळाला भरघोस देणग्या दिल्या. महाविहाराभोवती तटबंदी होती आणि चारही दिशांना मोठी प्रवेशद्वारे होती. प्रत्येक प्रवेशद्वारावर एक प्रवेशपरीक्षागृह होते. राजा देवपाल (८१५–८५५) याने आणखी दोन प्रवेशपरीक्षागृहे बांधली. या प्रत्येक द्वारावर एक विद्वान पंडित नेमलेला असे. रत्नाकरशांती, वागीश्वरकीर्ती, भट्टारक नरोत्पल, प्रज्ञाकरमती, रत्नवज्र, ज्ञानश्रीमित्र हे त्यांपैकी काही प्रमुख विद्वान पंडित होते. हे सहाही विहारांचे मुख्य आचार्य होते. या आचार्यांपैकी काहीजण प्रसिद्ध नैयायिक होते.
विनामूल्य निवास व भोजन व्यवस्था
विहाराच्या मध्यभागी मुख्य देवालय आणि इतर १०८ देवालये होती. केंद्रस्थानी असणाऱ्या विहाराला ‘विज्ञानगृह’ असे म्हणत. याशिवाय येथे एक विशाल सभाभवन होते, या सभागृहात एकावेळी आठ हजार लोक बसू शकत. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला नालंदा विद्यापीठाचे प्रमुख आचार्य नागार्जुन यांचे चित्र होते आणि डाव्या बाजूला अतीश दीपंकर यांचे चित्र होते. मुख्य प्रवेशद्वार बंद झाल्यावर येणाऱ्यांसाठी त्या प्रवेशद्वाराबाहेर एक धर्मशाळा होती. विद्यार्थ्यांसाठी येथे विनामूल्य निवास आणि भोजनाची सोय करण्यात आलेली होती.
आतिश दीपंकर
या विद्यापीठाने अनेक महान विद्वान घडवले. त्यामध्ये आतिश दीपंकर यांचा उल्लेख विशेष महत्त्वाचा आहे. आतिश दीपंकर यांनी तिबेटमध्ये बौद्ध धर्माच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. या विद्यापीठाचा विकास सुमारे चार शतक होत होता. तर १३ व्या शतकात ऱ्हास झाला. यामागे अनेक कारणांचा समावेश होतो. यात प्रामुख्याने हिंदू धर्माचा वाढता प्रभाव, बौद्ध धर्माचा ऱ्हास आणि बख्तियार खिलजीचे आक्रमण इत्यादींचा समावेश होता. येथील स्तूप, भिक्षुंचे कक्ष आणि विशाल ग्रंथालयाचे अवशेष आजही या समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात.
शीतकरण प्रणाली
सध्या उपलब्ध अवशेषांमध्ये शीतकरण प्रणाली दृष्टिपथास पडते, अशी माहिती सुजित नयन यांनी दिली. ही प्रणाली हस्तलिखितांच्या संरक्षणासाठी होती, असेही त्यांनी पुढे म्हटले. या स्थळावर प्रारंभिक उत्खनन ६० च्या दशकात पाटणा विद्यापीठाने केले होते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यानेही १९७२-७३ पासून येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून विक्रमशीला विद्यापीठाचे अवशेष शोधून काढले. तेथील भव्य मठ, पाषाणाच्या बुद्धप्रतिमा, मोहोरा, स्तूप आणि भव्य जलाशये त्या काळाची ग्वाही देतात. या स्थळावर असलेल्या संग्रहालयात उत्खननात सापडलेल्या अनेक प्राचीन वस्तू प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. यात बुद्ध मूर्ती (बुद्धाच्या आयुष्यातील आठ प्रमुख प्रसंग दर्शवणारी) अवलोकितेश्वर, लोकनाथ, गणेश, सूर्य, विष्णू इत्यादी बौद्ध व हिंदू देवतांच्या मूर्तींचा समावेश आहे.
नव्या विद्यापीठांचा संगम
प्राचीन स्थळापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर अंतिचक गावात नव्या विद्यापीठाच्या संकल्पनेला आकार मिळत आहे. बिहार सरकारने अंतिचक गावात जमीन संपादनासाठी ८७.९९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. भागलपूरचे जिल्हाधिकारी नवल किशोर चौधरी म्हणाले, “प्राचीन विक्रमशिला स्थळापासून तीन किलोमीटर अंतरावर २०२.१४ एकर जमीन जिल्हा प्रशासनाने निवडली आहे. त्यापैकी २७ एकर जमीन ही राज्य सरकारची आहे, परंतु काही ठिकाणी अतिक्रमण आहे.” बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सांगितले की, “विक्रमशिला प्रकल्प सुरू झाला आहे. जमीन संपादन प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. विक्रमशिलाला भागलपूरशी (५ किमी) जोडणाऱ्या NH-80 महामार्गाचे बांधकाम व दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळेच नव्या नालंदा आणि विक्रमशिला विद्यापीठांमध्ये पुन्हा एकदा प्राचीन काळाप्रमाणेच सहकार्य घडेल.”