संपदा सोवनी
रेव्हलॉन ही रंगभूषा किंवा मेकअप उत्पादनांच्या क्षेत्रातील जवळपास ९० वर्षे जुनी आणि १५० देशांमध्ये पोहोचलेली अमेरिकन कंपनी आहे. नुकतीच या कंपनीने नादारी/ दिवाळखोरी जाहीर केली. तांत्रिक भाषेत सांगायचे, तर कंपनीने अमेरिकेत ‘Chaper 11 Bankruptcy Protection’ मागितले आहे. ही दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे पुढच्या प्रवासासाठी दीर्घकालीन विचार करून आर्थिक तरतुदी करणे आणि आपले अस्तित्व राखणे, यासाठी कंपनीला उसंत मिळेल.
काय आहे रेव्हलॉन?
रेव्हलॉन या कंपनीची स्थापना १९३२मध्ये झाली. जगातील मेकअप उत्पादनांच्या तीन अग्रगण्य कंपन्यांमध्ये रेव्हलॉन गणली जाते. सुरुवातीला केवळ नेलपॉलिश बनवणारी ही कंपनी हळूहळू सर्वच मेकअप उत्पादनांच्या निर्मितीत उतरली. भारतातदेखील रेव्हलॉनची लिपस्टिक, काजळ पेन्सिल अशा उत्पादनांना स्त्रियांची पसंती लाभते. केशरंगाच्या क्षेत्रातही रेव्हलॉनचा वावर असून हे केशरंग किंवा हेअर कलर्स अमेरिकेत अधिक वापरले जातात. मेकअपव्यतिरिक्त कंपनीने ‘प्रिमियम’ श्रेणीत बसणारा आणि विशेषतः स्त्रियांसाठीचे परफ्युम बनवणारा ‘एलिझाबेथ आर्डन’ हा ब्रँड आणि इतरही काही ब्रँड्स विकसित केले आहेत.
कर्जबाजारी अवस्था का आली?
दिवाळखोरीसंदर्भात अर्ज करताना कंपनीवर ३.७ अब्ज डॉलर्सचे कर्ज झाले आहे. म्हणजे जवळपास २८,८४२ कोटी रुपयांहून अधिक. २०२१ या आर्थिक वर्षात कंपनीला २०६.९० दशलक्ष डॉलर्सचा निव्वळ तोटा (नेट लॉस) झाला. चार वर्षांत कंपनीची विक्री २२ टक्क्यांनी घटल्याची नोंद झाली.
दिवाळखोरीची वेळ का आली?
रेव्हलॉन कंपनी खूप जुनी असली, तरी आतापर्यंतच्या काळात मेकअप आणि कॉस्मेटिक्सचा व्यवसाय प्रचंड बदलला आहे. अक्षरशः शेकडो कंपन्या जगभर या व्यवसायात आहेत. समाजमाध्यमांच्या सध्याच्या काळात या ब्रँड्समधली स्पर्धा खूप वाढली आहे.
विश्लेषण : उद्योगांवरील माथाडी कायद्याचे ओझे कमी होईल का?
चलनवाढ, घटक पदार्थांचा घटलेला पुरवठा, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती याचा फटका या व्यवसायाला बसला आहेच, पण त्याशिवाय कंपनीला मालाच्या पुरवठ्यासंबंधित अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. याची आणि मागणी तसा पुरवठा हे तत्त्व पाळता न आल्याची परिणती दिवाळखोरीत झाली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२०पासून जगभरात ठिकठिकाणी झालेली टाळेबंदी, अजूनही पूर्णपणे पूर्ववत न झालेली परिस्थिती, रशिया-युक्रेन युद्ध या घटनांनी मालाच्या पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले.
पुढे काय? रिलायन्सचा आधार?
अडचणींमधून बाहेर येण्याचे विविध मार्ग कंपनी शोधत आहे. कर्जदारांकडून मोठी रक्कम कर्जाऊ उभी करण्यापासून कंपनीच्या दुसऱ्या सक्षम कंपनीत विलीनीकरणापर्यंतच्या मार्गांचा अशा उपायांत समावेश असू शकतो. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज रेव्हलॉन विकत घेण्याच्या विचारात असल्याची मोठी चर्चा आहे. मात्र यावर अद्याप रिलायन्स किंवा रेव्हलॉन या दोहोंनीही अधिकृतपणे काही भाष्य केलेले नाही.