समाजमाध्यमावरील एका आक्षेपार्ह टिप्पणीमुळे अकोला शहरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन धार्मिक गट एकमेकांसमोर आले आणि दंगल उसळली. शनिवारी रात्री नेमकी दंगल का उसळली, याची सध्या चौकशी होत आहे. अकोला, अमरावती या शहरांमध्ये धार्मिक तेढ आणि त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण होणे, हे नवीन नाही. यापूर्वी मुख्यत्वे नागरी भागापुरत्या मर्यादित असणाऱ्या दंगलीचे लोण अर्धनागरी व ग्रामीण भागातही पसरू लागल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. अशा घटनांनंतर होणाऱ्या धार्मिक ध्रुवीकरणाचा लाभ पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न होत आहेत का, असा प्रश्न आता चर्चेत आला आहे.
अकोल्यात त्यादिवशी नेमके काय घडले?
समाजमाध्यमावरील एका आक्षेपार्ह टिप्पणीनंतर शंभर ते दीडशे लोकांचा जमाव रस्त्यावर आला. आक्षेपार्ह संदेशामुळे विशिष्ट धर्मीयांच्या भावना दुखावल्याचे त्यांचे म्हणणे होते. हा जमाव सुरुवातीला पोलीस ठाण्यात पोहचला. तेथे तक्रार दाखल केल्यानंतर जमावाने दुसऱ्या पोलीस ठाण्यात जाताना धुडगूस घातला. काही असामाजिक तत्त्वांनी जुन्या शहरात चारचाकी, दुचाकी वाहने पेटवली. जमावाने दगडफेकही केली. दंगलीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर दोन पोलिसांसह आठ जण जखमी झाले. सध्या अकोला येथे तणावपूर्ण शांतता आहे. ही दंगल पूर्वनियोजित असल्याचा आरोपही केला जात आहे.
जातीय-धार्मिक संघर्षाचा इतिहास काय?
पश्चिम विदर्भातील अनेक संवेदनशील शहरांमध्ये तणावाचा इतिहास आहे. अकोला शहरात जातीय-धार्मिक तणावाच्या किरकोळ घटना घडल्या असल्या, तरी गेल्या दहा-बारा वर्षांत दंगलीचा प्रसंग उद्भवला नाही. संघर्षाचे मुद्दे सामोपचाराने सोडविण्यावर पोलीस प्रशासनाने भर दिला आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये अमरावतीत, त्रिपुरा येथील कथित हिंसाचाराच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता. त्यातच दुसऱ्या दिवशी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केल्याने संघर्ष तीव्र झाला होता. एप्रिल २०२२ मध्ये अचलपूर शहरात झेंडा फडकावल्याच्या वादावरून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अशा अनेक घटनांमधून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न केले जातात. दंगल कोणीही घडवली तरी रोजीरोटीसाठी झगडणारा गरीब माणूसच त्याचा बळी असतो, हे सर्वानी नेहमी अनुभवले आहे.
दंगलीचा राजकीय लाभ कुणाला?
जातीय-धार्मिक संघर्षानंतर त्याचा आधार घेत राजकीय ध्रुवीकरण घडवून आणण्याचा ‘पॅटर्न’ तयार झाला आहे. भाजपने तर पश्चिम विदर्भात याची जोरदार चाचपणी सुरू केल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात युती असताना आणि आता शिवसेनेत पडलेली फूट यानंतर हिंदू म्हणून आम्हीच आहोत हे दाखवण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी आक्रमक भूमिका भाजपने घेतली आहे. आपली मतपेढी भक्कम करण्यावर भाजपचा भर दिसून येत आहे. दंगलीनंतर त्याचा मतांसाठी राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न लपून राहिलेला नाही.
जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती कशी आहे?
पश्चिम विदर्भात काँग्रेसची शक्ती क्षीण होत गेली आणि १९९० नंतर शिवसेनेने जम बसवला. भाजप-शिवसेना युती ही भाजपसाठी देखील लाभदायक ठरली. अकोला जिल्ह्यात शिवसेनेपेक्षा भाजपने आपली पाळेमुळे अधिक घट्ट केली. अमरावती, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांत शिवसेनेला बराच वाव मिळाला. आता सत्तांतरानंतर परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने गतवैभव परत मिळवण्याची धडपड सुरू केली आहे. शिंदे गटाला स्वतंत्र स्थान निर्माण करायचे आहे, तर भाजपला स्वबळावरच जनाधार उभा करायचा आहे. शिवसेनेला मानणाऱ्या हिंदुत्ववादी गटाला आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा आणि शिंदे गटाचा प्रयत्न राहणार आहे. मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयोग त्यामुळे पश्चिम विदर्भात सुरू झाले आहेत.
पश्चिम विदर्भातील धार्मिक वर्गवारी कशी आहे?
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये हिंदूंची लोकसंख्या सर्वाधिक आहे. साधारणपणे हिंदूंचे प्रमाण ५० ते ७० टक्क्यांपर्यंत आहे, तर मुस्लिमांचे प्रमाण हे १५ ते ३० टक्के इतके आहे. बौद्ध नागरिकांचे प्रमाण हे १० ते २४ टक्क्यांदरम्यान आहे. हे समुदाय राजकारणात फेरबदल घडवून आणत असतात. काही शहरांमध्ये मुस्लिमांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी राजकीयदृष्ट्या मुस्लीम नेत्यांचे प्राबल्य दिसते. तुल्यबळ लोकसंख्या असलेल्या ठिकाणी मतांच्या ध्रुवीकरणावर अधिक भर दिला जातो. गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होत सत्तेच्या शिखरापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न भाजपने अधिक जोरकसपणे चालवल्याचे दिसून येत आहे.
mohan.atalkar@gmail.com