ब्रिटनमध्ये ओढवलेल्या राजकीय संकटानंतर पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. कंजरवेटीव्ह पक्षाच्या जवळपास ४१ मंत्र्यांनी बोरिस जॉनसन यांच्यावर अविश्वास दाखवत राजीनामा दिला आहे. जॉनसन यांच्या मंत्रीमंडळातील अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी सर्वप्रथम ५ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजीनाम्याचे सत्र सुरु झाले. बोरिस जॉनसन यांच्या राजीनाम्यानंतर नव्या व्यक्तीची पंतप्रधानपदी निवड करण्यात येणार आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानण्यात येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मूळचे भारतीय असलेले ऋषी सुनक हे इन्फोसेसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. सुनक बोरिस जॉनसन सरकारच्या काळात अर्थमंत्री होते. आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते पंतप्रधान पदाचे दावेदार मानण्यात येत आहेत. ४२ वर्षाच्या सुनक यांची फेब्रुवारी २०२० मध्ये बोरिस जॉनसन यांनी अर्थमंत्री पदी नियुक्त केली होती. या वर्षी जानेवारीमध्ये ब्रिटनच्या एका सट्टेबाजाने बोरिस जॉनसन राजीनामा देतील आणि त्यांच्या जागी ऋषी सुनक पंतप्रधान बनतील, अशी भविष्यवाणी केली होती. ऋषी सुनक यांच्या व्यतरिक्त पेनी मॉरडॉन्ट, बेन वॉलेस, साजिद वाजिद, लिज ट्रस, आणि डोमिनिक राब हे सुद्धा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत.

ऋषी सुनक यांचा जन्म
ऋषी सुनक यांचे आई-वडील भारतीय वंशाचे आहेत. मात्र, त्यांचे वडील यशवीर यांचा जन्म केनिया मध्ये झाला होता तर आई उषा यांचा जन्म तंजानिया मध्ये झाला होता. ऋषी यांच्या आजी- आजोबांचा जन्म इंग्रजांच्या काळी पंजाबमध्ये झाला होता. १९६० साली ते आपल्या मुलासोबत ब्रिटनमध्ये स्थाईक झाले. १२ मे १९८० साली ऋषी यांचा जन्म इंग्लंडच्या साउथम्पैटनमध्ये झाला होता. तीन भाऊ बहिणींमध्ये ऋषी सगळ्यात मोठे आहेत.

ऋषी सुनक यांचे शिक्षण आणि कारकीर्द
भारतीय वंशाच्या ऋषी यांचा जन्म यूकेमधील साउथॅम्प्टन येथे झाला. त्यांनी यूकेच्या विंचेस्टर कॉलेजमधून राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला, जिथे त्यांनी तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएचे शिक्षणही घेतले आहे. आपल्या शैक्षणिक काळात ते हुशार विद्यार्थी होते. ऋषी सुनक यांनी ग्रॅज्युएशननंतर गोल्डमन सॅक्समध्ये काम केले आणि नंतर हेज फंड फर्म्समध्ये भागीदार बनले. राजकारणात येण्यापूर्वी ऋषी यांनी अब्जावधी पौंडांची जागतिक गुंतवणूक कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी ब्रिटनमधील छोट्या उद्योगांना अर्थसहाय्य देते.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीए करतानाच ऋषी सुनक यांची भेट इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि ज्येष्ठ उद्योगपती नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांच्याशी झाली. अक्षता मूर्ती यांच्यासोबत ऋषी सुनक यांनी लग्न केले. अक्षता मूर्ती ऋषी सुनक यांना कृष्णा आणि अनुष्का नावाच्या दोन मुली आहेत.

राजकारणात प्रवेश
२०१५ मध्ये यॉर्कशर येथील रिचमंड मतदारसंघात निवडून येत ऋषी सुनक पहिल्यांदा संसदेत पोहोचले. त्यावेळी ब्रेक्झिटला पाठिंबा दिल्यामुळे पक्षात त्यांचे महत्व वाढत गेले. ऋषी यांनी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात कनिष्ठ मंत्री म्हणून काम केले होते. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा उगवता तारा म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिले जात असे. पक्षातील अनेक बडे नेते त्यांचे वारंवार कौतुक करतात.
ऋषी सुनक यांना क्रिकेट, फुटबॉल व्यतिरिक्त चित्रपट पाहण्याचीही आवड आहे. त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व पाहून त्यांना डिश ऋषी या टोपण नावानेही संबोधले जाते

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishi sunak could be next prime minister of britain after boris johnson resigns dpj