ब्रिटन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक हे अग्रस्थानी आहेत. त्यांना सत्ताधारी हुजूर पक्षाच्या एकूण १४२ खासदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे ते पंतप्रधानपदाच्या फक्त एक पाऊल दूर आहेत, असे म्हटले जात आहेत. मात्र अधिकृत घोषणा होईपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही. ब्रिटमधील आर्थिक संकटाला दूर करण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन सुनक यांनी दिलेले आहे.

हेही वाचा >>>> विश्लेषण: ‘डेड बॉल’वरुन पाकिस्तानची रडारडी; पण ‘डेड बॉल’ म्हणजे नेमकं काय? तो कधी घोषित करतात? विराटच्या तीन धावा ग्राह्य का धरल्या?

ऋषी सुनक दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. याआधी जुलै महिन्यात ते लिझ ट्रस यांना प्रतिस्पर्धी म्हणून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले होते. या निवडणुकीत सुनक विजय झाले असते तर ते पहिले भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ठरले असते. मात्र तेव्हा त्यांना पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली होती. त्या निवडणुकीत लिझ ट्रस विजयी झाल्या होत्या. मात्र पक्षाचा पाठिंबा गमावल्यामुळे तसेच दिलेली आश्वासने पूर्ण करू न शकल्यामुळे ट्रस यांना अवघ्या ४५ दिवसांत राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता ऋषी सुनक हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले आहेत.

हेही वाचा >>>> विश्लेषण : प्रक्षोभक भाषण, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी काय कारवाई होते? कलम २९५ (अ) आहे तरी काय?

लिझ ट्रस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारी हुजूर पक्षाने नवा नेता निवडण्याच्या प्रक्रियेला गती दिलेली आहे. याच कारणामुळे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारांना सोमवारपर्यंत कमीतकमी १०० खासदारांचा पाठिंबा असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. नेतानिवडीच्या प्रक्रियेला गती मिळावी म्हणून ही अट ठेवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या नियमाप्रमाणे फक्त एकच उमेदवार १०० खासदारांचे समर्थन प्राप्त करू शकला आणि इतर उमेदवारांना ही संख्या गाठणे शक्य झाले नाही, तर १०० खासदारांचा पाठिंबा असणारा उमेदवार आपोआपच पंतप्रधानपदाची शर्यत जिंकणार आहे.

मात्र दोनपेक्षा अधिक उमेदवारांना १०० पेक्षा जास्त खासदारांनी पाठिंबा दिल्यास निवडणूक होणार आहे. सर्व खासदारांना मतदान करावे लागणार आहे. त्यानंतर सर्वात कमी खासदारांचा पाठिंबा असलेला उमेदवार शर्यतीतून बाद होईल. शेवटी खासदार तसेच हुजूर पक्षाचे सदस्य ऑनलाईन पद्धतीने मतदान करतील. त्यानंतर सर्वात जास्त मते मिळालेला उमेदवार हुजूर पक्षाचा नेता तसेच ब्रिटनचा नवा पंतप्रधान म्हणून निवडला जाईल.

हेही वाचा >>>> विश्लेषण : ‘यूट्यूब हँडल’ म्हणजे काय रे भाऊ? समजून घ्या यूट्यूबचं नवं फिचर

सुनक यांच्याकडे पुरेसे खासदार आहेत का?

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे सुनक यांचे प्रतिस्पर्धी असल्याचे म्हटले जात होते. विशेष म्हणजे ही निवडणूक लढवण्यासाठी ते सुटी रद्द करून ब्रिटनमध्ये परतले होते. मात्र रविवारी त्यांनी अचानकपणे आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे सुनक यांचा मार्ग आणखी सुकर झाला आहे. जॉन्सन शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर पेनी मॉर्डन्ट यांच्याकडे सुनक यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात आहे. मात्र त्यांच्याकडे सध्यातरी फक्त २९ खासदारांचा पाठिंबा आहे. तर सुनक यांना आतापर्यंत १४२ खासदारांनी पाठिंबा दिला आहे. याच कारणामुळे सध्या सुनक यांची पंतप्रधानपदी नियुक्ती होण्याची शक्यता बळावली आहे. मॉर्डन्ट यांना आज १०० खासदारांचा पाठिंबा मिळाला नाही, तर सुनक आपोआपच ब्रिटनचे नवे पंतप्रधान होतील.

Story img Loader