नद्यांच्या पाणी वाटपाबाबत भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून वाद सुरू आहे. कायमस्वरुपी पाणीपुरवठा हा दोन्ही विकसनशील देशांसाठी महत्त्वाचा आणि तितकाच संवेदनशील मुद्दा आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना या नुकत्याच भारत भेटीवर आल्या होत्या. या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत नद्यांच्या पाणी वाटपासंदर्भात अनेक मुद्दे मांडले. या दोन्ही नेत्यांमध्ये तीस्ता नदीसह इतर मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. भारत आणि बांगलादेशमध्ये कुठल्या नद्यांवरुन वाद आहे? या दोन्ही देशांनी केलेल्या कुशियारा नदी कराराचा फायदा काय? या प्रश्नांचा वेध घेणारे हे विश्लेषण.
दोन्ही राष्ट्रांमधील पाणी वाटपाच्या समस्यांवरील तोडग्यासाठी भारतासह बांगलादेशकडून प्रयत्न केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी कुशियारा नदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तीस्ता नदीचा वाद सोडवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
विश्लेषण : अमित शहांचे ‘मिशन मुंबई’ भाजपला फळणार का? मुंबई महापालिका राखणे उद्धवना जमणार का?
भारत आणि बांगलादेशमध्ये पाणी वाटपाबाबत वाद का आहेत?
गेल्या अनेक दशकांपासून भारत आणि बांगलादेशमध्ये तीस्ता आणि गंगा या नद्यांच्या पाणी वाटपावरुन वाद निर्माण झाला आहे. या दोन्ही नद्या मच्छिमार, नाविक आणि शेतकऱ्यांसाठी पाण्याचा महत्त्वाच्या स्त्रोत आहेत. भारत आणि बांगलादेश दरम्यान वाहणाऱ्या गंगा नदीचा वाद ३५ वर्ष जुना आहे. यासंदर्भात आजपर्यंत दोन्ही देशांमध्ये अनेक द्विपक्षीय बैठका झाल्या आहेत. मात्र, अद्याप या नदीच्या पाणी वाटपाबाबत तोडगा निघू शकलेला नाही. १९९६ साली बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा या नेत्यांनी पाणी वाटपासंदर्भात ३० वर्षांपूर्वी एका करारावर स्वाक्षऱ्या केला होत्या. हा करार लवकरच संपुष्टात येणार आहे.
दरम्यान, तीस्ता नदीच्या पाणी वाटपावरुन १९८६ सालापासून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या नदीच्या पाण्याचे विशिष्ट प्रमाणात दोन्ही देशांना वाटप व्हावे, यासाठी काही वर्षांपूर्वी एक कराराचा मसुदा तयार करण्यात आला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या करारातून ऐनवेळी माघार घेतल्यानंतर हा करार फिस्कटला होता.
विश्लेषण : चीन सीमेवर पहिल्या फळीतील संरक्षण आयटीबीपीकडे? निर्णय का ठरणार वादग्रस्त?
कुशियारा नदी करारामुळे कुणाला फायदा?
१९९६ साली गंगा नदी करार केल्यानंतर भारत आणि बांगलादेशने पहिल्यांदाच मंगळवारी कुशियारा नदीच्या पाणी वाटपाबाबत करार केला आहे. या करारामुळे भारतातील दक्षिण आसाम आणि बांगलादेशमधील सिल्हेट प्रांताला फायदा होणार आहे. भारत आणि बांगलादेशला जोडणाऱ्या भागातून एकूण ५४ नद्या वाहतात. त्यापैकीच कुशियारा ही एक नदी आहे. १६० किलोमीटर लांबीच्या या नदीमुळे भारतातील मणिपूर, मिझोराम आणि आसाममधील पाणी प्रश्न सोडवण्यास यामुळे मदत होणार आहे.