ज्ञानेश भुरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा ४३ वर्षीय टेनिसपटू रोहन बोपण्णाने मॅथ्यू एब्डेनच्या साथीने खेळताना ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. या कामगिरीसह त्याने दुहेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान निश्चित केले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा बोपण्णा सर्वांत वयस्कर टेनिसपटू ठरला. त्याच्या या उत्तुंग यशाचा मागोवा.

बोपण्णाचे यश खास का?

बोपण्णाने एब्डेनच्या साथीने खेळताना कमालीची सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आता या जोडीला ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारण्यातही यश आले. या निकालामुळे पुढील आठवड्यात एटीपीची नवी जागतिक क्रमवारी जाहीर होईल, तेव्हा बोपण्णा दुहेरीत अव्वल स्थानावर येईल. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर येणारा बोपण्णा हा पहिला टेनिसपटू ठरला आहे. यापूर्वी राजीव राम हा अमेरिकेचा टेनिसपटू २०२२मध्ये वयाच्या ३८व्या वर्षी अव्वल क्रमांकावर पोहोचला होता.

हेही वाचा… विश्लेषण: गिधाडे नामशेष होण्याच्या मार्गावर? संवर्धनासाठी कोणते प्रयत्न? गिधाडांची उपयुक्तता काय?

दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठणारे भारतीय टेनिसपटू किती?

टेनिसविश्वात भारताच्या पुरुष किंवा महिला खेळाडूने एकेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी मजल मारलेली नाही. तुलनेत दुहेरीत भारतीय खेळाडूंनी चांगले यश मिळवले आहे. पुरुष खेळाडूंमध्ये लिएंडर पेस आणि महेश भूपती ही सर्वांत यशस्वी भारतीय जोडी होती. यामध्ये सर्वप्रथम भूपतीने एप्रिल १९९९ मध्ये दुहेरीत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर त्याच वर्षी पेसने जून महिन्यात अव्वल स्थान मिळवले. भूपतीचे अव्वल स्थान चारच आठवडे टिकले, पण पेस ३९ आठवडे अव्वल स्थानावर होता. महिला विभागात सानिया मिर्झाने अशी कामगिरी केली आहे. सानिया महिला दुहेरीत एप्रिल २०१५मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानापर्यंत पोहोचली होती. ती ९१ आठवडे या स्थानावर होती.

बोपण्णा-एब्डेन जोडीची कामगिरी कशी राहिली?

व्यावसायिक टेनिसमध्ये गेली दोन वर्षे बोपण्णा आणि एब्डेन एकत्र खेळत आहेत. गेल्या वर्षभरात दुहेरीमध्ये सर्वाधिक सातत्य या जोडीनेच राखले आहे. गेल्या वर्षी ही जोडी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. ग्रँडस्लॅम स्पर्धेतील त्यांची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यापूर्वी फेब्रुवारीत या जोडीने कतार खुल्या स्पर्धेत विजेतेपद मिळवले. मार्चमध्ये त्यांनी इंडियन वेल्स स्पर्धा जिंकून सातत्य राखले. जुलै महिन्यात या जोडीने विम्बल्डनच्या उपांत्य फेरीतही प्रवेश केला होता.

हेही वाचा… गणिताविषयी विद्यार्थ्यांची आकलनशक्ती चिंताजनक? स्मार्टफोनकडे वाढता कल? काय आढळले ‘असर’च्या पाहणीत?

बोपण्णा ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये किती यशस्वी ठरला आहे?

बोपण्णाने २०१७मध्ये कॅनडाच्या गॅब्रिएला डाब्रोवस्कीच्या साथीने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवले होते. पुरुष दुहेरीत अद्याप त्याला ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आलेली नाही. दोन वेळा तो अमेरिकन स्पर्धेत उपविजेता राहिला. प्रथम २०१०मध्ये पाकिस्तानचा ऐसाम अल हक कुरेशी, तर गेल्या वर्षी एब्डेन त्याचा साथीदार होता. बोपण्णा १००० मानांकनाची स्पर्धा जिंकणाराही सर्वांत वयस्कर खेळाडू आहे. त्याने गेल्या वर्षी वयाच्या ४३व्या वर्षीच इंडियन वेल्स ही स्पर्धा जिंकली.

बोपण्णाचे यश भारतीय टेनिससाठी प्रेरणादायी का ठरेल?

लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा अशा प्रमुख खेळाडूंच्या निवृत्तीनंतर भारतीय टेनिस आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या परिवर्तनाच्या वाटेवरून जात आहे. टेनिसपटू अनेक आहेत, पण त्यांच्यात सातत्याचा अभाव आहे. बोपण्णाने राष्ट्रीय पातळीवरून गेल्या वर्षीच निवृत्ती घेतली आहे. अशा वेळी व्यावसायिक पातळीवर कमालीच्या निग्रहाने खेळताना वयाच्या ४३व्या वर्षी अव्वल स्थानापर्यंत बोपण्णाची मजल भारतीय टेनिसला वेगळी दिशा देणारी ठरेल. विशेष म्हणजे याच वर्षी ऑस्ट्रेलियन स्पर्धेत सुमित नागल एकेरीत दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचला होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohan bopanna at the age of 43 achieved top performance in tennis print exp asj