काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहमद यांनी भारतीय क्रिकेट कर्णधार रोहित शर्माच्या कथित लठ्ठपणाच्या टिप्पणीवरून मोठे वादळ उठले. काँग्रेसने शमा यांना संबंधित पोस्ट मागे घ्यायला लावली. विक्रमवीर सुनील गावस्कर यांनीही ‘रोहित शर्मा क्रिकेटपटू आहे फॅशन मॉडेल नव्हे’ असे सांगत रोहितची पाठराखण केली. या निमित्ताने स्थूल क्रिकेटपटू आणि त्यांच्या कामगिरीचा आढावा घेणे योग्य ठरेल. वाढत्या वयाचा खेळावर काही परिणाम होत नाही, तसाच वाढत्या स्थूलपणाचाही खेळावर परिणाम होत नाही. मैदानावर होणारी खेळाडूची हालचाल ही सर्वात महत्त्वाची असते, असे मानणारा एक वर्ग आहे. तर चापल्य हे शरीरचणीशी निगडित असते, त्यामुळे शक्यतो बारीक आणि फिट राहणे केव्हाही हितकारक असे मानणारा आणखी एक वर्ग आहे.

वाढत्या वजनाचा खरेच फटका बसतो?

खेळाडूचे वजन हा त्याचा विषय नाही. काही खेळाडूंची अंगकाठीच मुळात स्थूल असते. त्यामुळे जाड असूनही खेळाडू मैदानावर आपली कामगिरी चोख बजावतात. पण, मैदानाबाहेरील व्यक्तींना खेळाडूच्या वाढत्या वजनाची चिंता असते. समित पटेल इंग्लंडचा असाच एक स्थूल खेळाडू. वजन कमी करण्यात अपयश आल्याने त्याल्या इंग्लंडच्या संभाव्य संघातही स्थान मिळू शकले नव्हते. पण, असेही काही खेळाडू आहेत की वजन अधिक असूनही त्यांनी मैदानावर आपली भूमिका चोख बजावली आहे.

कॉलिन मिलबर्ग

कॉलिन मिलबर्ग हा असाच ६०च्या दशकातील इंग्लंडचा एक जाडजूड खेळाडू. याचे वजन साधारण ११४ किलोच्या आसपास असेल. पण, त्याचा खेळावर काही परिणाम झाला नाही. त्याचे रनिंग बिट्विन दी विकेट जबरदस्त होते आणि शॉर्टलेगवर सर्वात चपळ क्षेत्ररक्षण ही त्याची ओळख होती. एका कार अपघातात त्याने डोळा गमावला आणि त्याची कारकिर्द संपुष्टात आली होती. अखेरच्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने १३९ धावांची आणि त्यानंतर क्वीन्सलॅण्डविरुद्ध २४३ धावांची खेळी केली होती.

वारविक आर्मस्ट्रॉंग

ऑस्ट्रेलियाचा हा जाडजूड खेळाडू. साधारण १३३ किलो वजनाचा आर्मस्ट्रॉंग पहिल्या महायुद्धानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार झाला होता. त्याच्या वजनाचा त्याच्या खेळावर कधी परिणाम झाला नाही. त्याने १९२०-२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिले आठ कसोटी सामने जिंकले होते. यात पहिल्या अॅशेस व्हाईट वॉशचा समावेश होता. त्याच्या जाडीकडे दुर्लक्ष करून त्याचा खेळ पाहिला तर, तो एक हरहुन्नरी अष्टपैलू खेळाडू होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याने सहा शतके झळकावली. लेगस्पिन गोलंदाजीने त्याने ८७ कसोटी बळीही मिळविले.

जिमी आर्मंड

नव्या सहस्रकातील जिमी आर्मंड हा ऑस्ट्रेलियाचा एक गुणी खेळाडू. शंभर किलोच्या आसपास वजन आणि वेगवान गोलंदाज. मार्क वॉने हा कसोटीसाठी पुरेसा नाही असे हिणवले होते. तेव्हा त्याने एका अॅशेस मालिकेत आपली छाप पाडली आणि मी माझ्या कुटुंबातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे हे दाखवून दिले होते.

जेसी रायडर

नव्या सहस्रकातील हा न्यूझीलंडचा एक जाडजूड खेळाडू. आक्रमक फलंदाजीपेक्षा रायडर त्याचा जाडेपणा आणि मद्यपानाच्या सवयीनेच अधिक चर्चेत राहिला होता. भारताविरुद्ध २००९ मध्ये त्याने द्विशतकी खेळी केली होती. त्यापूर्वी २००८ मध्ये इंग्लंडविरुद्धचा विजय साजरा करण्यासाठी रात्री अमाप मद्यपान केले होते. छोट्या चणीचा आणि जाडजूड असला, तरी त्याचा खेळावर कधी परिणाम झाला नाही. लय गवसते तेव्हा त्याच्याविरुद्ध सर्व गोलंदाजाना काळजी घ्यावी लागते.

अर्जुन रणतुंगा

श्रीलंकेचा धूर्त कर्णधार. त्याचे वजन अगदी शंभर किलो नसेल, पण त्याच्या आसपास निश्चित होते. इतका जाड असूनही त्या काळातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज शेन वॉर्न त्याला क्रीजच्या बाहेर खेचू शकला नाही. इतक्या रणतुंगाच्या हालचाली लवचिक होत्या.

शेन वॉर्न

ऑस्ट्रेलियाचा हा सर्वात महान फिरकी गोलंदाज. हा बारीक मुळीच नव्हता. विश्वचषक स्पर्धेत असेच वजन कमी करण्यासाठी त्याने एक गोळी घेतली. त्यात बंदी घातलेले औषध होते. त्यामुळे तो उत्तेजक सेवनात सापडला आणि त्याला विश्वचषकाला मुकावे लागले होते. हा एक प्रसंग वगळता वॉर्न कधी जायबंदी राहिला नाही. मद्यपान आणि अति चीजबर्गर खाण्यामुळे त्याची चरबी वाढली होती.

माईक गॅटिंग

इंग्लंडचा हा गुण फलंदाज. दिसताना जाडजूड दिसायचा. अति चीज, लोणची आणि सॅण्डविच खाऊन त्याची चरबी वाढली होती. त्याने आपल्या खाण्याच्या सवयी बदलल्या नाहीत. पण, त्याचा परिणाम त्याच्या खेळावर झाला नाही. तो ७९ कसोटी सामने खेळला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९४ शतके झळकावली.

रखीम कॉर्नवॉल

वेस्ट इंडिजचा हा अलिकडच्या काळातील भारदस्त खेळाडू. सर व्हिवियन रिचर्ड्स यांच्या अॅण्टिगा देशातील रखीमला अष्टपैलू खेळाडू मानले जाते. रखीमचे वय तब्बल १४० किलो..पण, ते विसरून त्याने मैदानावर आपल्या खेळाची छाप पाडली. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेट खेळणारा सर्वात जाड खेळाडूचा विक्रम त्याच्या नावावर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये लीवार्डस आईसलॅंण्डकडून खेळताना त्याने प्रथम श्रेणी आणि अ श्रेणी अशा दोन्ही क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजात तो दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. कसोटीत ३५, तर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ३६ गडी बाद केले आहेत. कसोटीत २६१ धावा असल्या तरी, ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ७५ सामन्यात १५४१ धावा केल्या आहेत.

अलिकडचे क्रिकेटपटू तंदुरुस्तीसाठी जागरुक?

खेळाच्या सरावाबरोबर अलिकडे तंदुरुस्ती आणि मानसिकतेला अधिक महत्त्व आले आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये तंदुरुस्तीविषयी जागरुकता अधिक वाढली आहे. आहाराविषयी खेळाडू अधिक काळजी घेताना दिसून येतात. योग्य आहारामुळे खेळाडू एका विशिष्ट पातळीवर खेळाडूंना आपला बांधा सुडौल राखण्यास मदत मिळत आहे. त्यामुळे जाडजूड किंवा स्थूल खेळाडू अभावानेच दिसून येत आहेत.

खेळ महत्त्वाचा की शरीरयष्टी?

खेळाडू जेव्हा मैदानावर उतरतात तेव्हा निश्चितपणे त्यांच्या खेळाकडे अधिक पाहिले जाते. त्यांची शरीरयष्टी कशी आहे हे मुद्दा गौण असतो. सडपातळ असणे किंवा जाड असणे ही खेळाडूच्या तंदुरुस्तीची व्याख्याच होऊ शकत नाही. तुम्हाला जर सडपातळ खेळाडू बघायचे असतील, तर तिकडे जाहिरातींच्या रॅम्पवर जा हे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचे विधान याबाबतीत खूप सूचक ठरते.

Story img Loader