अमोल परांजपे
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पक्षात होणाऱ्या प्राथमिक फेरीमध्ये (प्रायमरीज्) आता रंगत निर्माण झाली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसँटिस यांच्या रूपात खरा प्रतिस्पर्धी मिळाला आहे. आपल्या उमेदवारीची घोषणा कल्पकतेने करण्याचा प्रयत्न डिसँटिस यांच्या काहीसा अंगाशी आला, हे खरे असले तरी जाणकारांच्या मते त्याचा फारसा परिणाम होणार नाही. डिसँटिस विरुद्ध ट्रम्प ही लढाई कशी असेल, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
रॉन डिसँटिस कोण?
रिपब्लिकन पक्षाच्या प्रायमरीजमध्ये उमेदवारी जाहीर केलेले डिसँटिस हे फ्लोरिडा या अमेरिकेतील राज्याचे गव्हर्नर आहेत. कडवे रिपब्लिकन अशी ओळख असलेले आणि उजव्या विचारसरणीचे नेते डिसँटिस यांचे उच्च शिक्षण येल आणि हार्वर्ड या प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये झाले आहे. ४४ वर्षांचे डिसँटिस २०१२मध्ये फ्लोरिडाच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये निवडून गेले. त्यानंतर सहा वर्षांनी, २०१८ साली ते गव्हर्नर म्हणून निवडून आले आणि २०२२ साली त्यांची फेरनिवड झाली. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या डिसँटिस यांनी काही काळ अमेरिकेच्या नौदलामध्ये विधि अधिकारी म्हणूनही काम केले आहे. समलिंगी विवाह, गर्भपात आदी गोष्टींना त्यांचा विरोध आहे.
ट्रम्प आणि डिसँटिस यांचे संबंध कसे आहेत?
एकाच पक्षाचे असल्यामुळे दोघांमध्ये वैचारिक समानता असून आतापर्यंत दोघे एकमेकांचे समर्थकही राहिले आहेत. ट्रम्प यांनी गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत डिसँटिस यांना जाहीर पाठिंबा दिला होता. डिसँटिस यांनी आपल्या प्रचारामध्ये ट्रम्प यांच्या अनेक धोरणांचे उघड समर्थन केले आहे. गेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डिसँटिस ट्रम्प यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मात्र त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. डिसँटिस यांनी उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी तेच आपले खरे पक्षांतर्गत विरोधक असणार, याची ट्रम्प यांना खात्री होती. त्यामुळे त्यांनी डिसँटिस यांच्यावर उघड हल्लाबोल यापूर्वीच सुरू केला आहे. डिसँटिस यांनी अद्याप ट्रम्प यांचे नाव घेऊन विरोध केला नसला, तरी त्यांच्या काही धोरणांवर टीका करण्यास प्रारंभ केला आहे. येत्या काळात दोघांमधील कटुता (किमान जाहीरपणे) आणखी वाढत जाईल, हे उघड आहे.
रिपब्लिकन प्रायमरीजचे सध्याचे चित्र काय आहे?
ग्रँड ओल्ड पार्टी अर्थात रिपब्लिकन पक्षात एकापेक्षा एक तुल्यबळ उमेदवार रिंगणात आहेत. ट्रम्प, डिसँटिस, साऊथ कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निक्की हॅले, अलास्काचे गव्हर्नर असा हचिसन, दूरचित्रवाणी निवेदक लॅरी एल्डर, उद्योजक विवेक रामस्वामी, सिनेटर टिम स्कॉट या प्रमुख नेत्यांसह आणखी चौघांनी आतापर्यंत आपली उमेदवारी जाहीर केली आहे. माजी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांच्यासह आणखी पाच ते सहा जण इच्छुक असले, तरी त्यांनी अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर केलेली नाही. तरी मुख्य लढत ट्रम्प विरुद्ध डिसँटिस अशीच असेल. त्यातही सध्या तरी ट्रम्प हेच आघाडीवर आहेत. ‘सीएनएन’च्या ताज्या सर्वेक्षणानुसार ५३ टक्के रिपब्लिकन मतदारांचा कल ट्रम्प यांच्याकडे असून त्यापेक्षा निम्म्या, २६ टक्के मतदार डिसँटिस यांच्या पाठीशी आहेत. डिसँटिस यांना ही २७ टक्क्यांची दरी बुजवायची असेल, तर अपार कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्या दिशेने त्यांनी कामही सुरू केले आहे.
डिसँटिस यांचे प्रचाराचे नियोजन काय?
उमेदवारी जाहीर केल्यानंतर २४ तासांतच ८२ लाख डॉलर देणगी स्वरूपात जमा झाल्याचे डिसँटिस यांच्या प्रचार कार्यालयाने जाहीर केले. त्याबरोबरच या प्रदीर्घ लढ्याचा पहिला टप्पा म्हणून पुढल्या आठवडाभरात त्यांचा तीन राज्यांमध्ये वादळी दौरा आखण्यात आला आहे. प्रायमरीजच्या वेळापत्रकानुसार सर्वात आधी मतदान होऊ घातलेल्या आयोवा, न्यू हॅम्पशायर आणि साऊथ कॅरोलिना राज्यांतील किमान १२ शहरांमध्ये त्यांचे कार्यक्रम होतील. डिसँटिस यांच्या राजकीय कृती समितीने (पीएसी) दिलेल्या माहितीनुसार प्रचार मोहिमेच्या बँक खात्यात ३.३० कोटी डॉलर जमा असून आतापर्यंत ३० पूर्णवेळ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ट्रम्प यांच्यासह अन्य कोणत्याच उमेदवाराची इतकी तयारी नसल्याचे जाणकार सांगतात. आगामी काळात डिसँटिस यांची लोकप्रियता किती पटींनी वाढते, यावर प्रायमरीजचे निकाल अवलंबून असतील.
ट्विटरवरील गोंधळाचा फटका बसेल?
पत्रकार परिषद किंवा दृकश्राव्य संदेशाद्वारे उमेदवारी जाहीर करण्याच्या पद्धतीला डिसँटिस यांनी छेद दिला. थेट ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांना ‘ट्विटर स्पेसेस’ या व्यासपीठावर त्यांनी मुलाखत दिली. मात्र या कार्यक्रमादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडाचीच चर्चा सध्या अधिक रंगली आहे. अर्थात, डिसँटिस यांना याचा दूरगामी फटका बसण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आणखी आठवडाभराने लोक हा मुद्दा विसरूनही जातील, असा त्यांचा दावा आहे. आता त्यांचे प्रतिस्पर्धी ट्रम्प या मुद्द्याचा प्रचारासाठी कसा आणि किती वापर करतात त्यावर डिसँटिस यांना किती फटका बसेल, हे स्पष्ट होईल.
amol.paranjpe@expressindia.com