Nepalese Royal Massacre of 2001: सत्ता कोणाला नको असते, राजसत्तेतील झुंडशाही नको म्हणून लोकशाहीचा पाया रचला गेला. परंतु, लोकशाहीच्या आडून सत्ताप्रेमी आपलं इप्सित साधतात, हे दर्शवणारी परिस्थिती कमी- अधिक फरकाने संपूर्ण जगात आहे. सध्या नेपाळ याच कारणासाठी गाजत आहे. नेपाळमधील राजपरिवाराच्या पुनर्स्थापनेसाठी आंदोलनं होतं आहेत. नेपाळ पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हावं, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भूतपूर्व राजे ज्ञानेंद्र हे पुन्हा एकदा राजसत्तेच्या वाटेवर आहेत. आज ही अशी परिस्थिती असली तरी २४ वर्षांपूर्वी जे घडलं, ते नेपाळच्या इतिहासातून पुसून टाकणं अशक्य आहे. बंदुकीच्या गोळ्या सुटत राहिल्या, रक्त सांडत राहिले… आणि नेपाळी इतिहासाला कलाटणी मिळाली. त्याच पार्श्वभूमीवर ज्ञानेंद्र शाह यांच्यावर आरोप होत असलेल्या शाही हत्याकांडाचा घेतलेला हा वेध.
नेपाळमधील शाही हत्याकांडाची रात्र
१ जून २००१, तो शुक्रवारचा दिवस होता. त्या रात्रीच नेपाळच्या इतिहासाला एका महत्त्वपूर्ण घटनेने कलाटणी मिळाली आणि ती रात्र काळरात्रच ठरली. महिन्यातून दोन वेळा जेवणासाठी एकत्र येण्याचा प्रघात नेपाळच्या शाही कुटुंबात होता. तो दिवसही तो प्रघात पाळण्याचाच अर्थात ‘सहभोजना’चा होता. राजा बीरेन्द्र, राणी ऐश्वर्या आणि त्यांची तीन मुलं युवराज दीपेन्द्र, राजकुमारी श्रुती आणि राजकुमार निरंजन शिवाय राजाचे धाकटे बंधू, त्यांची पत्नी आणि मुलं, राजाच्या तीन बहिणी आणि एका बहिणीचा पती, राजकुमारी श्रुतीचा पती आणि राजाचे दोन चुलत भाऊही एकत्र जमले होते. राजकुमार ज्ञानेंद्र तिथे नव्हते परंतु त्यांची पत्नी, तीन मुली आणि जावई हजर होते.
धुंदी नक्की कशाची?
त्यादिवशी युवराज दीपेन्द्र फेमस ग्राउज व्हिस्की पिऊन आणि गांजाची सिगारेट ओढत जेवणाला आले होते, असा जबाब प्रत्यक्षदर्शीने नोंदवला होता. त्याच धुंदीत त्यांचा एकाशी वाद झाला. त्यामुळेच राजकुमार निरंजन आणि एका पाहुण्याने त्यांना त्यांच्या खोलीत परत नेले. त्यानंतर खोलीतून दीपेन्द्रने आपली मैत्रीण देवयानी राणाला तीन वेळा कॉल केला. तिने नंतर अधिकाऱ्यांना सांगितले की, दीपेन्द्र बोलताना जरा गुंगीत असल्यासारखे वाटत होते, पण तिसऱ्या कॉलमध्ये त्यांनी सांगितले की, ते झोपायला जात आहेत. मात्र, झोपण्याऐवजी दीपेन्द्र लष्करी कपडे घालून खोलीबाहेर आले, त्यांच्या हातात तीन बंदुका होत्या. त्यापैकी एक M16 रायफल होती.
हवं तर मला मार….
याच अवस्थेत राजमहलातील एका सेवकाने दीपेन्द्रला जिन्यावर पाहिले. परंतु, त्याला काही विशेष वाटले नाही. कारण दीपेन्द्र यांना असलेले बंदुकांचे वेड सर्वांनाच माहीत होते. जेवणाचा कार्यक्रम नारायणहिटी पॅलेसच्या बिलियर्ड रूममध्ये होता. हा खासगी कार्यक्रम असल्याने तिथे कोणतेही सुरक्षारक्षक उपस्थित नव्हते. दीपेन्द्रने प्रथम आपल्या वडिलांवर म्हणजेच राजा बीरेन्द्र यांना गोळ्या घातल्या. गोळ्यांचा आवाज ऐकून राजमहलातील सहाय्यकांनी काच फोडून इतर कुटुंबियांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे नंतर सांगण्यात आले. गोळीबार सुरुच राहिला आणि दीपेन्द्रने इतर अनेक कुटुंबियांची हत्या केली. त्यानंतर तो बागेत असलेल्या आपल्या आईला शोधण्यासाठी गेला. लहान भाऊ निरंजन याने विनवणी केली, “कृपया, असं करू नकोस. हवं तर मला मार.” दीपेन्द्रने आपल्या लहान भावालाही गोळ्या घालून ठार केले आणि नंतर आपल्या आईचीही हत्या केली.

तो पुन्हा शुद्धीवर कधीच आला नाही….
दीपेन्द्रने नऊ कुटुंबियांची हत्या केल्यानंतर त्याचे काका पुढे आले आणि त्याला म्हणाले, “तू खूप नुकसान केलं आहेस, आता बंदूक खाली ठेव.” यावर दीपेन्द्रने त्यांच्यावरही गोळी झाडली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडली. जखमी दीपेन्द्रला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तो तीन दिवस कोमामध्ये होता. तो पुन्हा शुद्धीवर कधीच आला नाही. ४ जून रोजी त्याचा मृत्यू झाला आणि त्या रात्री राजमहलात नसलेले त्याचे काका ज्ञानेंद्र हे नेपाळचे शेवटचे राजा ठरले.

एकूणच, दीपेन्द्रने नऊ कुटुंबियांची हत्या केली आणि चार जणांना जखमी केले. दीपेन्द्र बेशुद्ध असताना ज्ञानेंद्र यांनी राजप्रतिनिधी म्हणून ही घटना अपघाती गोळीबारामुळे झाली आहे असे म्हटले होते. नंतर ज्ञानेंद्र यांनी स्पष्ट केले की, त्यांनी हे विधान “कायदेशीर आणि घटनात्मक अडचणींमुळे” केले. कारण संविधान आणि परंपरेनुसार जर दीपेन्द्र वाचला असता तर त्याच्यावर खटला चालवता आला नसता. घटनेची चौकशी करण्यात आल्यावर दीपेन्द्रच या हत्यांना जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले.
युवराज दीपेन्द्र
नेपाळच्या शाही हत्याकांडाचा सूत्रधार युवराज दीपेन्द्र याचा जन्म २७ जून १९७१ रोजी झाला. त्याच्या जन्माच्या सात महिन्यांनंतर त्याचे वडील नेपाळचे राजा झाले. त्याचे प्राथमिक आणि विद्यापीठीय शिक्षण नेपाळमध्ये झाले. तर पुढचे शिक्षण त्याने युनायटेड किंगडममधील ईटन कॉलेजमध्ये घेतले. दीपेन्द्र हा नीटनेटका मुलगा होता असे काहींचे मत होते, तर काही जणांसाठी तो क्रूर होता. २०११ साली राजमहलात २६ वर्षे सेवा दिलेल्या एका सेवकाने सांगितले, “लहानपणी त्याला ज्या प्रकारचं प्रेम मिळायला हवं होतं ते मिळालं नाही, त्यामुळे कदाचित त्याच्यावर परिणाम झाला असावा.”
बंदुकांबद्दल आकर्षण
दीपेन्द्रला लहानपणापासून बंदुकांबद्दल आकर्षण होते. आठव्या वर्षी त्याला पहिली बंदूक भेट म्हणून मिळाली होती. शिवाय तो आपल्या वडिलांबरोबर लष्करी प्रशिक्षण केंद्रांमध्ये जायचा तेव्हा तिथल्या सैनिकांकडून बंदुका हिसकावून घ्यायचा. इतर राजघराण्यातील सदस्य स्वतःकडे बंदुका ठेवायचे, पण दीपेन्द्र आपल्या खोलीत लोड केलेल्या बंदुका कपड्यांसारख्या ठेवायचा. दीपेन्द्र रोज तासन्तास गोळीबाराचा सराव करत असे. त्यामुळे राजमहलातील कर्मचारी आणि शेजारी या गोळीबाराच्या आवाजाला सरावले होते.

प्रेमात अपयश
किशोर वयात असताना दीपेन्द्र आपल्या दुसऱ्या पिढीतल्या चुलत बहिणीच्या प्रेमात पडला. त्याच्या आईने हे नाते नाकारले आणि त्याला इंग्लंडमधील ईटन कॉलेजला पाठवले. तिथे त्याची भेट देवयानी राणाशी झाली. ती नेपाळमधील एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी होती. दीपेन्द्रसाठी हे पहिलेच प्रेम होते. मात्र, त्याच्या कुटुंबाला हे नाते मान्य नव्हते. देवयानीचे पणजोबा नेपाळचे शेवटचे राणा पंतप्रधान होते. तिच्या आईची आजी भारतातील एका राजघराण्याशी संबंधित होती. त्यामुळे हे नाते नेपाळच्या राजघराण्याला झाकोळून टाकेल किंवा त्यावर विदेशी प्रभाव टाकू शकेल अशी भीती दीपेन्द्रच्या आई-वडिलांना होती.
निम्न जातीची अडचण
देवयानीचे कुटुंब अतिशय श्रीमंत होते. ते नेपाळच्या राजघराण्यापेक्षा निम्न जातीतले असल्यामुळे देवयानी भावी राणी होण्यासाठी अयोग्य मानली जात होती. असेही सांगितले जाते की, देवयानीची आई राणी ऐश्वर्या यांना भेटली, तेव्हा देवयानीच्या आईला सांगण्यात आलं की, देवयानीला अतिशय ऐशोआरामाची सवय आहे आणि नेपाळच्या राजघराण्यात लग्न केल्यास तिच्या जीवनशैलीत घसरण होईल. राजा बीरेन्द्र यांना देखील हे नाते मान्य नव्हते आणि त्यांनी दीपेन्द्रला इशारा दिला होता की, जर त्याने देवयानीशी लग्न केलं, तर त्याला युवराजपदावरून दूर केले जाईल. जून २००१ च्या मध्यात दीपेन्द्रचा ३० वा वाढदिवस जवळ येत असताना, त्याच्या कुटुंबियांनी त्याच्यावर लग्नाचा दबाव टाकायला सुरुवात केली होती. त्यांनी त्याच्यासाठी दोन मुलींची निवडही केली होती. दीपेन्द्रने एक उल्लेखनीय लष्करी कारकीर्द गाजवली होती आणि नेपाळी जनतेमध्ये तो अत्यंत लोकप्रिय होता; योग्य मुलीशी लग्न केल्यास राजसत्ता अधिक मजबूत झाली असती.
२००१ साली मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या बातमीत
मे २००१ च्या अखेरीस प्रसिद्ध झालेल्या एका लेखात दीपेन्द्र अजूनही अविवाहित का आहे आणि त्याचा युवराजपदाचा अधिकार धोक्यात आहे का, हा विषय हाताळण्यात आला होता. या लेखात असेही नमूद होते की, दीपेन्द्र कदाचित ३० वर्षांपर्यंत अविवाहित राहिलेला नेपाळी राजघराण्यातील पहिला सदस्य आहे. तसेचत्याचे लग्न लवकर व्हावे, अशी नेपाळी जनतेची अपेक्षा होती. मात्र, दीपेन्द्रने ठरवले होते की, प्रेमात पडलेल्या स्त्रीशी लग्न करता येणार नसेल तर तो लग्न करणार नाही. हा आणि १९९० साली झालेला घटनात्मक बदल हे दोन्ही घटक नेपाळमधील शाही हत्याकांडामागचे कारण मानले जातात.