भक्ती बिसुरे
नियमित लसीकरण मोहिमेत गोवर लशीचा समावेश करून गोवरमुक्त होण्याचे लक्ष्य केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून निश्चित करण्यात आले, मात्र नुकत्याच झालेल्या गोवर उद्रेकामुळे गोवरमुक्तीचा कार्यक्रम लांबणीवर पडेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून महाराष्ट्रात आणि देशातील काही इतर भागांमध्ये गोवरचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे २०२३पर्यंत गोवरमुक्त होण्याचे लक्ष्य आता लांबणीवर पडले आहे.
गोवरचे स्वरूप आणि लक्षणे?
गोवर हा प्रामुख्याने लहान मुलांना होणारा साथीचा आजार आहे. पॅरामिक्सो व्हायरस या विषाणूमुळे गोवर पसरतो. गोवर झालेली व्यक्ती खोकली किंवा शिंकली तर हवेतून हे विषाणू नाकावाटे शरीरात प्रवेश करतात. विषाणू शरीरात गेल्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून गोवरची लक्षणे दिसू लागतात. गोवर झालेल्या मुलांच्या थेट संपर्कात येणाऱ्या मुलांना आणि काही मोठ्या माणसांनाही गोवर होऊ शकतो. लहान मुलांमध्ये सुरुवातीला सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे, अंग दुखणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात. त्यानंतर पाचव्या दिवसांनंतर अंगावर लाल पुरळ येतो. लवकरात लवकर निदान आणि उपचार झाले की गोवर संपूर्ण बरा होतो. काही वेळा हा आजार गंभीर होण्याचा धोका असतो.
गोवरमुक्तीचे लक्ष्य महत्त्वाचे का?
दरवर्षी गोवरमुळे जगातील एक लाख लहान मुलांचा मृत्यू होतो. या आजारावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असूनही हे मृत्यू होतात, हे विशेष आहे. गोवर आणि रुबेला हे दोन लस मात्रांच्या मदतीने संपूर्ण टाळणे शक्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार मागील दोन दशकांमध्ये, गोवर लशीमुळे जागतिक स्तरावर ३० लाख मुलांचे मृत्यू टाळणे शक्य झाले आहे. २०१५पर्यंत गोवरमुक्त होण्याचे लक्ष्य कालांतराने २०१९पर्यंत पुढे ढकलण्यात आले. मात्र, २०१९ आणि २०२०पर्यंतही ते साध्य न झाल्याने २०२३पर्यंत गोवरमुक्त होण्याचे नवे लक्ष्य ठरवण्यात आले, मात्र नोव्हेंबरनंतर सुरू झालेल्या उद्रेकांमुळे तेही लक्ष्य आता पुढे ढकलले जाईल, हे स्वाभाविक आहे.
विश्लेषण : देशात करोनाची पुढची लाट का आली नाही? सद्यस्थिती काय आहे?
२०२२ मध्ये काय झाले?
ऑक्टोबर २०२२पासून महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत गोवरचा उद्रेक झाल्याचे दिसून आले. संसर्ग झालेल्या शेकडो मुलांपैकी किमान १५ मुलांचा या उद्रेकामध्ये मृत्यू झाला. दरवर्षी हिवाळ्यात काही प्रमाणात गोवरचे रुग्ण वाढलेले पाहायला मिळतात. मात्र, २०२०-२०२१ च्या हिवाळ्यात असे उद्रेक झाले नाहीत. त्यामुळे त्या दोन वर्षांमध्ये गोवरच्या तडाख्यातून सुटलेल्या मुलांना २०२२मध्ये संसर्ग झाला असण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या संसर्गामुळे निर्मूलनाचे लक्ष्य लांबणीवर पडणार असले, तरी त्याचा उपयोग समूहाला रोगप्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) मिळवून देण्यास होईल, असा आशावादही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
उद्दिष्टपूर्तीचे प्रयत्न?
भारताने २०१०-२०१३ या काळात १४ राज्यांमध्ये नऊ महिने ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी टप्प्याटप्प्याने गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण केले. या काळात सुमारे ११.९ कोटी मुलांचे लसीकरण पूर्ण केले. २०१४मध्ये मिशन इंद्रधनुष ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. त्यात २०१७-२०२१ या काळात भारताने गोवर आणि रुबेला निर्मूलनासाठी एक राष्ट्रीय योजना स्वीकारली. या अंतर्गत गोवर लस ही देशाच्या नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग झाली. सातत्याने ९५ टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले असता गोवरचा धोका कायमस्वरूपी नियंत्रणात राहतो, असे तज्ज्ञांकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात गोवर लशीचा आंतर्भाव केल्याने ९५ टक्के लसीकरणाच्या उद्दिष्टाच्या जवळ राहणे शक्य झाले. मोहिमेच्या उपयुक्ततेची खातरजमा करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी २०१८ आणि २०२०मध्ये केलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये २,५७० मुलांची निवड केली. या चाचण्यांमधून मुलांमधील रोगप्रतिकारशक्तीत लक्षणीय वाढ झाली आहे, मात्र काही भागांमध्ये त्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आल्याचे आयसीएमआरने स्पष्ट केले.
जागतिक आरोग्य संघटनेचे मत काय?
देशाच्या कानाकोपऱ्यात लसीकरणाची व्याप्ती पोहोचवणे, अंगणवाडी सेविका आणि एकात्मिक बाल विकास योजनेसारख्या उपक्रमांची त्यासाठी मदत घेणे यातून गोवरमुक्तीच्या उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल करणे शक्य आहे. गोवरमुक्तीचे लक्ष्य साध्य करणे भारतासाठी अवघड नाही, असा आशावाद जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. संघटनेचे भारतातील प्रतिनिधी म्हणतात, सर्व राज्यांच्या आणि केंद्र शासित प्रदेशांच्या कानाकोपऱ्यात सर्वेक्षण करणे, संशयित रुग्ण शोधून त्यांच्या चाचण्या करणे, त्यांच्या परिसरातील इतर लहान मुलांचे लसीकरण करणे अशा अनेक उपाययोजनांद्वारे गोवर निर्मूलनाचे उद्दिष्ट गाठणे शक्य आहे, असा दिलासा जागतिक आरोग्य संघटनेने भारताला दिला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) उपसंचालक डॉ. प्रभदीप कौर म्हणाल्या, गोवर संसर्गाचा धोका सर्वत्र सर्व काळ आहे, मात्र या आजारासाठी प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे, ही बाब समाधानकारक आहे. लसीकरणाच्या प्रचार आणि प्रसाराच्या मदतीने गोवर निर्मूलनाचा प्रवास सोपा होईल, असेही डॉ. कौर यांनी स्पष्ट केले आहे.
bhakti.bisure@expressindia.com