दक्षिण युक्रेनच्या खेरसन शहरातून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा रशियाने केली आहे. या प्रदेशात युक्रेनचा दबाव वाढल्याने रशियाने हा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारीत सुरु झालेल्या रशिया-युक्रेन युद्धात या निर्णयाने युक्रेनची बाजू भक्कम केली आहे. सैनिकांचा जीव वाचवण्यासाठी डनिप्रो नदीच्या डाव्या किनाऱ्यावरील सैन्य मागे घेत आहोत, अशी माहिती रशियन सैन्याचे कमांडर जनरल सर्गेई सुरोविकीन यांनी माध्यमांशी बोलताना दिली. खेरसन शहर क्रिमियन द्वीपकल्पाच्या उत्तरेत डनिप्रो नदीच्या काठावर वसलेले आहे. डनिप्रो युक्रेनची सर्वात लांब तर युरोपातली चौथी सर्वात लांब नदी आहे. या नदीमुळे शहर दोन भागांमध्ये विभागले गेले आहे.
विश्लेषण : रशियाच्या उरात धडकी भरवणारा ‘डर्टी बॉम्ब’ नेमका आहे तरी काय?
रशियाच्या सैन्य माघारीचा अर्थ काय?
खेरसनमधून रशियाच्या सैन्य माघारीच्या घोषणेबाबत युक्रेनच्या गोटात साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. “आज माध्यमांमध्ये खूप आनंद आहे, ते कशासाठी हे स्पष्ट आहे. शत्रू आपल्यासाठी भेटवस्तू आणत नसून आपण आपल्या भावनांवर संयम ठेवला पाहिजे”, असे विधान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केले आहे.
विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धामुळे किरणोत्साराचा दुहेरी धोका का संभवतो? आण्विक अपघाताची भीती किती?
“कृती शब्दांपेक्षा मोठी असते. रशिया खेरसनमधून लढाईशिवाय जाईल, याची चिन्ह आम्हाला दिसत नाही. रशियाच्या सैन्य तुकड्या या शहरात आहेत तर प्रदेशात राखीव दलही तैनात आहे. युक्रेन गुप्तचर विभागाच्या माहितीच्या आधारे हा प्रदेश शत्रूपासून मुक्त करत आहे, टीव्हीवरील वक्तव्याच्या भरवश्यावर नाही”, असे ट्वीट झेलेन्स्की यांचे सल्लागार मायखाइलो पोदोलियाक यांनी केले आहे. सैन्य माघारी घेत असल्याचे भासवून नवी लढाई छेडण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याचा संशय युक्रेनच्या सैन्य अधिकाऱ्यांना आहे.
“सैन्य माघारी बोलवल्यास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल. त्यांच्यावर देशांतर्गंत टीका तर होईलच शिवाय चीन आणि भारताला यातून क्रिमियनची कमकुवत बाजू दिसेल”, अशी प्रतिक्रिया किव्हमधील पेंटा सेंटरच्या स्वतंत्र थिंक टँकचे प्रमुख वोलोडीमिर फेसेन्को यांनी ‘एपी’ वृत्तसंस्थेला दिली आहे.
खेरसनवर नियंत्रण का महत्त्वाचं आहे?
डनिप्रो नदीच्या काठावर वसलेले हे शहर धोरणात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. हे शहर क्रिमियन द्वीपकल्पाच्या सीमेला लागून आहे, ज्यावर रशियाचे २०१४ पासून नियंत्रण आहे. डनिप्रोमधील कालवा हा गोड्या पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे शत्रूपक्षाला हानी पोहोचवण्यासाठी या कालव्याला दोन्ही सैन्यांकडून लक्ष करण्यात आले होते. १८ व्या शतकात सम्राज्ञी कॅथरीन यांनी हे शहर वसवले होते. युद्धाच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये रशियाने या शहरावर ताबा मिळवला आहे. २४ फेब्रुवारीनंतर रशियाने काबिज केलेली खेरसन ही एकमेव प्रादेशिक राजधानी आहे. त्यामुळे ही राजधानी गमावणे रशियासाठी मोठा धक्का असणार आहे.