रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग-उन यांची भेट घेऊन दोन देशांतील मैत्रीचे नवे पर्व सुरू केले. मात्र या अण्वस्त्रसज्ज रशियाने विध्वंसक अस्त्रांचे तंत्रज्ञान उत्तर कोरियाला पुरवल्यास ही घटना जगासाठी विध्वंसक ठरेल. दोन्ही देशांमध्ये संरक्षण करार झाला असून, हल्ला झाल्यास परस्परांच्या मदतीला जाण्याचे वचन त्यांनी दिले आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुतिन यांच्या भेटीचे महत्त्व काय?

तब्बल २४ वर्षांनी पुतिन यांनी उत्तर कोरियाला भेट दिली. आंतरराष्ट्रीय राजकारणात एकाकी पडलेले पुतिन नव्या मित्रांच्या शोधात आहेत. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग-उन यांच्या रूपात त्यांना असा मित्र मिळालेला दिसतो. रशिया, इराण, उत्तर कोरिया, व्हेनेझुएला, क्युबा अशी अमेरिका आणि पाश्चिमात्यविरोधी देशांची आघाडी उदयास येत आहे. तीस चीनचे समर्थन असल्यामुळे या आघाडीची ताकद आणि लोकशाहीवादी देशांची डोकेदुखी वाढली आहे. 

हेही वाचा >>>वायू प्रदूषणामुळे तब्बल ८.१ दशलक्ष लोकांचा जगभरात मृत्यू; भारताची काय अवस्था?

उत्तर कोरियाचे उपद्रव मूल्य किती?

एकाधिकारशाही असलेल्या उत्तर कोरियामध्ये लाखो भूकबळींची नोंद होत नसेल, पण या देशाकडील क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्रे मात्र सातत्याने वाढत असून, त्यांची नोद मात्र हा देश आवर्जून ठेवतो आणि जगालाही आपली ताकद दर्शवतो. क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र तंत्रज्ञानात बऱ्याच प्रमाणात चीनकडून मदत घेतली. मात्र ‘शत्रूरूपी भावंड’ असलेल्या दक्षिण कोरियाला बेचिराख करू शकेल, इतकी अस्त्रे आज उत्तर कोरियाकडे आहेत. या देशाने काही वर्षांपूर्वी पाकिस्तानलाही मदत केली होती. पाकिस्तानी अण्वस्त्र कार्यक्रमाचे प्रणेते अब्दुल कादिर खान यांच्या पुढाकारातून पाकिस्तानने उत्तर कोरियाला अण्वस्त्र तंत्रज्ञान आणि सामग्री पुरवली. त्या बदल्यात उत्तर कोरियाकडून पाकिस्तानने रोडाँग हे क्षेपणास्त्र मिळवले आणि त्याचे ‘घौरी’ असे नामकरण केले. 

हेही वाचा >>>अमेरिकेतील स्थलांतरितांसाठी बायडन सरकारचे नवे धोरण; भारतीयांना कसा होणार फायदा?

रशिया-उत्तर कोरिया करार नेमका काय?

याविषयी संदिग्धता आहे. दोन देशांमध्ये यापूर्वी १९६१मध्ये संरक्षण करार झालेला होता. यावेळी झालेल्या कराराअंतर्गत दोन्ही देश परस्परांच्या तातडीने मदतीस जाणार का, हे नक्की नाही. १९६१मधील करारात तशी तरतूद होती. युक्रेन युद्धात तसेही उत्तर कोरियाला थेट सहभागी होण्याची गरज नाही. या देशाने रशियाला काही क्षेपणास्त्रे आणि ११ हजार कंटेनर इतका प्रचंड दारूगोळा पुरवल्याचे बोलले जाते. उत्तर कोरियाबरोबर लष्करी-तंत्रज्ञान सहकार्य वाढवले जाईल, असे पुतिन यांनी जाहीर केले. 

जपान आणि दक्षिण कोरियासमोर चिंता

जपान आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. परंतु रशियाबरोबर उत्तर कोरियाने करार केल्यामुळे १९५१नंतर प्रथमच कोरियन भूमीवर दोन महासत्ता आमने-सामने येऊ शकतात. अमेरिका आणि नाटोशी थेट भिडण्याची संधी रशिया हल्ली सोडत नाही. त्यामुळेच क्युबाच्या समुद्रात अण्वस्त्रसज्ज युद्धनौकांच्या कवायती किंवा युक्रेनवर हल्ला आणि आता उत्तर कोरियाशी मैत्री करार ही ठळक उदाहरणे ठरतात. 

अण्वस्त्रप्रसारबंदी धोक्यात

एके काळी अण्वस्त्रांची चाचणी घेतल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांमध्ये रशियाने अमेरिकेच्या बरोबरीने उत्तर कोरियावर निर्बंध घालण्यासाठी मतदान केले होते. पण तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. या शतकात अण्वस्त्र चाचण्या घेणारा उत्तर कोरिया हा एकमेव देश आहे. २००६नंतर या देशाने सहा अण्वस्त्रचाचण्या घेतल्या आहेत. त्याचबरोबर अमेरिकेपर्यंत जाऊ शकतील, अशा आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचीही उत्तर कोरियाने चाचणी घेतली आहे. हा विकास रशिया आणि चीनच्या आशिर्वादाने अव्याहत सुरूच राहील. त्यामुळे संपूर्ण जग असुरक्षित बनेल, अशी भीती संरक्षण विश्लेषक व्यक्त करतात. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia north korea defense agreement how destructive for the world print exp amy