– सिद्धार्थ खांडेकर
युक्रेनच्या पश्चिमेला ल्विव या शहर परिसरात आणि या शहराजवळील एका लष्करी तळावर रशियाने केलेला क्षेपणास्त्रहल्ला या युद्धाला निराळे वळण देऊ शकतो. याचे कारण आतापर्यंत रशियाने प्रामुख्याने युक्रेनच्या पूर्वेकडील, आग्नेयेकडील आणि दक्षिणकेडील शहरांना लक्ष्य केले होते. कीव्ह या राजधानीच्या शहराभोवती रशियन सैन्याने वेढा दिला आहे. खारकीव्ह, मारिओपोल, खेरसन, सुमी, चेर्नीव्ह अशा शहरांवर आतापर्यंत रशियाने हल्ले केलेले आहेत. ल्विवजवळील हल्ले मात्र पोलंड सीमेजवळ झाले आहेत. पोलंड हा उत्तर अटलांटिक करार संघटनेचा (नाटो) सदस्य असल्यामुळे हल्ल्यांची व्याप्ती नाटोच्या सीमेपर्यंत वाढल्याचे मानले जात आहे.
आतापर्यंत रशियाची चढाई युक्रेनच्या कोणत्या भागांमध्ये झालेली आहे?
रशियन फौजा युक्रेनच्या पूर्वेकडील अनेक भागांतून त्या देशात शिरल्या. डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या युक्रेनच्या काही प्रांतांमध्ये रशियन बंडखोर अनेक महिने ठाण मांडून होतेच. तर क्रिमिया हा युक्रेनच्या आग्नेयेस असलेला सीमावर्ती प्रांत २०१४मध्ये रशियाने अवैधरीत्या ताब्यात घेतलेला आहे. याशिवाय क्रिमियाच्या उत्तरेकडील खेरसन शहर, अझॉव्ह समुद्रालगतचे मारिओपोल बंदर, युक्रेनच्या पूर्व सीमेवरील खारकीव्ह शहर (येथेच भारतीय वैद्यक विद्यार्थी नवीन शेखरप्पा ग्यानागौडार रशियन फौजांच्या हल्ल्यात मरण पावला ), ईशान्य सीमेवरील सुमी हे शहर (येथेच सातशेहून अधिक भारतीय वैद्यक विद्यार्थी अडकून पडले होते), उत्तर सीमेवरील चेर्नीव्ह शहर ही सगळी सध्या रशियाच्या ताब्यात आहेत. याशिवाय उत्तर सीमेवरील चेर्नोबिल अणुभट्टी आणि झापोरिझ्झिया अणुवीज प्रकल्प ही महत्त्वाची आस्थापनेदेखील रशियाच्या ताब्यात आहेत. चेर्नोबिल युक्रेनच्या उत्तरेला बेलारूस सीमेजवळ आहे, जेथूनही रशियन फौजा युक्रेनमध्ये शिरल्या. तर झापोरिझ्झिया प्रकल्प युक्रेनच्या आग्नेयेस आहे.
ल्विवजवळ हल्ल्याचा उद्देश काय?
ल्विव शहर युक्रेनच्या पश्चिमेस पोलंडच्या सीमेजवळ आहे. अत्यंत सुंदर असे हे शहर युक्रेनची सांस्कृतिक राजधानी मानले जाते. रशियन हल्ल्यापासून बचाव करून पश्चिमेकडेल पळून जाणारे असंख्य निर्वासित या शहराचा आश्रय घेत आहेत. त्यामुळे त्याच्या आसपास क्षेपणास्त्रे हल्ले करून निर्वासितांमध्ये आणखी घबराट निर्माण करण्याचा एक उद्देश असू शकतो. ल्विव आणि पोलिश सीमा यांच्यादरम्यान असलेल्या यावोरिव लष्करी तळावरही रशियाने क्षेपणास्त्रे हल्ले केले, जे विध्वंसक होते. या हल्ल्यांत ३५ जण मरण पावल्याची प्राथमिक माहिती आहे. ल्विवपासून पोलिश सीमा ७० किलोमीटरवर आहे. यावोरिव हल्ल्याच्या एक दिवस आधी रशियाने युक्रेनच्या पश्चिमेकडील आणि पोलिश सीमेपासून साधारण १०० किलोमीटरवर असलेल्या लुट्स्क शहरावर हल्ले केले होते.
हल्ल्यांचा रोख पश्चिमेकडे नेण्याचे कारण काय?
कारणे अनेक आहेत. पाश्चिमात्य विश्लेषकांच्या मते युद्ध सुरू झाल्यानंतर १६ दिवस उलटून गेल्यानंतरही युक्रेनचा प्रतिकार चिवट आहे. अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की हार मानायला तयार नाहीत. काही महत्त्वाच्या शहरांवर रशियाचा ताबा असला, तरी युक्रेनचा विशाल भूभाग अजूनही लढतो आहे. अशा प्रकारच्या प्रतिकाराची अपेक्षा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना नव्हती. नाटोतील काही देशांनी – उदा. अमेरिका – युक्रेनला मर्यादित स्वरूपात परंतु महत्त्वाच्या युद्धसामग्रीची मदत सुरू ठेवली आहे. त्यामुळेही या मदतीला प्रतिबंध घालण्यापेक्षाही नाटोला चिथावणी देण्यासाठी रशियाने हल्ले पश्चिमेकडे वळवले असावेत. युक्रेनला युद्धसामग्री पोहोचवणाऱ्या कोणत्याही विमानाला वा जहाजाला लक्ष्य करू, असा थेट इशारा रशियाने दिलेला आहेच.
मग नाटो युद्धात खेचली जाण्याची शक्यता कितपत?
पोलंड सीमेजवळ रशियाची क्षेपणास्त्रे येऊन पडत आहेत. युक्रेनच्या पश्चिमेकडे पोलंड, स्लोव्हाकिया, हंगेरी आणि रोमानिया यांच्या सीमा त्या देशाला भिडलेल्या आहेत. हे सर्व देश नाटोचे सदस्य आहेत. त्यांच्यापैकी कोणत्याही – विशेषतः पोलंड – देशावर हल्ला झाल्यास तो नाटोवरील हल्ला समजला जाईल, असे या संघटनेचे नेते म्हणत आहेत. अमेरिकेने सोमवारीच याविषयी आणखी एक इशारा दिला. युक्रेनच्या नैर्ऋत्य सीमेवर मोल्डोव्हा हा देश आहे. तो नाटोचा सदस्य नाही, पण त्याही देशाबरोबर रशियाचा झगडा आहे. क्रिमियातून निघालेल्या फौजा पश्चिमेकडे ओडेसा ओलांडून मोल्डोव्हात शिरल्यास आणखी पेचप्रसंग उभा राहू शकतो. त्यामुळे वारंवार रशियाला इशारे देत राहण्यापलीकडे सध्या तरी नाटोच्या नेत्यांना फार काही करता येत नाही. मात्र पोलंड किंवा नाटोच्या इतर कोणत्याही सदस्य देशावर हल्ला झाल्यास नाटो सर्वशक्तिनिशी युद्धात उतरेल आणि मग त्याची व्याप्ती भीषण रूप धारण करेल.
युक्रेनच्या आकाशात उड्डाणप्रतिबंध जाहीर करावा अशी विनंती झेलेन्स्की यांनी नाटोकडे केली आहे. त्याचे काय?
झेलेन्स्की यांनी अशी विनंती अनेकदा केली आहे. पण ती मान्य करण्याच्या मनस्थितीत नाटो नेते सध्या नाहीत. कारण उड्डाणप्रतिबंध राबवण्यासाठी – रशियाच्या विमानांना रोखण्यासाठी – नाटोची लढाऊ विमाने युक्रेनच्या आकाशात धाडावी लागतील, कारण युक्रेनच्या हवाईदलाची ती क्षमता नाही. हवाई पहारा देताना रशियन हवाईदलाशी चकमक उडू शकते आणि त्यातून युद्ध भडकू शकते. त्यामुळे सध्या तरी त्या वाटेला नाटो जाणार नाही.