अमोल परांजपे
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अलीकडेच युक्रेनच्या उत्तरेला असलेल्या बेलारूसमध्ये ‘डावपेचात्मक अण्वस्त्रे’ (टॅक्टिकल) सज्ज ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. वर्षभर युद्ध लढल्यानंतरही युक्रेनमध्ये रशियाला फारशी मजल मारता आली नसल्यामुळे आता पुतिन यांनी अण्वस्त्र धमकीचे आयुध पुन्हा एकदा बाहेर काढले आहे. यामुळे रशियाची अण्वस्त्रे थेट युरोपच्या उंबरठ्यावर येणार असल्यामुळे या घोषणेने तणावात भरच पडली आहे.
‘डावपेचात्मक अण्वस्त्रे’ म्हणजे काय?
साधारणत: डावपेचात्मक (टॅक्टिकल किंवा नॉन-स्ट्रॅटेजिक) आणि दुसरी धोरणात्मक (स्ट्रॅटेजिक) अशा दोन प्रकारे अण्वस्त्रे तयार केली जातात. डावपेचात्मक अण्वस्त्रे ही कमी किंवा मध्यम पल्ला गाठणारी असतात. यात अणुस्फोटके लादलेली कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे, भूसुरुंग, हातबॉम्ब, तोफगोळे इत्यादीचा समावेश होतो. तर धोरणात्मक अण्वस्त्रे ही सहसा दूरवरचे लक्ष्य भेदण्यासाठी बनविली जातात. डावपेचात्मक अण्वस्त्रांचा पल्ला कमी असल्यामुळे अनेकदा ती जिथून डागली जातात, त्या भागाचेही नुकसान होण्याचा धोका असतो.
पुतिन यांनी काय घोषणा केली?
बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को हे प्रदीर्घ काळापासून आपल्या देशात रशियाने डावपेचात्मक अण्वस्त्रे तैनात करण्याची मागणी करत असल्याचा दावा पुतिन यांनी केला आहे. मात्र आता हा निर्णय घेण्यामागे ब्रिटन असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ब्रिटनने युक्रेनला कालबाह्य (डिप्लिटेड) युरेनियम असलेले तोफगोळे देणार असल्याचे जाहीर केल्याचे पुतिन यांचे म्हणणे आहे. युरेनियम समृद्धीकरणाच्या प्रक्रियेतील एक घटक म्हणजे ‘डिप्लिटेड’ युरेनियम. यातून मंद व मर्यादित किरणोत्सर्ग होतो, जो इतका धोकादायक नसतो. पण अशा युरेनियमची घनता शिस्यापेक्षा अधिक असल्यामुळे तोफांमधील दारुगोळ्यासाठी ते अनेकदा वापरले जाते. या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून बेलारूसमध्ये थेट अण्वस्त्रेच ठेवण्याच्या निर्णयाप्रत पुतिन येऊन पोहोचले.
विश्लेषण : रशिया बेलारुसमध्ये अण्वस्त्रे कशासाठी तैनात करत आहे? युक्रेन युद्ध आणखी भडकणार?
अमेरिकेची धोरणात्मक अण्वस्त्रे कुठे आहेत?
‘नाटो’मध्ये झालेल्या करारांतर्गत अमेरिकेची धोरणात्मक अण्वस्त्रे युरोपमध्ये तैनात आहेत. बेल्जियम, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि तुर्कस्तान या देशांमध्ये ही अण्वस्त्रे ठेवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेने हे पाऊल उचलल्यावर संयुक्त राष्ट्रांच्या कराराचा भंग होत असल्याची ओरड रशियाने केली होती. आता मात्र बेलारूसमध्ये अण्वस्त्रे नेल्यामुळे अशा कोणत्याही कराराचा भंग होत नसल्याचा दावा पुतिन यांना करावा लागत आहे.
अण्वस्त्रे बेलारूसमध्ये नेण्याची नीती काय?
गतवर्षी २४ फेब्रुवारीला बेलारूसमधूनही रशियाने सैन्य युक्रेनमध्ये घुसविले होते. बेलारूसची १० लढाऊ विमाने अण्वस्त्र वाहून नेण्यायोग्य केल्याचे पुतिन यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. आता ३ एप्रिलपासून बेलारूसच्या वैमानिकांचे प्रशिक्षण रशिया सुरू करणार आहे. ‘इस्कंदर’ ही कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे रशियाने बेलारूसला दिली आहेत. या क्षेपणास्त्रांवर अण्वस्त्रे लादली जाऊ शकतात. १ जुलैपूर्वी बेलारूसमध्ये अण्वस्त्रे साठवून ठेवण्याची ठिकाणे सज्ज करण्यात येणार आहेत. आघाडीवर युक्रेनचे सैन्य कुरघोडी करत असताना २०१४मध्ये रशियाने युक्रेनपासून तोडलेला क्रिमिया गमावण्याची भीती रशियाला आहे. त्यामुळेच पुतिन यांनी बेलारूसमध्ये अण्वस्त्रे ठेवण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकली आहेत.
बेलारूसमधील अण्वस्त्रांवर नियंत्रण कुणाचे असेल?
युरोपमध्ये ठेवलेल्या अण्वस्त्रांचे संपूर्ण नियंत्रण हे अमेरिकेकडेच आहे. त्याप्रमाणेच रशियादेखील बेलारूसमधील अण्वस्त्रे स्वत:च्या नियंत्रणात ठेवणार आहे. मात्र यानिमित्ताने १९९० नंतर प्रथमच रशियाची अण्वस्त्रे त्यांच्या मुख्य भूमीबाहेर जात आहेत. सोव्हिएट महासंघाच्या विघटनावेळी बेलारूस, युक्रेन आणि कझाकस्तानमध्ये रशियाच्या अण्वस्त्रांचे मोठे साठे होते. मात्र त्यानंतर रशियाने या देशांशी करार करून टप्प्याटप्प्याने आपली अण्वस्त्रे परत नेली.
विश्लेषण: इस्रोच्या ‘वनवेब’ मोहिमेचे यश महत्त्वाचे का?
रशियाच्या या कृतीचा परिणाम काय?
बेलारूस-युक्रेनमध्ये १ हजार ८४ किलोमीटरची सामायिक सीमा आहे. बेलारूसमधून रशियाची विमाने आणि क्षेपणास्त्रे युक्रेनमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर अधिक जलद पोहोचू शकतील. पण बेलारूसमध्ये ‘डावपेचात्मक अण्वस्त्रां’मुळे केवळ युक्रेनच नव्हे, तर मध्य आणि पूर्व युरोपातील अनेक ‘नाटो’ सदस्य देश पुतिन यांच्या टप्प्यात येतील. मात्र या अण्वस्त्रांचा उपयोग प्रत्यक्ष वापरापेक्षा युक्रेन आणि अमेरिका, नाटोवर दबाव आणण्यासाठी केला जाण्याची अधिक शक्यता आहे. बेलारूसमधील या अण्वस्त्रांमुळे युरोप कायम तणावात राहणार आहे.
amol.paranjpe@expressindia.com