– सिद्धार्थ खांडेकर
युक्रेनवर स्वामित्वाच्या मुद्द्यावरून रशिया आणि अमेरिकाप्रणीत नाटो देशांमध्ये तीव्र मतभेद असल्यामुळे पूर्व युरोपवर युद्धाचे ढग जमले आहेत. युक्रेनच्या पूर्व सीमेवर तैनात काही रशियन सैनिक त्यांच्या मूळ तळावर परतले असले, तरी युद्धाचा धोका अजिबात कमी झालेला आहे. युक्रेनमधून थेट जर्मनीपर्यंत जाणाऱ्या नॉर्ड स्ट्रीम – २ या वायूवाहिनी किंवा गॅस पाइपलाइनच्या मुद्द्यावरून हा संघर्ष सुरू झाल्याचा एक मतप्रवाह आहे. रशियातील नैसर्गिक वायू आणि इतर जीवाश्म इंधने अशा प्रकारे पाइपलाइनच्या माध्यमातून पश्चिम आणि दक्षिण युरोेपभर पोहोचली, तर रशियाचे युरोपातील महत्त्व कितीतरी वाढेल अशी भीती वाटल्यामुळेच अमेरिकेने हा वाद उकरून काढल्याची टीका रशियावादी विश्लेषक करतात. नॉर्ड स्ट्रीम – २ पाइपलाइन त्यामुळेच चर्चेच्या केंद्रस्थानी आलेली आहे.
काय आहे नॉर्ड स्ट्रीम – २ प्रकल्प?
नॉर्ड स्ट्रीम – २ ही सुमारे १२०० किलोमीटर लांबीची, बाल्टिक समुद्रांतर्गत बनलेली वायूवाहिनी असून, रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथून ती सुरू होते आणि जर्मनीतील लुबमिल शहरापाशी तिला पूर्णविराम मिळतो. या वाहिनीलाच समांतर अशी वायूवाहिनी (नॉर्ड स्ट्रीम – १) २०११मध्येच कार्यान्वित झालेली आहे. या दोन वाहिन्या दरवर्षी ११० अब्ज क्युबिक मीटर नैसर्गिक वायू युरोपात पोहोचवू शकतात, ज्याने या खंडाची दोन तृतियांश गरज भासू शकते. युरोपमधील मोठा देश असलेला फ्रान्स अणुऊर्जेच्या बाबतीत समृद्ध आणि स्वयंपूर्ण आहे. पण जर्मनी या युरोपातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेची ऊर्जेची गरज जीवाश्म इंधनेच भागवू शकतात. त्यामुळे या वाहिनीसाठी माजी चॅन्सेलर अँगेला मर्केल यांनी विशेष प्रयत्न केले होते.
रशिया आणि युरोपच्या दृष्टीने हा व्यवहार का महत्त्वाचा आहे?
सध्या युरोपची ३५ टक्के नैसर्गिक वायूची गरज रशिया भागवतो. हा पुरवठा सध्या ज्या वाहिन्यांमार्फत होतो, त्यांपैकी एक बेलारूस, पोलंडमार्गे जर्मनीत येते. नॉर्ड स्ट्रीम – १ थेट समुद्रमार्गे जर्मनीत जाते. एक युक्रेनमधूनही जाते. पण खुष्कीच्या मार्गाने जाणाऱ्या बहुतेक वाहिन्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे नवीन वाहिन्यांची गरज आहे. जर्मनीला लागणाऱ्या नैसर्गिक वायूपैकी ३५ टक्के रशियातून होतो. नॉर्ड स्ट्रीम – २मुळे हे प्रमाण अधिक वाढू शकते. पण युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यास, नॉर्ड स्ट्रीम – २ कार्यान्वित होऊ दिली जाणार नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. जर्मनी हा अमेरिकेचा मित्रदेश असल्यामुळे जर्मनीच्या नैसर्गिक वायूची गरज भागवण्यासाठी अमेरिकेने आणखी एक मित्रदेश कतारला विनंती केली आहे.
नॉर्ड स्ट्रीम – २ला विरोध कोणाचा?
अर्थातच अमेरिका आणि ब्रिटन, पोलंड व युक्रेन यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाला, तर भविष्यात युरोप पूर्णतः रशियावर अवलंबून राहील आणि याचा गैरफायदा रशिया उठवेल, अशी भीती या देशांना वाटते. २००६मध्ये युक्रेनशी आर्थिक मतभेद झाल्यामुळे रशियाने वायूपुरवठाच बंद केला. यामुळे पूर्व आणि मध्य युरोपातील देशांना ऐन हिवाळ्यात विजेची चणचण जाणवली होती. तसेच काहीसे रशिया पुन्हा करेल, अशी भीती युक्रेनसारख्या देशांना वाटते.
जर्मनी हा कमकुवत दुवा?
नॉर्ड स्ट्रीम – २ची नाकेबंदी करण्यासाठी अमेरिकेने या प्रकल्पातील रशियन कंपन्यांवर निर्बंध आणले. पण जर्मन कंपन्यांना अमेरिकेने अद्याप हात लावलेला नाही. कारण नाटो आणि युरोपिय समुदायातील या सर्वांत मोठ्या सहकाऱ्याला दुखावणे अमेरिकेला मान्य नाही. या वायूवाहिनीच्या निमित्ताने जर्मनीने व्लादिमीर पुतीन यांच्याशी सलगी करण्याची काहीही गरज नव्हती, अशी टीका काही युरोपिय देश – नेते व माध्यमे – आधीपासूनच करत आले आहेत. पुतीन यांच्या मते, हा आर्थिक प्रकल्प असून त्याचा संबंध विद्यमान राजकीय व लष्करी पेचप्रसंगाशी जोडला जाऊ नये. जर्मनी हा रशियाचा सर्वांत मोठा नैसर्गिक वायू ग्राहक आहे. या देशावर टीका करणाऱ्यांना पुरवठ्याचे पर्याय देता आलेले नाहीत. नॉर्वेकडून काही प्रमाणात जर्मनी वायू आयात करू शकते. पण आपल्याकडे त्या देशाला पुरवण्याची क्षमता फारशी नाही, असे नॉर्वेचे म्हणणे. अमेरिका आणि कतारकडून द्रवरूप वायू आणायचा, तर तेवढी जहाजांची क्षमता राहिलेली नाही अशी परिस्थिती. त्यामुळे रशियाकडे वळण्याशिवाय पर्याय नाही, ही जर्मनीची भूमिका आहे. पण या वायूवाहिनीचा वापर करून रशिया अमेरिका व इतर युरोपिय देशांमध्ये दुफळी निर्माण करत असल्याचा युक्रेनचा आरोप असल्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.