रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला ६०० पेक्षा अधिक दिवस झाले आहेत. मात्र या दोन्ही देशांतील संघर्ष अद्याप थांबलेला नाही. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात असून यात दोन्ही बाजूने मोठी जीवित तसेच वित्तहानी होत आहे. असे असतानाच आता रशियन सैनिक एका वेगळ्याच अडचणीचा सामना करत आहेत. या सैनिकांना ‘माऊस फिव्हर’ला तोंड द्यावे लागत आहे. तसा दावा युक्रेनने केला असून रशियन सैनिक या आजारापासून त्रस्त असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘माऊस फिव्हर’ म्हणजे नेमके काय? रशियन सैनिक या आजाराचा कशा प्रकारे सामना करत आहेत? हे जाणून घेऊ या…
रशियन सैनिकांसमोर माऊस फिव्हरचे आव्हान
रशियन सैनिकांना हवाई हल्ले, गोळीबार, बॉम्बहल्ले यासह माऊस फिव्हर नावाच्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रामुख्याने कपुयान्स आघाडीवर लढणाऱ्या रशियन सैनिकांना माऊस फिव्हरचा सामना करावा लागतोय. युक्रेनच्या डिफेन्स इंटेलिजन्सच्या म्हणण्यानुसार रशियन सरकार मात्र या सैनिकांकडे दुर्लक्ष करत आहे.
माऊस फिव्हर म्हणजे नेमकं काय?
युक्रेनच्या प्रमुख गुप्तचर संचालनालयाने (एचयूआर) कपुयान्स आघाडीवर रशियन सैनिकांमध्ये माऊस फिव्हरचा उद्रेक झाल्याचा अहवाल दिला आहे. कपुयान्स हे शहर युक्रेनच्या पूर्वेला आहे. माऊस फिव्हर म्हणजे नेमके काय याबाबत या अहवालात नेमकी माहिती दिलेली नाही. मात्र माऊस फिव्हर हा स्ट्रेप्टोकोकल जिवाणूचा संसर्ग आहे. उंदरांची विष्ठा किंवा उंदराच्या थेट संपर्कात आल्यावर या जिवाणूचा मानवाला संसर्ग होतो.
माऊस फिव्हर म्हणजेच ‘रॅट बाईट फिव्हर
युक्रेनकडून सांगितले जात असलेल्या माऊस फिव्हर या आजाराला ‘रॅट बाईट फिव्हर’ असेदेखील म्हणता येईल. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) नुसार उंदराची विष्ठा, लाळ, लखवी यांच्या संपर्कात आल्यावर हा आजार होतो.
काही लोकांच्या म्हणण्यानुसार माऊस फिव्हरची लक्षणे ही लेप्टोस्पिरोसिस या आजाराप्रमणाचे आहेत. लेप्टोस्पिरोसिस हा आजारदेखील उंदराच्या संपर्कात आल्यामुळे होतो. मात्र युक्रेनकडून उल्लेख केला जात असलेला माऊस फिव्हर हा आजार लेप्टोस्पिरोसिसच आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
माऊस फिव्हरची लक्षणे काय?
युक्रेनियन गुप्तचरांच्या म्हणण्यानुसार माऊस फिव्हरमुळे डोकेदुखी, शरीराचे तापमान ४० अंशापर्यंत वाढणे, अंगावर पुरळ येणे, त्वचा लाल होणे, रक्तदाब कमी होणे, डोळ्यांत रक्तस्त्राव होणे, मळमळ, उलटी होणे अशी लक्षणे दिसू शकतात. CDC च्या म्हणण्यानुसार अचानक डोकेदुखी वाढणे, पाठीत त्रास होणे, ताप येणे, थंडी वाजणे हेदेखील माऊस फिव्हरची सामान्य लक्षणं आहेत. जिवाणूंच्या संपर्कात आल्यानंतर साधारण तीन ते दहा दिवसांनी ही लक्षणं दिसायला लागतात. लक्षणं दिसण्यास तीन आठवड्यांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.
माऊस फिव्हरचा रशियन सैनिकांवर परिणाम काय?
युक्रेनच्या प्रमुख गुप्तचर संचालनालयाच्या अहवालानुसार माऊस फिव्हरमुळे रशियाचे आघाडीचे सैनिक आजारी पडत आहेत. या सैनिकांना उलटी होणे, डोळ्यांतून रक्तस्त्राव होणे अशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. “कपुयान्स आघाडीवर सैनिकांना माऊस फिव्हरचा सामना करावा लागतोय. परिणामी रसियन सैनिकांची लढण्याची क्षमता सातत्याने कमी होत आहे,” असे युक्रेनच्या प्रमुख गुप्तचर संचालनालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे. या आजारामुळे सैनिकांच्या मुत्रपिंडावर परिणाम होत आहे. माऊस फिव्हरची लागण झालेल्या सैनिकांना पाठीचा त्रास होत आहे. तसेच लघवी करण्यासही या सैनिकांना अडचण येत आहे, असेही या अहवलात सांगण्यात आलेले आहे.
रशियाचे सैनिकांकडे दुर्लक्ष?
सैनिकांनी केलेल्या तक्रारींकडे रशियन सरकार दुर्लक्ष करत आहे, असा दावादेखील युक्रेन सरकारने केला आहे. “युक्रेनविरोधील युद्धात सहभागी असलेल्या रशियन सैनिकांना ताप येत आहे. मात्र वरिष्ठांकडून या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. युद्धात सहभागी न होण्यासाठी सैनिक कारण देत आहेत, असे वरिष्ठांकडून गृहीत धरले जात आहे,” असेदेखील युक्रेनच्या प्रमुख गुप्तचर संचालनालयाने सांगितले आहे.
युक्रेनच्या सैनिकांकडूनही तक्रार
उदरांमुळे होणाऱ्या आजारांची समस्या ही काही नवी नाही. याआधी युक्रेनच्या सैनिकांनी हीच अडचण सांगितली होती. खंदकांमध्ये उंदीर झालेले आहेत, अशी तक्रार युक्रेनच्या सैनिकांकडून केली जात होती. रशियाच्या सैनिकांनादेखील आता याच अडचणींचा सामना करावा लागतोय.
याआधी कॉलराची साथ
रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना खेर्सन आणि क्रिमिया प्रदेशात या वर्षाच्या जून महिन्यात रशियन सैनिकांना कॉलरचा उद्रेकाला सामोरे जावे लागले होते. काखोव्का जलविद्यूत प्रकल्पात झालेल्या स्फोटामुळे या प्रदेशात कॉलराची साथ पसरली होती.
रशिया-युक्रेन युद्धाची सद्यस्थिती काय?
रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश माघार घेण्यास तयार नाहीत. हे युद्ध २०२२ साली फेब्रुवारी महिन्यात सुरू झाले होते. म्हणजेच दोन महिन्यांत या युद्धाला सुरू होऊन दोन वर्षे होतील. युद्ध सुरूच असलेल्यामुळे दोन्ही बाजुने जीवित तसेच वित्तहानी होत आहे. या युद्धात आतापर्यंत ३ लाख ४० हजार रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. यासह रशियाचे हजारो टँक्स, सशस्त्र वाहने, रॉकेट सिस्टिम्स, लढाऊ विमाने, युद्धनौका, पाणबुड्या, ड्रोन्सचेदेखील नुकसान झाल्याचे म्हटले जाते.
युद्धभूमीवर विदारक स्थिती
दरम्यान, हे युद्ध कधी थांबणार हे सध्यातरी स्पष्ट नाही. मात्र या युद्धामुळे रशिया आणि युक्रेन अशा दोन्ही देशांच्या सैनिकांचे हाल होत आहेत. गेल्या महिन्यात रशियाच्या एका सैनिकाचा फोनकॉल गुप्तपणे रेकॉर्ड करण्यात आला होता. यामध्ये युद्धभूमीवर जगण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतोय, याबाबत या सैनिकाने सांगितलेले आहे.