अमेरिकेने युक्रेनवर दबाव वाढविण्यासाठी सर्व प्रकारची लष्करी मदत थांबविली. आणखी एक पाऊल पुढे जात युक्रेनला दिली जात असलेली गुप्तहेर माहितीही थांबविण्यात आली. या आततायी कृतीने अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. ९५ टक्के अमेरिकेवर विसंबून असलेला युक्रेन किती काळ तग धरेल? चार महिने… सहा महिने… की त्यापेक्षाही कमी? मदत पुन्हा सुरू होण्याची शक्यता किती? जर अमेरिकेने मदत केली नाहीच, तर युरोप आपली पूर्व सीमा सुरक्षित ठेवू शकेल का? मुळात युरोपातील सर्व देशांमध्ये तरी याबाबत एकमत आहे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रम्प यांनी कोणकोणती मदत थांबविली?

‘व्हाईट हाऊस’च्या ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या वादावादीनंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुरावा आणखी वाढला आहे. युक्रेनने कोणत्याही परिस्थितीत रशियाबरोबर वाटाघाटींना तयार व्हावे आणि आपल्याशी दुर्मिळ संयुगांच्या उत्खनन-वापराचा करार करावा, यासाठी ट्रम्प यांनी झेलेन्स्कींचे मनगट पिरगळले आहे. ४ मार्च रोजी युक्रेनला दिली जात असलेली लष्करी मदत ‘तात्काळ प्रभावाने’ थांबविण्यात घोषणा ट्रम्प यांनी केली. युक्रेन आणि युरोप या धक्क्यातून पुरते सावरलेही नसताना ५ मार्च रोजी युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनला अमेरिकेकडून मिळणारी गुप्तहेर माहिती थांबविण्यात आली. अमेरिकन गुप्तहेर संस्था ‘सीआयए’चे संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी स्वत:च फॉक्स बिझनेस नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत ही घोषणा केली. त्याच वेळी लष्करी आणि गुप्तहेर मदत तात्पुरती थांबविण्यात आली असून ती पुन्हा सुरू होऊ शकेल, असे संकेतही रॅटक्लिफ यांनी दिले. याचा सरळ अर्थ असा, की आपण सांगतोय त्या अटींवर झेलेन्स्की यांनी युद्धबंदीला तयार व्हावे, अन्यथा अमेरिकेच्या मदतीशिवाय आपला बचाव करावा… पण अमेरिकेने मदत पुन्हा सुरू केली नाही, तर युक्रेनचा किती काळ निभाव लागेल, हा प्रश्नच आहे.

लष्करी मदत थांबविल्याचा परिणाम काय?

युक्रेन कायदेमंडळाच्या संरक्षण समितीचे सदस्य फेदिर व्हेनिस्लावस्की यांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ सहा महिने पुरेल एवढाच शस्त्रसाठा युक्रेनकडे आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर समितीने तातडीने बैठक घेऊन अमेरिकेची मदत थांबली, तर काय करता येईल यावर चर्चा केली. प्रत्यक्ष आघाडीवर लढणाऱ्या सैनिकांनाही आपण सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ तग धरू शकू, असे वाटत नाही. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयातील माजी अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञ ओलेक्सी मेल्निक यांनी ‘सीएनएन’ला दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनला होणाऱ्या एकूण लष्करी मदतीमध्ये ३० टक्के वाटा एकट्या अमेरिकेचा आहे. ही मदत थांबली, तर त्याचा मोठा फटका बसणार, हे स्पष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले. रशियाची लष्करी ताकद आणि त्यांच्याकडे असलेले मनुष्यबळ पाहता मदत १ टक्का कमी झाली, तरीही त्याचा परिणाम मोठा होईल, असे मेल्निक म्हणाले. या मतांची गोळाबेरीज करायची म्हटली, तर युक्रेन जास्तीत जास्त सहा महिने आपला बचाव करू शकेल. मात्र अमेरिकेने गुप्तहेर माहितीदेखील आता थांबविली असून, त्याचाही मोठा फटका युक्रेनला सहन करावा लागणार आहे.

गुप्तहेर माहिती थांबविल्याचा किती फटका?

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी २०२२ साली युक्रेनवर हल्ला केल्यानंतर १५ दिवसांत कीव्हचा पाडाव करण्याची घोषणा केली होती. मात्र युक्रेन आपल्या राजधानीचा बचाव करू शकला, तो केवळ अमेरिकेकडून रशियाच्या हालचालींबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे. आताही रशियाच्या संभाव्य हल्ल्यांची माहिती काही काळ आधी मिळून संभाव्य जीवितहानी टाळणे युक्रेनला शक्य होत आहे. रशियाने ताब्यात घेतलेल्या लुहान्स्क, डोनेस्क, झाप्पोरीझिया या प्रदेशांमध्ये रशियन सैन्यावर छुपे हल्ले करण्यासाठी युक्रेनच्या सैन्याची संपूर्ण भिस्त ही तेथील अमेरिकेच्या गुप्तहेरांवर, तसेच उपग्रहांमार्फत मिळणाऱ्या माहितीवर आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की अमेरिकेकडून मिळालेल्या गुप्त माहितीअभावी युक्रेन ना स्वत:चा बचाव करू शकेल, ना रशियावर लक्ष्यभेदी हल्ला करू शकेल. त्यामुळेच ट्रम्प यांनी सर्व प्रकारची मदत थांबविल्यानंतर झेलेन्स्की आणखी नरमले असून आपण अमेरिकेबरोबर करार करण्यास केव्हाही तयार आहोत, असे त्यांनी जाहीर केले. दुसरीकडे काँग्रेसमध्ये केलेल्या भाषणात ट्रम्प यांनीही झेलेन्स्कींच्या पत्राचा उल्लेख करून शांतता चर्चा लवकरच सुरू होईल, असे सांगितले. एकीकडे हे घडत असताना युरोपातील दोन महाशक्ती फ्रान्स आणि ब्रिटन हे वाटाघाटींचा प्रस्ताव तयार करण्यात व्यग्र आहेत. मात्र किमान सगळा युरोप तरी युक्रेनच्या पाठीशी उभा राहील का, याची आता शंका आहे.

युरोपात काय हालचाली?

अमेरिकेने युक्रेनची लष्करी मदत आणि गुप्तहेर माहिती थांबविल्यानंतर ६ मार्च रोजी बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये युरोपीय नेत्यांनी तातडीची बैठक घेतली. अमेरिकेच्या मदतीशिवाय आपली पूर्व सीमा सुरक्षित कशी ठेवता येईल, युक्रेनच्या लष्करी सामर्थ्यात पडणारा खड्डा कसा भरून काढता येईल यावर खलबते सुरू असली तरी सर्वच युरोपीय राष्ट्रे एका दिशेने विचार करत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. युक्रेनला एकतर्फी मदतीचा निर्णय होऊ देणार नाही, असा इशारा हंगेरीचे अध्यक्ष व्हिक्टर ओर्बान यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे पुतिन यांचे अनेक छुपे समर्थक अनेक देशांमध्ये प्रबळ आहेत. त्यामुळे झेलेन्स्की यांना इतक्यातच युरोपवर विसंबून राहता येणार नसल्याचे स्पष्ट आहे. दुसरीकडे ट्रम्प यांना अपेक्षित असलेले करार केले, तर अमेरिकेकडून लष्करी मदत पुन्हा सुरू होऊ शकेल, अशीही त्यांना आशा आहे. शिवाय अमेरिकेतील शस्त्रास्त्र निर्मिती उद्योगालाही या निर्णयाचा फटका बसणार आहे.

अमेरिकन कंपन्यांचा किती फायदा?

रशियाचा हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने युक्रेनला ६५ अब्ज डॉलरच्या लष्करी मदतीचे आश्वासन दिले आहे. ‘प्रेसिडेंशियल ड्रॉडाऊन ॲथोरिटी’मधून काँग्रेसच्या मंजुरीशिवाय ३१ अब्ज डॉलरची शस्त्रास्त्रे आणि ‘युक्रेन सिक्युरिटी असिस्टन्स इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून काँग्रेसच्या मंजुरीसह उर्वरित रक्कम दिली जाणार आहे. यातील सुमारे २० अब्जांची आयुधे आतापर्यंत पाठविली गेल्याचा अंदाज आहे. याचा अर्थ जर युक्रेनची मदत कायमची थांबली, तर सुमारे ४५ अब्जांची शस्त्रास्त्रे खरेदीविना पडून राहतील. ‘एल थ्री हॅरिस टेक्नॉलॉजी’, ‘लॉकहिड मार्टिन’, ‘आरटीएक्स कॉर्प’ आणि ‘जनरल डायनॅमिक्स’ या आपल्याच देशातील कंपन्यांकडून अमेरिका युक्रेनसाठी शस्त्रास्त्रे घेणार असून त्यांची निर्मिती प्रगतीपथावर आहे. ही ऑर्डर रद्द झाली, तर या कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागेल. दुसरी शक्यता अशी, की युक्रेन आणि इस्रायलला शस्त्रास्त्रे दिल्यानंतर घटलेला साठा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी अमेरिका ही शस्त्रास्त्रे स्वत:कडे ठेवू शकेल. असे झाल्यास कंपन्यांना लगेचच नुकसान सहन होणार नाही, हे खरे! मात्र भविष्यात अमेरिकेकडे पुरेशी शस्त्रास्त्रे असतील आणि कंपन्यांना दीर्घकालीन तोटा होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या कंपन्यांचाही ट्रम्प प्रशासनावर दबाव असेल… जागतिक आणि देशांतर्गत दबावापुढे ट्रम्पनीती किती काळ तग धरणार, यावर युक्रेनची मदत आणि युद्धाचे परिणाम अववलंबून आहेत.

amol.paranjpe@expressindia.com