रशियाने युक्रेनवर मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात हल्ला केला होता. तेव्हापासून या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे रशियावर जागतिक पातळीवर व्यापारविषयक तसेच अन्य क्षेत्रांतही वेगवेगळ्या देशांनी कडक निर्बंध लादलेले आहेत. असे असले तरी रशिया माघार घेण्यास तयार नाही. असे असतानाच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे वैचारिक विरोधक तसेच कार्यकर्ते व्लादिमीर कारा मुर्झा यांना देशद्रोह तसेच रशियन लष्कराची बदनामी केल्याप्रकरणी २५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रशियन न्यायालयाच्या या निर्णयामुळे रशियावर जागतिक पातळीवर टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर व्लादिमीर कारा मुर्झा कोण आहेत? रशियन सरकारने त्यांच्यावर काय आरोप केले आहेत? न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर मुर्झा यांनी काय भूमिका घेतली? हे जाणून घेऊ या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारा मुर्झा यांना ठोठावली २५ वर्षांची शिक्षा

देशद्रोह तसेच लष्कराची बदनामी केल्यामुळे कारा मुर्झा यांना २५ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मागील वर्षी रशियन सरकारने याबाबतचा कायदा लागू केला होता. या कायद्यानुसार लष्कराची बदनामी करणे, लष्कराविषयी अपप्रचार करणे किंवा खोटी माहिती पसवरणे अशा कृत्यांना गुन्हा समजले जाते. या कायद्यांतर्गत पहिल्यांदाच अशा प्रकारची मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. तब्बल २५ वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतरही कारा मुर्झा रशियन सरकारला बधलेले नाहीत. न्यायालयाने ही शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांनी ‘रशिया मुक्त होईल’ अशी घोषणा दिली. याबातचे वृत्त डीडब्ल्यूने दिले आहे. ४१ वर्षीय व्लादिमीर कारा मुर्झा सैन्याविषयी चुकीची माहिती पसवरणे तसेच नको असलेल्या संस्थांशी संबंध असणे, या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळले आहेत; असे न्यायालयाने शिक्षा ठोठावताना म्हटले आहे.

हेही वाचा >> आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या काकांना सीबीआयकडून अटक; त्यांनी आपल्याच भावाचा खून का केला?

ब्रिटनने व्यक्त केला निषेध

दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाचा ब्रिटनने निषेध केला आहे. या निकालानंतर ब्रिटनने एक निवेदन जारी केले आहे. हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित आहे, असे या निवेदनात म्हणण्यात आले आहे. तसेच ब्रिटनने रशियन राजदूतांना याबाबत रशियाची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. व्लादिमीर कारा मुर्झा यांना ठोठावलेली शिक्षा म्हणजे रशियाचे मानवाधिकाराविरोधी कृत्य आहे, असेही ब्रिटनने म्हटले आहे.

व्लादिमीर कारा मुर्झा कोण आहेत?

व्लादिमीर कारा मुर्झा यांचा जन्म १९८१ साली मॉस्को शहरात झाला. ते रशियामधील प्रसिद्ध टीव्ही अँकर व्लादिमीर अलेक्झेवीच कारा मुर्झा यांचे पुत्र आहेत. व्लादिमीर अलेक्झेवीच हे तत्कालीन सोव्हियत युनियनचे नेते लिओनीड ब्रेझेनेव यांचे टीकाकार होते. वडील पत्रकार असल्यामुळे व्लादिमीर कारा मुर्झा यांच्यावरही लहानपणापासून पत्रकारितेचे संस्कार झाले. वयाच्या १६ व्या वर्षी ते पत्रकारिता क्षेत्रात उतरले. केंब्रीज विद्यापीठातून त्यांनी पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षण घेतलेले आहे. पत्रकारितेत असताना त्यांनी अनेक रशियन वृत्तवाहिन्यांसाठी ब्रिटनमधील प्रतिनिधी म्हणून काम केले. यासह त्यांचे अनेक माहितीपट प्रदर्शित झालेले आहेत. त्यांनी अनेक पुस्तकंही लिहिलेली आहेत. ते काही काळासाठी रशियन राजकारणाचाही भाग राहिलेले आहेत. २००० ते २००३ या कालावधीत त्यांनी विरोधी पक्षनेते बोरीस नेमत्सोव यांचे सल्लागार म्हणून काम केलेले आहे. २०१५ साली बोरीस नेमत्सोव यांची हत्या करण्यात आली.

हेही वाचा >> ‘प्रसिद्धी मिळावी म्हणून दोघांना संपवलं,’ अतिक अहमद-अश्रफ अहमद हत्या प्रकरणात आणखी काय समोर आले?

कारा मुर्झा यांच्यावर दोन वेळा विषप्रयोग?

व्लादिमीर कारा मुर्झा हे व्लादिमीर पुतीन यांचे टीकाकार मानले जातात. व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात निघालेल्या अनेक मोर्चे आणि निदर्शनांमध्ये व्लादिमीर कारा मुर्झा यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. व्लादिमीर पुतीन यांना सातत्याने विरोध केल्यामुळे कारा मुर्झा यांच्यावर दोन वेळा विषप्रयोग झाल्याचा दावा केला जातो. २०१५ साली कारा मुर्झा यांचे मूत्रपिंड अचानकपणे निकमी झाले होते. त्यानंतर दोन वर्षांनी कथित विषप्रयोगामुळे ते कोमामध्ये गेले होते.

व्लादिमीर कार मुर्झा यांना २५ वर्षांची शिक्षा का ठोठावण्यात आली?

रशियाने युक्रेनवर फेब्रुवारी २०२२ मध्ये हल्ला केला. त्यानंतर या दोन्ही देशांत युद्ध पेटले. एकीकडे हे युद्ध सुरू असतानाच दुसरीकडे रशियन सरकारने लष्कराच्या बदनामीसंदर्भात नवा कायदा लागू केला. या कायद्यांतर्गत लष्कराचा अवमान केल्यास ५ वर्षांची शिक्षा तसेच लष्कराविषयी चुकीची माहिती पसवरण्याचा प्रयत्न केल्यास १५ वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. याच कायद्यानुसार व्लादिमीर कारा मुर्झा यांना दोषी ठरवण्यात आले आहे. व्लादिमीर कारा मुर्झा यांनी पुतीन यांच्या युद्धासंदर्भातील निर्णयाला कायम विरोध केला आहे. हीच भूमिका घेऊन त्यांनी अनेक ठिकाणी पुतीन यांच्यावर टीका करणारे भाषण केलेले आहे. तसेच त्यांनी लष्करावरही टीका केलेली आहे.

हेही वाचा >> विश्लेषण: दुधाच्या वाढत्या दराला काय ठरतेय कारणीभूत, नेमकं गणित समजून घ्या

कारा मुर्झा यांच्यावर देशद्रोहाचा आरोप

सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीत प्रश्नाचे उत्तर देताना ‘रशियामध्ये खुनी लोकांकडून सरकार चालवले जात आहे,’ असे गंभीर भाष्य केले होते. या मुलाखतीच्या काही तासांनंतर मागील वर्षाच्या एप्रिल महिन्यात व्लादिमीर कारा मुर्झा यांना अटक करण्यात आली होती. रशियन लष्कराविषयी खोटी आणि चुकीची माहिती पसरवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. यासह व्लादिमीर कारा मुर्झा हे नको असलेल्या संस्थांशी संबंधित आहेत, असाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यांच्यावर देशद्रोहाचाही आरोप आहे.

एक दिवस आपल्या देशावरील अंधार दूर होईल– कारा मुर्झा

दरम्यान, न्यायालयाने दोषी ठरवण्याआधी स्वत:ची बाजू मांडण्याची व्लादिमीर कारा मुर्झा यांना संधी देण्यात आली. यावेळी बोलताना त्यांच्याविरोधातील खटल्याची त्यांनी जोसेफ स्टॅलिन यांच्याशी तुलना केली. विशेष म्हणजे दोषमुक्त करण्याची मागणी करण्याऐवजी ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. मी जे काही बोललो, त्याचा मला अभिमान आहे, असे व्लादिमीर कारा मुर्झा म्हणाले. गुन्हेगार त्याने केलेल्या गुन्ह्यानंतर पश्चात्ताप व्यक्त करतो. मला मात्र राजकीय भूमिकेमुळे तुरुंगात डांबण्यात आले. एक दिवस आपल्या देशावरील अंधार दूर होईल, असा मला विश्वास आहे, असे व्लादिमीर कारा मुर्झा म्हणाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia vladimir putin opponent vladimir kara murza sentence 25 year know detail information prd
Show comments