सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर आहेत. भारत आणि रशिया हे पूर्वीपासूनच एकमेकांचे चांगले मित्र राहिले आहेत; मात्र, कधीकाळी रशियाने भारताला ताब्यात घेण्याची योजना आखली होती. १९ व्या शतकामध्ये साम्राज्यवाद फोफावला होता. आक्रमण करून अधिकाधिक भूप्रदेश आपल्या ताब्यात घेण्याची आणि त्यावर अधिराज्य गाजवण्याची महत्त्वाकांक्षा तत्कालीन सत्ताधाऱ्यांमध्ये होती. रशिया, ब्रिटन, फ्रान्स, नेदरलँड, पोर्तुगाल इत्यादी साम्राज्ये आपापसात संघर्ष करत होती. १९ व्या शतकात रशियातील साम्राज्यवादी सत्ता बरीच महत्त्वाकांक्षी होती. त्यांचा सर्वात मोठा युरोपियन शत्रू म्हणजे ब्रिटन होय. रशियाने याच साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेतून भारतावर आक्रमण करून संपूर्ण भूप्रदेश ताब्यात घेण्याची योजना आखली होती. ब्रिटिशांच्या वाढत्या प्रभावाखाली असलेल्या आशिया खंडाला आपल्या प्रभावाखाली आणण्यासाठी तत्कालीन रशियन झार पहिल्या पॉलने ही महत्त्वाकांक्षी योजना आखली होती. अर्थातच इतिहास असे सांगतो की, ही योजना प्रत्यक्षात उतरू शकली नाही; मात्र, भारतावर आक्रमण करण्याची रशियाची इच्छा मात्र नेहमीच प्रबळ राहिली होती. ब्रिटिशांनी १८१८ साली मराठ्यांचा पराभव करून संपूर्ण भारतावर आपले राज्य प्रस्थापित केले, हा घडलेला इतिहास आहे. मात्र, १८०१ साली रशियन झार पॉलने आखलेले भारतावर आक्रमण करण्याचे नियोजन खरोखरच अमलात आले असते तर कदाचित भारताचा सध्याचा भूराजकीय इतिहास फारच वेगळा असता एवढं नक्की! नेमके काय होते रशियाचे नियोजन आणि ते कुठे फसले, याचा रंजक इतिहास जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : जबरदस्तीने नसबंदीचा ‘तो’ कायदा असंवैधानिक; जपानमधील हा निर्णय महत्त्वपूर्ण का मानला जातोय?

काय होती योजना?

रशिया आणि भारत हे दोन्हीही देश जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असल्यापासूनच एकमेकांचे चांगले मित्र राहिलेले आहेत. रशिया आणि भारत यांच्यातील संबंध आजतागायत अधिकाधिक दृढ होत गेले असून त्याचा दोन्ही देशांना फायदाही झाला आहे. मात्र, इतिहासामध्ये अशीही एक वेळ आली होती, जेव्हा रशियाने भारतावर ताबा मिळवण्याचे स्वप्न पाहिले होते. ही घटना दोनशेहून अधिक वर्षांपूर्वीची आहे. १८०१ साली रशियाचा झार (सम्राट) पहिला पॉल सत्तेवर होता, तेव्हा संपूर्ण भारतावर ब्रिटिशांची सत्ता स्थापन व्हायची होती. मात्र, व्यापाराच्या उद्देशाने भारतात आलेले ब्रिटीश हळूहळू अधिक ताकदवान होऊ लागले होते. त्यांचीही साम्राज्यवादी राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नव्हती. भारतातील काही संस्थाने ताब्यात घेण्यात तर काही संस्थानांमध्ये राजकीय हस्तक्षेप करण्यात ब्रिटिशांना यश आले होते. ब्रिटिशांच्या वाढत्या वर्चस्वाला धक्का देणे आणि आपली सत्ता स्थापन करणे, असे रशियाचा झार पहिल्या पॉलचे स्वप्न होते. मध्य आशिया आणि अफगाणिस्तानमार्गे भारताच्या सीमेपर्यंत जाण्याची योजना पॉलने आखली. यासाठी त्याने फ्रान्सची मदत घेण्याचेही ठरवले होते.

नेपोलियन बोनापार्टची मदत

त्या काळात फ्रान्स हा देशदेखील रशियाप्रमाणेच एक मोठी सत्ता मानला जायचा. १८०१ साली नेपोलियन बोनापार्टची फ्रान्सवर सत्ता होती, त्याचेही भारतावर अधिराज्य करायचे स्वप्न होते. इतिहासकार असे सांगतात की, रशियाचा पॉल आणि फ्रान्सच्या नेपोलियनने एकत्र येत भारतावर आक्रमण करण्याची योजना आखली होती. या योजनेनुसार, फ्रान्स आणि रशियाचे प्रत्येकी ३५ हजार सैन्य एकत्र येणार होते. सध्या इराणमध्ये असलेल्या ‘अस्त्राबाद’मध्ये (सध्याचा जॉर्जन) एकत्र येऊन पुढे भारताच्या दिशेने कूच करण्याचे नियोजन दोघांनी आखले होते. या योजनेनुसार, जॉर्जन ते दिल्ली हे सुमारे १५०० मैलांचे अंतर पार करून ७० हजार सैन्य भारताच्या दिशेने कूच करणार होते. ही योजना यशस्वी करण्यासाठी तत्कालीन जगातील दोन मोठ्या महासत्ता एकत्र आल्या होत्या. इराण आणि अफगाणिस्तानमार्गे भारताच्या सीमेपर्यंत जायचे आणि ब्रिटिशांना पराभूत करायचे, असा त्यांचा मानस होता. मात्र, या नियोजनामध्ये काही संभाव्य धोकेही होते. हे धोके फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्टच्या लवकरच लक्षात आले. इतका मोठा प्रवास करून एवढे मोठे सैन्य आशियाच्या दिशेने कूच करण्यामध्ये प्रचंड मोठे नियोजन अपेक्षित होते. यामध्ये सैन्याचा राहण्याचा आणि खाण्याचा खर्चही समाविष्ट होता. मातृभूमीपासून दूर असताना या मोठ्या सैन्याचे भरणपोषण कसे करायचे, हा त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न होता. मध्य आशियामध्ये आजूबाजूला इतके शत्रू असताना कोणत्याही सहकाऱ्याच्या मदतीशिवाय हजारो मैलांचा प्रवास करत भारतापर्यंत पोहोचणे, हे काम निश्चितच सोपे नव्हते. त्यामुळे नेपोलियनने या योजनेतून माघार घेण्याचे ठरवले.

नेपोलियनने घेतली माघार

नेपोलियनने या नियोजनातून माघार घेतली असली तरीही रशियन झार पहिल्या पॉलची भारतावर आक्रमण करण्याची महत्त्वाकांक्षा कायम होती. त्याला काहीही करून भारतावर आपले राज्य हवे होते. जानेवारी १८०१ मध्ये झार पहिल्या पॉलने आपल्या रशियन लष्कराच्या सर्वांत ताकदवान अशा ‘कोझॅक’ रेजिमेंटच्या वरिष्ठ सेनापतीला या संदर्भात आदेश दिला. कोझॅक ही लष्करी घोडेस्वार म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन जमात होती. मात्र, भारतापर्यंत पोहोचायचे कसे याचा अचूक नकाशा आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे; तसेच भारतात ब्रिटिशांची ताकद किती आहे, याबाबतही पुरेशी माहिती आपल्याकडे नसल्याने भारतावर आक्रमण करणे धोक्याचे आहे, याची कल्पना सेनापतीने झार पहिल्या पॉलला दिली होती. तरीही झारच्या आदेशानंतर १८०१ च्या पूर्वार्धात, रशियाच्या २२ हजार सैनिकांनी भारताच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. थंडी ऐन शिगेला पोहोचलेली असताना हे सैन्य भारताच्या दिशेने निघाले होते. त्यामुळे या सैन्याला आपल्या शस्त्र लवाजम्यासह प्रवास करणे जवळपास अशक्य झाले. त्यांना रशियातून कजागिस्तानमधील अरल समुद्रापर्यंत पोहोचायलाच एक महिना लागला. ते पुढे कूच करण्याच्या नियोजनात होते; मात्र एका बातमीने संपूर्ण सैन्याला धक्का बसला. झार पहिल्या पॉलची हत्या झाल्याची बातमी सैन्याला प्राप्त झाली. या बातमीनंतर झार पॉलचा मुलगा आणि रशियाचा पुढील झार अलिक्सांद्रने भारतावर आक्रमण करण्याचे नियोजन पुढे ढकलण्याचा आदेश दिला. त्याने आपले सगळे सैन्य माघारी बोलावले. त्याने भारतावर आक्रमण करण्यापेक्षा युरोपातील घडामोडींमध्येच अधिक लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला. अशा प्रकारे भारतावर आक्रमण करण्याचे रशियाचे नियोजन फसले होते.

हेही वाचा : ‘पर्यटकांनो, घरी जा!’ बार्सिलोनामधील स्थानिक लोक पर्यटकांवर पाण्याचे फवारे का मारत आहेत?

आक्रमणाचे दुसरे नियोजन

१८५४ साली जनरल अलिक्सांद्र ओसिपोविच दुहामेलने भारतावर आक्रमण करण्याचे पुन्हा नवे नियोजन आखले. एव्हाना भारतावर ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली होती. पर्शिया आणि अफगाणिस्तानमार्गे खैबरखिंडीतून भारतापर्यंत पोहोचायचे, असे ठरवण्यात आले होते. या कामी अफगाणिस्तानचे आदिवासी आणि पर्शियन लोकही लूटालूट आणि साधनसंपत्तीच्या हव्यासापोटी आपल्या आक्रमणाला पाठिंबा देतील, असा दुहामेलचा होरा होता. मात्र, हे नियोजनही तडीस गेले नाही. कारण, ऑक्टोबर १८५३ साली क्रिमियन युद्धाला सुरुवात झाली होती. फेब्रुवारी १८५६ पर्यंत सुरू राहिलेल्या या युद्धामध्ये रशियन साम्राज्याच्या विरोधात ऑटोमन साम्राज्य, फ्रान्स आणि ब्रिटन ही साम्राज्ये एकत्र येऊन लढत होती. या सगळ्या सत्तांविरोधात लढणाऱ्या रशियाला आपले पूर्ण लक्ष आणि उपलब्ध संसाधने तिकडे वळवावी लागली; त्यामुळे भारतावर अधिराज्य गाजवण्याची महत्त्वाकांक्षा असूनही रशियाचे नियोजन दुसऱ्यांदा फसल्याचे दिसून आले. अखेरीस या क्रिमियन युद्धातही रशियाचा पराभव झाला. १८५५ साली पुन्हा एकदा जनरल स्टेपन ख्रुलेव यांनी असाच प्लॅन आखला. यामध्ये ३० हजार रशियन सैन्याचा समावेश होता. पुन्हा एकदा पर्शिया आणि अफगाणिस्तानमार्गे कूच करून ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतावर आक्रमण करण्याचा उद्देश होता. मात्र, पुन्हा एकदा व्यावहारीक कारणांमुळे हे आक्रमणही फसले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russian emperor paul i russia once planned to invade and capture india vsh
Show comments