-अमोल परांजपे

रशियामध्ये घडणाऱ्या घडामोडींचा जगावर परिणाम होत असला तरी भारतात घडलेल्या एका विचित्र घटनेमुळे रशियाचे राजकारण मात्र हादरले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याच पक्षाच्या दोन नेत्यांचा ओदिशामधील एका हॉटेलमध्ये दोन दिवसांत मृत्यू झाला आहे. यापैकी एक पुतिन यांचे उघड टीकाकार होते.

ओदिशामधील हॉटेलमध्ये नेमके काय घडले? 

रशियात ‘मटण सॉसेज’ उद्योगामध्ये अग्रणी असलेले पावेल अँटोव्ह हे आपला ६५वा वाढदिवस साजरा करण्यासाठी भारतात आले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे अन्य तीन सहकारी आणि भारतीय पर्यटन मार्गदर्शक (गाईड) यांनी रायगडा भागातील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. २५ डिसेंबर रोजी अँटोव्ह हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडले. मार्गदर्शकाने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले, मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. 

अँटोव्ह हे केवळ उद्योजक होते की आणखी काही? 

अँटोव्ह हे युनायटेड रशिया या पक्षाचे व्लादिमीर भागातील असेम्ब्ली सदस्य होते. त्यांचा पक्ष हा पुतिनधार्जिणा असला तरी अँटोव्ह यांनी मात्र युक्रेन युद्धावर टीका केली होती. जून महिन्यात समाजमाध्यमांवर व्यक्त झाले होते. “एका मुलीला ढिगाऱ्याखालून काढण्यात आले. मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे दिसते आहे. तिच्या आईला क्रेनच्या मदतीने बाहेर काढावे लागले. खरे सांगायचे तर याला अतिरेकी हल्ल्याखेरीज दुसरे काहीही म्हणणे कठीण आहे,” असे त्यांनी लिहिले होते. यावर टीका झाल्यानंतर अँटोव्ह यांनी माफी मागत हे लिखाण हटविले. 

अँटोव्ह यांच्या सहकाऱ्याच्या मृत्यूचे गूढ काय? 

अँटोव्ह यांच्या मृत्यूपूर्वी दोन दिवस, २२ डिसेंबरला त्यांच्याबरोबर आलेले त्यांच्याच पक्षाचे एक नेते व्लादिमिर बुडानोव्ह (६१) यांचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत आढळून आला. शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका नोंदविले गेले आहे. मात्र अवघ्या दोनच दिवसांत त्याच हॉटेलमध्ये पुतिनविरोधक सहकारी अँटोव्ह यांच्या मृत्यूमुळे आता बुडानोव्ह यांच्या मृत्यूवरही संशयाचे ढग जमा झाले आहेत. 

अँटोव्ह यांची आत्महत्या, अपघात की घातपात? 

बुडानोव्ह यांच्या अकस्मित मृत्यूमुळे अँटोव्ह प्रचंड खचले होते, अशी माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे अँटोव्ह यांनी तणावातून आत्महत्या केल्याची एक शक्यता वर्तविली जात आहे. ते अपघाताने तिसऱ्या मजल्यावरून पडले असू शकतात. मात्र, रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेहच थेट दृष्टीस पडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या घटनेमागील घातपाताची शक्यता अद्याप नाकारण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे पुतिन यांच्यावर टीका केल्यानंतर मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना नाही. 

टीकाकारांचे ‘अकस्मिक’ मृत्यू कसे होतात? 

याच वर्षी सप्टेंबर महिन्यात ‘ल्यूकऑईल’ या रशियन कंपनीचे अध्यक्ष राविल मेगानोव्ह मॉस्कोमधील एका रुग्णालयाच्या खिडकीतून पडून मृत्युमुखी पडले होते. त्याआधी काही दिवस त्यांनी रशियाने केलेल्या हल्ल्यावर टीका करून युद्ध तातडीने थांबवण्याची मागणी केली होती. त्याच्या आदल्या महिन्यात, ऑगस्टमध्ये युक्रेन युद्धाचे आणखी एक टीकाकार, उद्योगपती डॅन रॅपोपोर्ट अमेरिकेतील वॉशिंग्टन शहरात मृतावस्थेत आढळून आले. यापूर्वीही २००३ ते २०१६ या काळात पुतिन यांच्यावर जाहीर टीका केल्यानंतर किमान ९ प्रसिद्ध रशियन व्यक्तींना ‘अकस्मिक’पणे जगाचा निरोप घ्यावा लागला होता, हे विशेष. 

रशियन वकिलातीचे म्हणणे काय? 

पावेल अँटोव्ह यांच्या मृत्यूमध्ये काहीही संशयास्पद नसल्याची प्रतिक्रिया दिल्लीतील रशियन वकिलातीने दिली आहे. आपण स्थानिक पोलिसांच्या संपर्कात असून त्यांनी यामागे घातपात नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अँटोव्ह यांचा मृत्यू ही तणावातून केलेली आत्महत्याच असल्याचे वकिलातीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. दोन दिवसांत झालेल्या दोन अकस्मिक मृत्यूंचा तपास ओदिशा पोलिसांनी सुरू केला असला तरी त्यात अद्याप काही संशयास्पद आढळलेले नाही. 

तपासातून काही निष्पन्न होईल का?

बुडानोव्ह आणि अँटोव्ह यांच्या अकस्मिक मृत्यूचा तपास सीआयडीमार्फत करण्यात येत आहे. अन्य देशांमध्ये असलेले गुप्तहेरांचे जाळे आणि त्यामार्फत होणाऱ्या घातपाती कारवाया, हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक भाग आहे. अमेरिकेची सीआयए, इस्रायलची मोसाद अशा काही गुप्तहेर संघटना तर अशा हत्या करून पुरावे नष्ट करण्यात वाकबगार मानल्या जातात. त्यामुळे सीआयडी तपासातून फारसे काही हाती लागण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही.

Story img Loader