रशियाबरोबर सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनने मोठा दावा केला आहे. रशियन सैन्याने युक्रेनच्या ताब्यातील प्रदेशात सॅटेलाइट इंटरनेटसाठी एलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीच्या स्टारलिंकचा वापर केला आहे. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी काही तास आधी मॉस्कोने यूएस आधारित उपग्रह कंपनी Viasat चे राऊटर निष्क्रिय करण्यासाठी मालवेअरचा वापर केला होता, युक्रेनियन सैन्याची कमांड सिस्टीम खराब केली, विशेष म्हणजे त्यासाठी एलॉन मस्कच्या स्टारलिंकचा वापर केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. एलॉन मस्कच्या मालकीची स्टारलिंक सेवा युक्रेनमध्ये सक्रिय असून, SpaceX ने स्टारलिंक टर्मिनल्स कीवला पाठवायला सुरुवात केली. त्यामुळेच दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात मोठ्या युद्धापैकी एक समजल्या जाणाऱ्या रशिया-युक्रेन युद्धात युक्रेन सैन्याला रशियन सैन्यावर मात करण्यासाठी स्टारलिंकचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. परंतु स्टारलिंकची ही सेवा आता गुप्तपणे रशियाही वापरत असल्याचं समोर आलं आहे. कारण रशिया कथितपणे स्टारलिंक टर्मिनल्स सेवा अरब देशातील खासगी विक्रेत्यांकडून खरेदी करीत आहे. तसेच त्याचा युक्रेनमध्येही वापर केला जात आहे. रशिया हजारो स्टारलिंग रिसिव्हर्स वापरत असून, त्याच्या नेटवर्कचा फायदा रशियाला युक्रेनच्या भागांमध्ये होत आहे. परंतु रशिया आणि SpaceX या दोघांनी एकमेकांना स्टारलिंक टर्मिनल्स विकल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.
रशियन सैन्य स्टारलिंक वापरत आहे
युक्रेनच्या मुख्य लष्करी गुप्तचर संस्थेने रविवारी सांगितले की, फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाशी सुरू झालेल्या युद्धानंतर युक्रेनला मदत करण्यासाठी स्टारलिंक टर्मिनल पाठवण्यात आले होते, परंतु रशियन सैन्य इंटरनेट सेवांसाठी स्टारलिंक वापरत आहेत.
हेही वाचाः डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, भरावा लागणार ३५५ दशलक्ष डॉलरचा दंड, नेमकं कारण काय?
रशियाची ८३ वी एअर ॲसॉल्ट ब्रिगेड याचा वापर करतेय
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्य गुप्तचर संचालनालयाने प्रवक्ते आंद्रे युसोव्हच्या हवाल्याने सांगितले की, रशियाने युक्रेनच्या व्यापलेल्या प्रदेशांमध्ये या उपकरणांच्या वापराची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, हे टर्मिनल रशियाच्या ८३ व्या हवाई आक्रमण ब्रिगेडद्वारे वापरले जात आहेत.
हेही वाचाः गुगलने लाँच केले नवे AI मॉडेल जेमिनी १.५; अनेक अवघड कामे होणार सोपी, भारतातही सेवा सुरू
एलॉन मस्क यांनी दावे फेटाळले
स्टारलिंकचे म्हणणे आहे की, ते रशियन सरकार किंवा सैन्याशी कोणत्याही प्रकारचे व्यवसाय करीत नाही. रविवारी X वरील एका पोस्टमध्ये मस्क म्हणाले की, आमच्या माहितीनुसार एकही स्टारलिंक रशियाला विकला गेलेला नाही. स्पेसएक्स रशियाला स्टारलिंक टर्मिनल्स विकत असल्याचा दावा अनेक खोट्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे, जो पूर्णतः खोटा आहे. युक्रेनच्या दोन सरकारी सूत्रांनी या आठवड्याच्या सुरुवातीला रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की रशियन-व्याप्त युक्रेनियन प्रदेशात रशियन सैन्याने स्टारलिंकचा वापर केला होता. ते म्हणाले की रशियन सैन्याने मोठ्या प्रमाणावर डेटा मिळविण्यासाठी याचा वापर केला आहे.
स्टारलिंक म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?
स्टारलिंक उपग्रहांच्या मोठ्या नेटवर्कच्या मदतीने इंटरनेट सेवा प्रदान करते. दुर्गम भागात राहणाऱ्या आणि जलद इंटरनेटची गरज असलेल्या लोकांना लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. हे उपग्रह खालच्या कक्षेत ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून पृथ्वीशी संपर्क अधिक जलद प्रस्थापित करता येईल आणि चांगला वेग प्रदान करता येईल. असे मानले जाते की, स्टारलिंकने २०१८ पासून ३ हजार उपग्रह अवकाशात पाठवले आहेत. ख्रिस हॉल, तंत्रज्ञान वेबसाइट पॉकेट लिंटचे संपादकीय संचालक ख्रिस हॉल सांगतात की, “हे पर्वत आणि वाळवंट यांसारख्या दुर्गम भागात उपग्रहाद्वारे इंटरनेट पुरवण्याशी संबंधित समस्यांवर मात करते.” “अशा पद्धतीच्या इंटरनेटसाठी केबल्स आणि मास्ट यांसारख्या मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची गरज नसते.”
स्टारलिंक युक्रेनमध्ये कशी मदत करत आहे?
रशियाच्या आक्रमणानंतर काही दिवसांनी एलॉन मस्कने युक्रेनमध्ये स्टारलिंक सेवा सुरू केली, जेव्हा रशियाने तेथील इंटरनेट आणि मोबाइल सेवा बंद केली. मस्क म्हणतात की, डिश रिसीव्हर आणि राऊटरचे २० हजार संच युक्रेनला पाठवण्यात आले आहेत. युक्रेनचे उपपंतप्रधान मिखाइलो फ्योदोरोव्ह म्हणतात की, स्टारलिंकने अनेक अत्यावश्यक सेवा पुन्हा सुरू करण्यात खूप मदत केली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “१०० हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रांनी दळणवळण आणि ऊर्जा पायाभूत सुविधांचा नाश केला. पण स्टारलिंकने त्वरित सर्व सुविधा पुनर्संचयित करण्यात मदत केली.” युक्रेनही युद्धभूमीवर स्टारलिंकचा वापर करीत आहे. किंग्ज कॉलेज लंडनमधील संरक्षण अभ्यास संशोधक डॉ. मरिना मिरॉन यांच्या मते, “युक्रेनियन सैन्य त्यांचा उपयोग मुख्यालय आणि सैन्य यांच्यातील संपर्कासाठी करीत आहेत.” “इतर रेडिओ सिग्नल्सच्या विपरीत त्यांचे सिग्नल जाम होऊ शकत नाहीत आणि किट सेट होण्यासाठी फक्त १५ मिनिटे लागतात.”
मस्कने स्टारलिंकची सेवा बंद करण्याची धमकी का दिली?
ऑक्टोबरच्या सुरुवातीस एलॉन मस्कने सांगितले की, युक्रेन क्रिमिया रशियाच्या ताब्यात देईल आणि रशियन सैन्याला त्यांनी ताब्यात घेतलेल्या भागात सार्वमत घेण्याची परवानगी दिली जाईल. स्टारलिंकवर ८० दशलक्ष डॉलर्स खर्च केले जेणेकरून रशिया ते जाम करू नये. यासाठी आपण पैसे खर्च करणार नसून त्याचा खर्च अमेरिकन सरकारने उचलावा, असे ते म्हणाले. त्यांनी नंतर ट्विट केले की, “स्टारलिंक पैसे गमावत आहे आणि इतर कंपन्यांना लाखो करदात्यांचे डॉलर्स मिळत आहेत, परंतु आम्ही युक्रेन सरकारला निधी देणे सुरू ठेवू,” असंही त्यांनी सांगितले.
स्टारलिंक जगात इतर कोठे वापरले जाऊ शकते?
स्टारलिंक सध्या जगातील ४० देशांमध्ये घरे आणि कंपन्यांना सेवा देत आहे. यामध्ये अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे. पण सामान्य इंटरनेटच्या तुलनेत ते फार स्वस्त नाही. डिश आणि राऊटरची किंमत ५९९ डॉलर आहे आणि मासिक शुल्क सुमारे ११० डॉलर आहे. स्टारलिंकचे म्हणणे आहे की, आतापर्यंत त्यांचे सात लाख सदस्य आहेत. लंडन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस पॉलिसी अँड लॉचे प्रोफेसर सईद मोतेशर म्हणतात, “बहुतेक विकसित देशांमध्ये आधीच हाय-स्पीड इंटरनेट आहे. स्टारलिंक खूप कमी मार्केट शेअरवर अवलंबून आहे.” पुढील वर्षी स्टारलिंकला आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका तसेच आशियातील हार्ड-टू-पोच क्षेत्रांमध्ये व्याप्ती वाढवायची आहे. पण मोतेशर म्हणतो, “स्टारलिंकची किंमत आफ्रिकेसाठी खूप जास्त आहे. पण ग्रामीण शाळा आणि रुग्णालयांसाठी ते खूप उपयुक्त ठरेल.”
स्टारलिंक उपग्रह सुरक्षित आहे का?
स्टारलिंक ही कमी कक्षा उपग्रहांद्वारे इंटरनेट प्रदान करणारी एकमेव सेवा प्रदाता नाही. Amazon देखील त्याचे हजारो Quiper उपग्रह प्रक्षेपित करीत आहे, OneWeb देखील त्याचे उपग्रह पाठवत आहे. मोतेशर म्हणतात की, कमी कक्षेत उपग्रहामध्ये समस्या असू शकतात. “जलद गतीने जाणारे उपग्रह इतर वस्तूंशी आदळू शकतात आणि त्यांची मोडतोड होऊ शकते.” अलीकडच्या काळात स्टारलिंक उपग्रहांनी इतर वस्तूंशी टक्कर टाळली आहे, यामध्ये चीनच्या अंतराळ स्थानकाचा समावेश आहे. युनिव्हर्सिटी ऑफ पोर्ट्समाउथच्या डॉ. लुसिंडा किंग म्हणतात, “जर उपग्रहाचा तुटलेला भाग मोठ्या प्रमाणात अवकाशात पसरला, तर कमी कक्षा भविष्यात निरुपयोगी होईल.” सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ते उघड्या डोळ्यांना दिसतात, कारण त्यांच्यावर सूर्यप्रकाश पडतो. यामुळे दुर्बिणीतून काढलेली छायाचित्रे वेगळी दिसतात. स्टारलिंकचे म्हणणे आहे की, ते उपग्रहाची चमक कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.