Russia Ukraine War Latest News : गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या कुर्स्क प्रदेशावर हल्ला करून सुमारे १,३०० चौरस किलोमीटरचा भूभाग ताब्यात घेतला. गमावलेला प्रदेश परत मिळविण्यासाठी रशियाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहे. रविवारी रशियन सैन्याच्या विशेष तुकडीने कुर्स्कमध्ये असलेल्या युक्रेनियन सैन्यावर हल्ला करण्यासाठी विशेष रणनीतीचा वापर केला. गॅस पाईपलाईनमधून सुमारे १५ किमी पायी जात रशियन जवान अक्षरश: युक्रेनच्या सैन्यावर तुटून पडले. या भागात नव्याने पेटलेल्या संघर्षात दोन्ही बाजूंची मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, रशियाचे जवान गॅस पाईपलाईनमध्ये कसे शिरले, त्यांचा युक्रेच्या सैन्याने कसा प्रतिकार केला? याबाबत जाणून घेऊ.

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये २४ फेब्रुवारी २०२२ पासून संघर्ष सुरू आहे. या संघर्षात आतापर्यंत हजारो निष्पाप लोकांनी जीव गमावला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबावे यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही त्यांना युद्ध थांबवण्यात फारसं यश मिळालं नसल्याचं दिसून येत आहे, ज्यामुळे अलीकडच्या काळात डोनाल्ड ट्रम्प दोन्ही देशांबाबत कठोर निर्णय घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : कुलभूषण जाधव यांचं अपहरण करणारा मुफ्ती शाह मीर कोण होता? त्याची हत्या कुणी केली?

रशियाच्या कुर्स्क क्षेत्रावर युक्रेनचा कब्जा

ऑगस्ट २०२४ मध्ये युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या कुर्स्क क्षेत्रावर हल्ला केला आणि सुमारे १३०० किमीपर्यंतचा भुभाग काबीज केला. एवढ्यावरच न थांबता युक्रेनियन सैन्याने कुर्स्क प्रदेशातील ७४ गावे ताब्यात घेतली. युक्रेनच्या अचानक हल्ल्यानंतर दोन लाख रशियन नागरिक जीव वाचविण्यासाठी आपलं घर सोडून इतर भागात आश्रयासाठी गेले. या हल्ल्यादरम्यान युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या अनेक जवानांना बंदीही केलं होतं. युक्रेनच्या या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी रशियाने कुर्स्कच्या भागात ५० हजारांहून अधिक जवान तैनात केले आहेत. रशियन सैनिक वेगवेगळ्या युद्धनीतीचा वापर करून या प्रदेशावर पुन्हा नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

रशियन जवान गॅस पाईपलाईनमध्ये कसे शिरले?

कुर्स्क प्रदेशातील सुदझा येथे एक मोठे गॅस वाहतुकीचे केंद्र आहे, ज्याद्वारे रशियातील नैसर्गिक वायू युरोपमध्ये नेला जातो. रशियन युद्ध ब्लॉगर्सच्या मते, रशियन जवानांनी याच गॅस पाईपलाईनचा वापर करून युक्रेनच्या सैन्यावर पाठीमागून हल्ला करण्याची रणनीती आखली. त्यानुसार, रशियाचे काही जवान गॅस पाईपलाईनमध्ये शिरले. त्यांनी सुमारे १५ किलोमीटर चालत जाऊन कुर्स्कमधील सुदझाजवळ युक्रेनच्या सैन्याला घेरलं. ब्लॉगर्सने सांगितले की, दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रात्रभर लढाई सुरू होती आणि कुणीही मागे हटण्यास तयार नव्हते. युक्रेनच्या जनरल स्टाफनेही या घटनेची पुष्टी केली आहे. रशियन सैनिकांनी केलेला हा हल्ला भ्याड असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

रशियन सैन्याने गॅस पाईपलाईनमध्ये घालवले अनेक दिवस

क्रेमलिन समर्थक आणि युक्रेनियन वंशाचे युद्ध ब्लॉगर युरी पोडोल्याका यांनी टेलिग्रामवर दावा केला की, रशियन जवानांनी युक्रेनच्या सैन्यावर हल्ला करण्यापूर्वी गॅस पाईपलाईनमध्ये अनेक दिवस घालवले होते. टू मेजर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणखी एका ब्लॉगरने कुर्स्क प्रदेशात झालेल्या लढाईबाबत सविस्तर सांगितले आहे. रशियन टेलिग्राम चॅनेल्सनी प्रसारित केलेल्या फोटोंमध्ये रशियाचे जवान गॅस पाईपलाईनमध्ये मास्क घालून बसलेले दिसत होते. दरम्यान, युक्रेनच्या जनरल स्टाफने शनिवारी (८ मार्च) टेलिग्रामवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये ते म्हणाले की, रशियाच्या सैनिकांनी युक्रेनच्या जवानांवर लपून गोळीबार सुरू केला होता. मात्र, आमच्या सैन्याने त्यांना जशाच तसे प्रत्युत्तर दिले.

युक्रेनकडून रशियन सैन्यावर तोफांनी हल्ला

रशियन सैनिकांनी गॅस पाईपलाईनचा वापर करून हल्ला करताच युक्रेनने त्यांच्यावर रॉकेट आणि तोफांनी जोरदार हल्ला केला आहे, यामुळे दोन्ही देशांचे अनेक सैनिक मारले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता युक्रेन सुझा भागात असलेली आपली शस्त्रे व दारूगोळा रशियन सीमेच्या दिशेने हलवत आहे, यामुळे आगामी काळात या युद्धाला आणखी गंभीर वळण मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, रशियाने या युद्धनितीचा वापर करून युक्रेनच्या ताब्यात असलेला काही परिसर पुन्हा परत मिळवला आहे. मात्र, अजूनही कुर्स्क प्रदेशाचा काही भाग युक्रेनच्या ताब्यात असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : गहू आणि साखरेचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार? यामागची कारणं काय?

रशियाने युक्रेनच्या १० हजार जवानांना घेरलं

न्यूयॉर्क टाईम्सच्या मते, दुसऱ्या महायुद्धानंतर कोणत्याही देशाने रशियन सीमेत घुसखोरी करण्याची ही पहिलीच वेळ होती. अलीकडच्या काही महिन्यांत, रशियन सैन्याने कुर्स्क प्रदेशातील युक्रेनियन सैन्याला लक्षणीयरीत्या मागे ढकलले आहे. इतकंच नाही तर त्यांनी या भागातील युक्रेनच्या सुमारे १० हजार सैनिकांना घेरलं आहे. कुर्क भागातून युक्रेनने फौजा मागे घेण्याची घोषणा केली नाही तर हजारो सैनिकांना प्राण गमावावे लागतील, असा इशारा रशियाने दिला आहे.

युक्रेनचे अनेक भाग रशियाने घेतले ताब्यात

दरम्यान, युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने युक्रेनचा सुमारे २०% भाग ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये युक्रेनचे चार पूर्वेकडील प्रांत – डोनेस्तक, लुहान्स्क, झापोरिझ्झिया आणि खेरसन यांचा समावेश आहे. दुसरीकडे रशियाचा कुर्स्क प्रदेश युक्रेनने आपल्या ताब्यात घेतला आहे. या भागात सध्या दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घमासान युद्ध सुरू आहे.

अमेरिका रशियावर निर्बंध लादणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत ट्रम्प म्हणाले, “वास्तविकता पाहिली तर रशियाने युक्रेनला युद्धात चांगलीच धूळ चारली आहे, त्यामुळे जोपर्यंत युद्धबंदी करून शांतता करार केला जात नाही, तोपर्यंत रशियावर मी मोठ्या प्रमाणात बँकिंग निर्बंध आणि आयातशुल्क लादण्याचा गंभीरतेने विचार करत आहे. उशीर होण्याआधी रशिया आणि युक्रेनने एकाच मंचावर येऊन एकमेकांशी संवाद साधण्याची गरज आहे, धन्यवाद!!!” दरम्यान, ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर रशिया आणि युक्रेन युद्ध करार करून संघर्ष थांबवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader