केरळमधील शबरीमला मंदिर पुन्हा एकदा एका नव्या वादामुळे चर्चेत आले आहे. परंतु, यंदाचा वाद मासिक पाळीशी किंवा महिलांच्या मुद्द्याशी संबंधित नाही. मल्याळम अभिनेता मोहनलाल यांनी त्यांचा मित्र अभिनेता मामूटीसाठी प्रार्थना करण्यासाठी शबरीमला मंदिरात भेट दिली, तेव्हापासून या वादाची सुरुवात झाली. १८ मार्च रोजी मोहनलाल यांनी मंदिराला दिलेल्या भेटीची एक पावती सोशल मीडियावर व्हायरल झाली, त्यावरून सोशल मीडियावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. पावतीमध्ये मामूटी यांचे जन्माचे नाव मुहम्मद कुट्टी असे लिहिले गेले होते, त्यामुळे काही लोकांनी मामूटी यांच्यासाठी हिंदू मंदिरात प्रार्थना करण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे वादाच्या केंद्रस्थानी असणारे शबरीमला मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काय आहे या मंदिराचा इतिहास? या मंदिराभोवतीचे वाद काय? त्याविषयी जाणून घेऊ.

शबरीमला मंदिर

केरळमधील पथनमथिट्टा जिल्ह्यातील पेरियार व्याघ्र प्रकल्पात स्थित शबरीमला मंदिर हे देवता भगवान अय्यप्पा यांचे स्थान आहे. हे मंदिर जगातील सर्वात मोठ्या तीर्थयात्रेचे आयोजन करण्यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. या मंदिरात लाखो भाविक मंदिराकडे जाणाऱ्या १८ सोन्याचा मुलामा दिलेल्या पायऱ्या चढण्यासाठी दुरून येतात. हे मंदिर भगवान अय्यप्पाला समर्पित आहे. भगवान अय्यप्पा शिव आणि मोहिनी (विष्णूचा स्त्रीलिंगी अवतार) यांचे पुत्र मानले जातात.

केरळमधील पथनमथिट्टा जिल्ह्यातील पेरियार व्याघ्र प्रकल्पात स्थित शबरीमला मंदिर हे देवता भगवान अय्यप्पा यांचे स्थान आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

केरळ सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या त्रावणकोर देवस्वोम बोर्डाद्वारे या मंदिराचे व्यवस्थापन केले जाते. हे मंदिर एका विशिष्ट काळात पूजेसाठी खुले असते. मंडलपूजा (नोव्हेंबर-डिसेंबर), मकर संक्रांती (१४ जानेवारी), महाविशुव संक्रांती (१४ एप्रिल) आणि प्रत्येक मल्याळम महिन्याचे पहिले पाच दिवस हे मंदिर खुले असते. मंदिरात जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत, परंतु मंदिराकडे जाणारा एरुमेली मार्ग सर्वात पारंपरिक आणि आव्हानात्मक मानला जातो. हा मार्ग जंगल आणि टेकड्यांमधून जातो, ज्याचे अंतर सुमारे ६१ किलोमीटर आहे.

शबरीमला मंदिराचा इतिहास

शबरीमला मंदिराची उत्पत्ती अनेक शतके जुनी आहे. भगवान परशुरामांनी याची स्थापना केली असे मानले जाते. हे मंदिर त्यांनी स्थापन केलेल्या पाच मंदिरांपैकी एक आहे. परंतु, जवळजवळ तीन शतके काही भौगोलिक आव्हानांमुळे हे मंदिर दुर्गम होते. १२ व्या शतकात, पंडालम राजवंशातील राजकुमार मणिकंदन यांनी मंदिराकडे जाणारा मार्ग शोधून काढला आणि भक्तगण या मंदिरात दर्शनासाठी जाऊ लागले. या भक्तांमध्ये मुस्लीम आक्रमणकर्ता वावर किंवा बाबर याचे वंशजदेखील होते. त्याला मणिकंदन यांनी पराभूत केले होते. मणिकंदन यांना भगवान अय्यप्पाचा अवतार मानले जाते आणि असे म्हटले जाते की, त्यांनी मंदिरात ध्यान केले आणि त्यांना जागृती मिळाली.

शबरीमला मंदिरात जाण्यापूर्वी यात्रेकरूंना काही विधी पार पाडावे लागतात. त्यातील एक प्रमुख आणि महत्त्वाची मानली जाणारी प्रथा म्हणजे तीर्थयात्रेपूर्वी ४१ दिवस ब्रह्मचर्य पाळणे. त्यांनी दुग्धजन्य शाकाहारी आहाराचे पालन करणे, मद्यपान टाळणे, अपवित्र बोलणे टाळणे आणि त्यांचे केस किंवा नखे कापणे टाळणेदेखील महत्त्वाचे असते. यात्रेकरूंनी दिवसातून दोनदा स्नान करणे आणि स्थानिक मंदिरांना नियमितपणे भेट देणेदेखील अपेक्षित असते. तीर्थयात्रेदरम्यान, यात्रेकरू काळे किंवा निळे कपडे घालतात, दाढी करणे टाळतात आणि कपाळावर विभूती म्हणजेच चंदनाचा लेप लावतात.

शबरीमला मंदिराची उत्पत्ती अनेक शतके जुनी आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

मंदिर प्रवेश आणि मासिक पाळीचा वाद

मंदिरातील सर्वात वादग्रस्त राहिलेला विषय म्हणजे मासिक पाळी येणाऱ्या महिलांना मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी घालणे. मंदिरात ही प्रथा शतकानुशतके पाळली जात आहे. भक्तांचा असा विश्वास आहे की, भगवान अयप्पा ब्रह्मचारी असल्याने मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यास त्यांना त्रास होऊ शकतो. या परंपरेचे स्पष्टीकरण देणाऱ्या दोन आख्यायिकादेखील आहेत. एका आख्यायिकेनुसार भगवान अयप्पाने मलिकपुरथम्मा नावाच्या एका राक्षसी महिलेशी लग्न करण्यास नकार दिला. तिला पराभूत केल्यानंतर तिने भगवान अय्यप्पा यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. भगवानांची अट अशी होती की, जेव्हा भक्त त्यांना भेटणे बंद करतील, तेव्हाच तो तिच्याशी लग्न करेल.

दुसऱ्या आख्यायिकेनुसार भगवान अयप्पा यांना एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व मानले जाते आणि बाबर (किंवा वावर) नावाच्या अरब आक्रमणकर्त्याला पराभूत केल्यानंतर त्यांनी ब्रम्हचार्य स्वीकारण्याचा आणि महिलांपासून लांब राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. याच पार्श्वभूमीवर, १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करण्यावर अनेक वर्षांपासून बंदी आहे. महिलांच्या उपस्थितीमुळे देवतेच्या ब्रह्मचारी स्वभावाला त्रास होऊ शकतो, असे सांगत महिलांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

महिलांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून कायदेशीर लढाई आणि निषेध

शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा म्हणजे दीर्घकाळापासून सुरू असलेली कायदेशीर आणि राजकीय लढाई आहे. १९९१ मध्ये केरळ उच्च न्यायालयाने भगवान अय्यप्पा यांच्या ब्रह्मचारी स्वभावाचे कारण देत १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घातली होती. परंतु, २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली. ही बंदी असंवैधानिक आणि भेदभावपूर्ण असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सांगणे होते.

न्यायालयाने ४-१ अशा बहुमताने हा निर्णय दिला होता आणि ही बंदी महिलांच्या समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करते, असे सांगितले होते. न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांच्यासह पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ही जुनी हिंदू धार्मिक प्रथा बेकायदा असल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने वाद आणखी चिघळला. उजव्या विचारसरणीच्या गटांनी, राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात या निर्णयाविरोधात निदर्शने केली. त्यांनी या निर्णयाला हिंदू श्रद्धा आणि चालीरीतींवर हल्ला म्हटले आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही महिलांना मंदिरात प्रवेश दिला नाही.