रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण काय खातो, याकडे आपण फारसे लक्ष देत नाही. रोजच्या घरगुती जेवणाव्यतिरिक्त कितीतरी अतिरिक्त पदार्थ आपण रोजच्या आहारात खात असतो. त्यात बिस्किटं, वेफर्स, चॉकलेट्स, बर्गर्स, समोसे, केक इत्यादी अनेक पदार्थांचा समावेश असतो. कधीतरी हे पदार्थ खाण्यास काहीच हरकत हरकत नाही. परंतु आजच्या आधुनिक जगण्यात असे पदार्थ आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट झाले आहेत. त्यामुळेच मीठ आणि साखरेसारख्या ‘पांढऱ्या विषा’चे अतिरिक्त सेवन आपण रोजच करतो. त्यामुळेच त्यांच्या अतिसेवनामुळे अनेक विकारांना सामोरे जाण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. म्हणूनच डॉक्टर मंडळी मीठ आणि साखर यांना ‘पांढरे विष’ म्हणतात. अनेकांना प्रश्न पडू शकतो, हे दोन्ही पदार्थ नैसर्गिक आहेत, मग हे विष कसे काय? तेच जाणून घेण्याचा हा प्रयत्न ..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीठ म्हणजे आयुष्य. संस्कृत मध्ये मिठाला लवण असे म्हणतात. तर रासायनिक परिभाषेत मिठाला सोडियम क्लोराइड अशी संज्ञा आहे. आयुर्वेदात नैसर्गिक मिठाचे अनेक गुणधर्म सांगितलेले आहेत. किंबहुना भारतीय संस्कृतीतील मिठाचे महत्त्व सांगणाऱ्या अनेक कथा देखील धार्मिक साहित्यात उपलब्ध आहेत. मार्गशीष महिन्यात करण्यात येणाऱ्या महालक्ष्मीच्या व्रताची कथा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. महालक्ष्मीची परम भक्त शामबाला माहेरून आपल्या पतीच्या घरी येते, त्यावेळी तू माहेरून काय आणलेस हे तिच्या पतीने विचारताच, अळणी केलेल्या पदार्थांच्या जेवणाच्या ताटात मीठ वाढते आणि ‘मी राज्याचे राज्याचं सार आणिले’ हे उत्तर देते. यावरूनच रोजच्या आयुष्यातील मिठाचे महत्त्व लक्षात येते.

आणखी वाचा: विश्लेषण : गद्दार कोण? मानसिंग ते जयचंद भारतीय गद्दारांचा सापेक्ष इतिहास ! 

मराठी विश्वकोशात नमूद केल्याप्रमाणे ‘शरीरातील अम्ल व क्षारक यांच्यामधील संतुलन, कोशिकांची पारगम्यता, जल समतोल, तंत्रिकांची (मज्‍जातंतूंची) संवेदनक्षमता व तर्षण दाब यांचे नियंत्रण करण्यासाठी मीठ आवश्यक असते. अन्नपचनासाठी लागणाऱ्या हायड्रोक्लोरिक अम्लाची जठरात निर्मिती व्हावी यासाठी मीठ गरजेचे असते. मूत्र व घाम यांमधून काही प्रमाणात मीठ बाहेर टाकले जाते आणि त्याची भरपाई करण्यासाठी आहारात योग्य प्रमाणात मीठ असावे लागते’. जेवणातील बहुतांश पदार्थ मिठाशिवाय पूर्ण होवू शकत नाही. याच मिठाचे गुणधर्म अनेक आहेत. तसेच त्याचा अतिरेक हाही हानीकारक ठरू शकतो. खरंतर आपल्या रोजच्या आयुष्यात दर दिवसाला ४ ग्रॅम इतक्याच मिठाची शरीराला गरज असते व ही गरज आपल्या रोजच्या दोन वेळच्या जेवणातून परिपूर्ण होत असते. असे असताना इतर समोसे, केचप, वेगवेगळे सॉस इ. अतिरिक्त पदार्थांच्या माध्यमातून मीठ अधिक प्रमाण शरीरात जाते.

मिठाचे अतिसेवन

मिठाचे अनेक प्रकार आहेत. आपल्या रोजच्या जेवणात समुद्रापासून मिळणाऱ्या मिठाचा वापर करतो. आपल्याला टीव्ही वर दाखविण्यात येणाऱ्या जाहिरातींमुळे आयोडीनयुक्त मीठ, त्याची गरज या विषयी माहिती असते. किंबहुना आपण त्या आयोडीनच्या शोधात अनेक महागड्या कंपन्यांची उत्पादने विकत घेतो. परंतु त्यामुळे खरोखरच आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो का? याची शहानिशा करणे गरजेचे ठरते. आयोडिनच्या कमतरतेमुळे ‘थायरॉइड गॉयटर’ नावाचा विकार होतो. म्हणूनच या विकाराच्या भीतीपोटी समुद्रातील मिठापासून आयोडीन मिळते, या माहितीच्या अनुषंगाने मिठाचे अति सेवन केले जाते. डॉ. शारदा महांडुळे यांनी नमूद केल्याप्रमाणे मिठाच्या अतिसेवनामुळे “आमांशय व आतड्यातील श्लष्मिक कफाचे नुकसान होऊन दाह निर्मिती होते. तसेच त्वचाविकार, रक्तदाब, सर्वांग सूज, मूत्रविकार, संधिवात, वंध्यत्व हे विकार उद्भवतात. मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास ते आतड्यामधून कॅल्शिअमचे शोषण करण्यास अडथळा आणते. त्याचबरोबर निर्माण झालेले कॅल्शियम शरीरातून बाहेर काढते. यामुळे हाडांची झीज हा विकार जडतो.”

सैंधव मीठ व खडे मीठ

बाजारात मिळणारे महागड्या कंपन्यांचे शुद्ध, बारीक मीठ तयार करण्यासाठी अनेक रसायनांचा वापर केला जातो. ही रसायने शरीरासाठी घातक ठरतात. समुद्रातून मिठाणाऱ्या मिठात नैसर्गिकरित्या आयोडीन असतेच, त्यामुळे एखाद्या विशिष्ट कंपनीने त्यात बाहेरून आयोडीन मिसळायची गरज नाही. नैसर्गिक मिळणाऱ्या मिठातील आयोडीन शरीराला पूरक असते. म्हणूनच डॉ. शारदा महांडुळे या योग्य प्रमाणात ‘खडे मिठाच्या’ वापराचा सल्ला देतात. मीठ हे धातुवर्धक, कृमिनाशक असल्याने अजीर्ण, पोटदुखी व गॅसेस या विकारांवर उपयुक्त आहे. याशिवाय सैंधव मीठ हे त्रिदोषशामक आहे. त्यामुळेच आयुर्वेद सैंधव मिठाच्या वापराचा सल्ला देते.

आणखी वाचा: विश्लेषण: सहाव्यांदा फसलेली प्लास्टिक बंदी; असे नेहमी का होते?

ऊसातील पोषकतत्त्वे संपुष्टात…

मिठाप्रमाणेच साखरदेखील आपल्या रोजच्या आहाराचा अविभाज्य घटक झाली आहे. साखरेच्या सोप्या वापरामुळे पारंपरिक गोडाच्या पद्धती विस्मरणात चालल्या आहेत. साखर ही ऊसाच्या रसापासून तयार करतात. मूळ ऊसाच्या रसाचे अनेक फायदे आहेत. मुळातच ऊसाचा रस हा पचनास हलका असतो. परंतु साखर तयार करण्याच्या प्रक्रियेत या रसावर अनेक रासायनिक प्रक्रिया करण्यात येतात. ऊसाच्या रसात चुना टाकून त्याची मळी वेगळी केली जाते. त्यानंतर तो रस बराच वेळ आटवला जातो. अनेक हानिकारक रसायनांच्या वापरातून तो रस घट्ट केला जातो. त्या प्रक्रियेतूनच आपली रोजच्या वापरातील पांढरी साखर तयार होते. ही साखर तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या रसायनांमुळे (केमिकल्स) ती लवकर खराब होत नाही, परंतु या प्रक्रियेत मूळ ऊसाच्या रसातील पोषक तत्त्वे संपुष्टात आलेली असतात.

साखरेमुळे कुठल्याही प्रकारची पोषकता मिळत नाही. केवळ कॅलरीज मिळतात. म्हणूनच भोवळ, चक्कर आल्यावर साखर-पाणी दिले जाते. कारण साखर रक्तात जलद रीतीने शोषली जाते , त्यामुळे भोवळ येणाऱ्या माणसाला साखरेतील कार्ब्रोहायड्रेट्समुळे लगेच तरतरी येण्यास मदत होते. ही साखरेची उपयुक्तता असली तरी साखर पचनास कठीण असल्यामुळे शरीरातील इन्सुलिन खर्ची होते आणि साखरेच्या अतिसेवनामुळे मधुमेहासाखे रोग बळावतात. अतिसाखरेचे पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणा, उच्चरक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, संधिवात हे आजार निर्माण होतात.

आणखी वाचा: विश्लेषण: चीनच्या कावेबाजपणाला भारतीय मुत्सद्देगिरीचे उत्तर!

गोड पदार्थांव्यतिरिक्त साखर चहातून घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुळातच दुधाच्या चहाचे अतिसेवन हे घातकच, त्याच साखर म्हणजे रोज थोडं थोडं विष घेवून स्वतःसाठीच खड्डा खाणण्याचा प्रकार आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

चहाला भारतीय इतिहासात प्राचीन काळापासून महत्त्वाचे स्थान आहे. परंतु येथे लक्षात घेण्याचा मुद्दा असा की, प्राचीन भारतात चहाच्या पानांपासून तयार केलेला चहा किंवा काढा ग्रहण केला जात असे. आजारी माणसाला आवर्जून हा काढा काही इतर गरम मसाल्यांच्या वापरासोबत देण्यात येत होता, आजही अशा परंपरा सुरु असल्याचे लक्षात येते. परंतु भारतावरील ब्रिटिशांनी सत्ता स्थापन केल्यानंतर ब्रिटिशांनी दूध आणि साखरेचा चहा ‘मॉर्निंग टी अँड इव्हिनिंग टी विथ सम केक्सस्’ सारख्या प्रथांचे चलन जगभरात प्रसिद्ध केले. हे चलन भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. एक कप चहामध्ये साधारण दोन चमचे साखर घेण्याची पद्धत अनेक भारतीयांमध्ये आहे.

डॉ. शारदा महांडुळे सांगतात, “एक अंश साखरेमधून एकशेसोळा उष्मांक (कॅलरीज) मिळतात. एका चहातील दोन चमचे साखर पचायला दोन पोळ्यांसाठी पचायला लागणारी ऊर्जा खर्च होते. म्हणजेच एका दिवसात दोन कप किंवा त्यापेक्षा अधिक चहा घेतल्यास किती ऊर्जा खर्च होते याचे गणित अगदीच सोपे आहे. साखर पचविण्यासाठी स्वादुपिंडाला फार कष्ट करावे लागतात. या कामासाठी स्वादुपिंडातील इन्सुलिन अधिक खर्ची होते. इन्सुलिनची मात्रा एवढी साखर पचविण्यासाठी कमी पडते व त्यातूनच आजाराची लागण होते, त्यामुळेच अतिचहा, अतिसाखरेचे पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणा, अति रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, संधिवात हे आजार निर्माण होतात.”

खारट आणि गोड या आपल्या जगण्यातील महत्त्वाच्या चवी आहेत. पण असे असले तरी त्यांच्या अतिसेवनामुळे मधुमेह किंवा रक्तदाबासारख्या विकारांना बळी पडण्याची वेळ येते म्हणूनच वैद्यकीय आणि आहार क्षेत्रातील तज्ज्ञ मीठ आणि साखर यांना पांढरे विष म्हणतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salt and sugar white poison responsible for diabetes and blood pressure svs
Show comments