जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांची शुक्रवारी ८ जुलै रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील नेत्यांनी याबद्दल शोक व्यक्त केला आहे. मात्र, दरम्यान, शिंझो आबे यांच्या हत्येनंतर भारतात वेगळ्या प्रकारचे राजकारण सुरू झाले आहे. समाजवादी पक्षाने विचित्र विधान करत शिंझो आबे यांच्या हत्येचा संबंध भारत सरकारच्या अग्निपथ योजनेशी जोडला आहे.
अग्निपथ योजनेवर पुनर्विचार करण्याची मागणी
आजतक वृत्त वाहिनीच्या अभिषेक मिश्राच्या वृत्तानुसार, सपाचे प्रवक्ते नितेंद्र सिंह यादव यांनी भारत सरकारला जपानमधील या घटनेपासून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे. नितेंद्र सिंह यादव म्हणाले की, जपानमधील या दुःखद घटनेनंतर भारत सरकारने आपल्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेवर पुनर्विचार करावा.
या घटनेचा संबंध सपाचे प्रवक्ते नितेंद्र सिंह यादव यांनी अग्निपथ योजनेशी जोडली आहे. जपानच्या माजी पंतप्रधानांच्या दुःखद मृत्यूला निवृत्ती वेतन नसलेला लष्करी जवान जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. यातून भारत सरकारने धडा घ्यावा, असेही नितेंद्र सिंह म्हणाले.
हेही वाचा- विश्लेषण : भारताला बुलेट ट्रेनची भेट ते पद्मविभूषण पुरस्कार; शिंझो आबे यांचे भारताशी होते खास नाते
शिंझो आबे यांच्या हत्येवर अग्निपथ योजनेचा उल्लेख का?
मिळालेल्या माहितीनुसार शिंझो आबे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे नाव यामागामी तेत्सुआ असे असून तो ४१ वर्षीय आहे. तो जपान मेरिटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स अर्थात जेएमएसडीएफचा माजी सदस्य आहे. याव्यतिरिक्त त्याने जपानमधील एका स्थानिक विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे. यामागामीने तीन वर्षे जपानी नौदलात काम केल्याचे वृत्त आहे. यामागामी यांनी जपानी सागरी सेल्फ-डिफेन्स फोर्स (JMSDF) मध्ये काम केले होते. NHK या जपानी मीडिया हाऊसनुसार, यामागामी शिंझो आबे यांच्या धोरणांवर असमाधानी होता आणि त्यामुळेच शिंझो यांच्यावर गोळ्या झाडल्या असल्याची कबूली यामागामी याने दिली आहे. त्याने आबे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यातील पहिली गोळी आबे यांच्या छातीवर तर दुसरी गोळी मानेला लागली. याच हल्ल्यानंतर आबे यांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा- Shinzo Abe Death: शिंजो आबे यांची हत्या करणाऱ्याने पोलिसांना सांगितलं कारण; म्हणाला “मी असामाधानी…”
सभेत पाठीत गोळी झाडण्यात आली
६७ वर्षीय शिन्झो आबे यांच्यावर शुक्रवारी ८ जुलै रोजी नारा शहरात एका निवडणूक रॅलीत भाषण करत असताना हल्ला करण्यात आला. जपानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाषणादरम्यान आबे यांच्या पाठीत गोळ्या झाडण्यात आल्या. गोळी लागताच ते खाली कोसळले आणि बेशुद्ध पडले. रक्ताने माखलेल्या शिंझो यांना तातडीने नारा मेडिकल युनिव्हर्सिटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला