Sambhal Violence: सध्या उत्तर प्रदेशातील संभल हे शहर विशेष चर्चेत आहे. १९ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ वकील विष्णू शंकर जैन यांनी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. १५२६ साली मशीद उभारण्यासाठी मंदिर पाडण्यात आले होते , असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. शहराच्या मध्यभागी असणाऱ्या जुन्या कल्की देवाच्या मंदिराचा वापर जामा मशीद कमिटी बेकायदेशीररित्या करत आहे. शिवाय हे स्थळ ‘स्मारक प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम, १९५८ अंतर्गत संरक्षित आहे. तसेच कायद्याच्या कलम १८ अंतर्गत लोकांना संरक्षित स्मारकात प्रवेश करण्याचा अधिकार आहे, असे प्रस्तुत याचिकेत म्हटले आहे. याच याचिकेसंदर्भात दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) आदित्य सिंग यांनी त्याच दिवशी प्रारंभिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते आणि या सर्वेक्षणाचा अहवाल २९ नोव्हेंबर रोजी सादर करण्यास सांगण्यात आले होते. तत्पूर्वीच हिंसाचार उफाळल्यामुळे सर्वेक्षण पूर्ण होऊ शकले नाही. मुख्य वाद हा या स्थळावर मंदिर होतं की, मशीद या संदर्भात सुरु झाल्याने एकूणच संभल या शहराच्या इतिहासासंबंधी चर्चा सुरु झाली आहे. त्याच अनुषंगाने या शहराच्या ऐतिहासिक संदर्भांचा घेतलेला हा आढावा.

संभलचा मध्ययुगीन इतिहास/ Sambhal’s Historical Debate: Temple or Mosque?

संभलविषयीच्या दंतकथा आणि आख्यायिका मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र असे असले तरी या स्थळाचा उल्लेख मुख्यत्त्वे मध्ययुगीन कालखंडापासून वारंवार येतो. पृथ्वीराज चौहान आणि गाझी सय्यद सालार मसूद यांच्यातील दोन ऐतिहासिक लढाया येथे झाल्याचा दावा केला जातो. स्थानिक शासकांच्या अधीन असलेला हा प्रदेश प्रथम कुतुब-उद-दीन ऐबकच्या राजवटीत आणि नंतर फ़िरोज़ शाह तुघलकाच्या कारकिर्दीत १३-१४ व्या शतकात दिल्ली सल्तनतचा भाग झाला.

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक

अधिक वाचा: CM Eknath Shinde:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा देवीच्या दरबारात; काय सांगतो कामाख्या मंदिराचा इतिहास?

या व्यतिरिक्त दस्तऐवजांच्या माध्यमातून सांगण्यात येणारा संभलचा इतिहास हा सुलतान सिकंदर लोदी पासूनच सुरू होतो. लोदीने १५ व्या शतकात १५०० ते १५०४ या चार वर्षांच्या कालावधीत संभलची निवड आपली राजधानी म्हणून केली. बाबरनामा या ग्रंथातील एका पानावर सुलतान इब्राहिम लोदीच्या दरबारात संभालच्या मोहिमेपूर्वी झालेल्या एका पुरस्कार समारंभाचे वर्णन आहे. दिल्लीतल्या राजकीय संघर्षांनी कंटाळलेल्या लोदीने त्याच्या वडिलांचे आवडते शहर सोडले. त्यानंतर १५०५ मध्ये पुन्हा एकदा आग्र्याची स्थापना करून आपली राजधानी तेथे हलवली. मात्र, या चार वर्षांत संभलने इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याची छाप पुढील काही शतकांपर्यंत कायम राहिली. दिल्ली सल्तनतीच्या पतनानंतर हे शहर बाबरच्या नेतृत्वाखाली मुघलांच्या ताब्यात आले. त्यानंतर हुमायून आणि अकबर यांच्या कारकिर्दीत हे शहर महत्त्वाचे होते. मात्र, अकबरचा नातू शाहजहान शहराचा कारभार सांभाळू लागल्यानंतर स्थानिक राजधानी मोरादाबाद येथे हलवण्यात आली.

A folio from the Baburnama: An awards ceremony in Sultan Ibrāhīm Lodi's court before an expedition to Sambhal in the early 16th century.
बाबरनामा: सुलतान इब्राहिम लोदीच्या दरबारात सोळाव्या शतकाच्या
सुरुवातीला संभलच्या मोहिमेपूर्वीचा एक पुरस्कार सोहळा.

वैदिक काळापासूनचे महत्त्व/ Sambhal in Vedic and Medieval Times

अभ्यासकांनी या स्थळाचे महत्त्व वैदिक काळापासून असल्याचे म्हटले आहे. घनदाट जंगलांनी व्यापलेला हा भाग वैदिक काळात प्राचीन राजकीय व्यवस्थेचा भाग असावा , असे मानले जाते. तो इसवी सनपूर्व पाचव्या शतकात पांचाल राज्याचा भाग होता असेही मत अभ्यासक व्यक्त करतात. परंतु या परिसरात साम्राज्य आणि राज्यांचे पुरावे अद्याप सापडलेले नाहीत. यानंतर ते सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा एक भाग होते. परंतु दिल्लीच्या जवळ असलेल्या आणि रणनीतिच्या दृष्टीने महत्त्वाच्या या प्रदेशाने गेल्या दोन हजार वर्षांत वनोत्पादनाचा महत्त्वाचा स्त्रोत म्हणून स्थान टिकवले आहे. आजही हा प्रदेश उसाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे आणि मेंथॉलच्या उत्पादनासाठी जगभर ओळखला जातो.

प्राचीन शिलालेखांचा संदर्भ/ Archaeological Evidence and Inscriptions

१९९३ साली शेजारील मुरादाबाद येथे एका भंगाराच्या दुकानात सापडलेल्या ताम्रपटावरून ९ व्या शतकात प्रतिहार राजा नागभट्ट द्वितीय यांनी ब्राह्मणांना दान करताना संभलला ‘संभुलिका’ असे संबोधले होते असे समजते. प्रचलित दंतकथांनुसार या शहराची स्थापना तोमर राजवंशाने ७ व्या शतकात केली होती, त्यानंतर तोमर आणि चौहान नायक पृथ्वीराज यांच्यात अनेक युद्धे झाली. १९११ च्या ब्रिटिश गॅझेटियरमध्ये म्हटले आहे की, “संभलमध्ये हिंदू वस्तीच्या अनेक खुणा आढळतात. राजा जगतसिंह यांना शहराचा संस्थापक मानले जाते. त्यांनी तीर्थयात्रेकरूंकरिता पवित्र स्थळं आणि १९ विहिरी बांधल्या, ज्यांचा आजही उल्लेख केला जातो. हिंदू परंपरेनुसार पृथ्वीराज चौहान यांच्या काळात त्यांची कन्या बेला तिचा पती परमारच्या मृत्यूनंतर सती गेली होती.”

घनदाट जंगलातील प्रारंभिक वसाहत

बी. एम. संखडेर आपल्या ‘Sambhal: A Historical Survey’ मध्ये लिहितात, “प्रारंभिक काळात संभल सर्व बाजूंनी घनदाट जंगलांनी वेढलेले होते. येथे मुख्यतः अहीर, गोंड, भिल्ल आणि भिहार या आदिवासी जमातींचे वास्तव्य होते. ११ व्या शतकाच्या सुरुवातीस विविध राजपूत जमातींनी मोठ्या प्रमाणावर वसाहती केल्या, ज्यामुळे या प्रदेशात दीर्घकाळ सलग वस्ती झाली.”

Entrance gate of Shahi Jama Masjid
शाही जामा मशिदीचे प्रवेशद्वार (विकिपीडिया)

सिकंदर लोदीच्या काळातील संभल

सिकंदर लोदीच्या राजवटीत संभल राजधानी असताना ब्राह्मण आणि इस्लामी विद्वानांमध्ये एका बौद्धिक वादाची आख्यायिका सांगितली जाते. या वादाचे परिणाम हिंसक होते, शेवटी ब्राह्मणाला फाशी देण्यात आली होती. त्यामुळे कट्टरतावादी सुलतानाचा विरोध झाला.

अफगाण गटातील संघर्ष आणि त्याचा प्रभाव

सिकंदर लोदीच्या काळात अफगाण गटातील संघर्ष तीव्र होते. सिकंदरला चोगुन (आधुनिक पोलो) हा खेळ आवडत होत आणि संभलमध्ये अनेकदा अफगाण सरदारांसोबत हा खेळ खेळला जात असे. मात्र, एकदा खेळात झालेल्या वादाने रक्तरंजित संघर्षाचे रूप घेतले. हा वाद इतका गंभीर होता की, यामुळे पठाण गटांमध्ये फूट पडली, ज्याचा फायदा घेऊन बाबरने आपले साम्राज्य स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले.

Shahi Jama Masjid, Sambhal
शाही जामा मशीद, संभल (विकिपीडिया)

बाबराने संभल येथील मंदिर नष्ट केले का? Historical Context of Babur’s Rule in Sambhal

बाबराने संभल येथे मंदिर नष्ट केले का, हा प्रश्न वादग्रस्त आहे. अयोध्येतील बाबरी मशीद प्रकरणासारखाच एक वाद संभलमध्येही दिसतो. ब्रिटिश पुरातत्त्वीय सर्वेक्षण अहवाल आणि गॅझेटियरमध्ये या मशिदीविषयी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही दृष्टीकोन नमूद केले आहेत. १८७९ च्या ASI अहवालात संभलच्या जामा मशिदीचा उल्लेख आहे. “संभलमधील मुख्य वास्तू जामा मशीद आहे, ज्याविषयी हिंदूंचा दावा आहे की, तिथे हरि मंदिर होते. तर मुस्लिमांचा असा दावा आहे की, ती वास्तू सम्राट बाबरच्या काळात मशीद म्हणून बांधली गेली, परंतु त्यातील काही शिलालेख हिंदूंच्या मते कालबाह्य आणि खोटे आहेत.” संभल या स्थळाचा उल्लेख स्कंद पुराणात असल्याचे सांगितले जाते. हे हिंदूंचे विष्णू मंदिर असल्याचा उल्लेख या पुराणात केल्याचा दावा करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणची मशीद बाबरने बांधल्याचा दावा केला जातो. परंतु तसे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. बाबर नंतर होऊन गेलेल्या अबुल फझलने येथे हरी मंडळ हे हिंदू मंदिर असल्याचा दाखला दिला आहे. तो मशिदीचा उल्लेख करत नाही. १८७१ साली कॅम्पबेल कार्लाइल (Campbell Carlyle) या पुरातत्त्व अभ्यासकाने या ठिकाणी सर्वेक्षण केले होते. त्याच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे १८५० पर्यंत मुस्लिम समाजाकडे या जागेचा ताबा नव्हता. तर या मशिदीच्या आत बाबरच्या नावाने सापडणारा शिलालेख नंतरच्या कालखंडात कोरण्यात आलेला आहे.

ब्रिटिश काळातील नोंदी/ British Gazetteer Records on Sambhal Mosque

तर काही असा दावा करतात की संभलमधील मशीद बाबरच्या आधीची असावी असे दिसते, कारण तिच्या वास्तुशैलीत पट्टणी इमारतींसारखा साधेपणा आणि भव्यता आहे. १९११ च्या मुरादाबाद जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये जामी मशीदीविषयी पुढील नोंद आहे: “कमी कालावधीसाठी कारकिर्दीच्या सुरुवातीस, सम्राट स्वतः या ठिकाणी आला असावा आणि ज्या भव्य मशीदीवर हिंदू बेगने बांधकाम केल्याचा दावा केला आहे, तिथे त्याने एक शिलालेख लावला असावा. मात्र, ही कल्पना जवळजवळ अशक्य आहे की, बाबरने विष्णूचे मंदिर पाडून तेथे मशीद बांधली, कारण पूर्वीचे मंदिर मुस्लिम राजवटीच्या अनेक शतकांत इतक्या प्रमुख ठिकाणी तग धरून राहिले असेल, असे मानणे कठीण आहे. शिवाय, कट्टर मूर्ती पूजा-विरोधक असलेल्या सिकंदर लोदीने त्याच्या तात्पुरत्या राजधानीत एखादे हिंदू मंदिर इतक्या उंच ठिकाणी राहू दिले असते, हेही शक्य नाही.”


More details
The 25 Kings of Shambhala. Central figure is a yidam, a meditation deity in Tantric Buddhism. The middle figure in the top row represents the Tibetan Buddhist yogi and philosopher Je Tsongkhapa.
शंभलचे २५ राजे. मध्यवर्ती आकृती यिदम, तांत्रिक बौद्ध धर्मातील एक ध्यान देवता.
वरच्या रांगेतील मधली आकृती तिबेटी बौद्ध योगी आणि तत्त्वज्ञ जे त्सोंगखापा यांचे प्रतिनिधित्व करते.

बौद्ध ग्रंथातील संदर्भ

संभलचे ऐतिहासिक महत्त्व भारताच्या सीमांपलीकडे विस्तारले आहे. महायान आणि वज्रयान बौद्ध ग्रंथांमध्ये, विशेषतः ‘कालचक्र तंत्र’ ग्रंथांमध्ये या शहराचा उल्लेख आढळतो. या ग्रंथांमध्ये कल्कि अवताराच्या आगमनाचे भाकीत केले गेले आहे, जो शंभल या काल्पनिक भूमीतून (संभल हे तेच शंभल आहे असे तज्ज्ञ मानतात) प्रकट होईल. संभलला इतके महत्त्वाचे मानले गेले होते की, १४ व्या शतकात चीनच्या सम्राटाने दिल्ली सल्तनतकडे एक राजदूत पाठवून मुहम्मद बिन तुघलकाने उद्ध्वस्त केलेले मंदिर पुन्हा बांधण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, तुघलकाने मुसलमान धर्मीय कर्तव्यांचे कारण देत ही विनंती फेटाळली आणि त्याऐवजी चिनी सम्राटाकडे ‘जिझिया’ कर भरण्याची मागणी केली.

अधिक वाचा: 2,100-Year-Old Temple: इजिप्तमध्ये सापडला गुप्त मंदिराचा दरवाजा; २१०० वर्षं जुन्या मंदिराचं रहस्य उघड! 

संदर्भ: Book References

Satish Chandra, A History of Medieval India (New Delhi: Orient BlackSwan, 2007).
B.M. Sankhder, Sambhal: A Historical Survey (Lucknow: Awadh Publishers, 1985).
District Gazetteer of Moradabad (Allahabad: Government Press, 1911).
Archaeological Survey of India (ASI), Annual Reports on Indian Epigraphy, ed. Campbell Carlyle (Calcutta: Superintendent of Government Printing, 1871).
The Kalachakra Tantra: Translated Texts with Commentary (Oxford: Oxford University Press, 2004).