अनिश पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले भारतीय महसूल सेवेतील(आयआरएस) अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात आता त्याच प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने याप्रकरणी पैशांच्या व्यवहाराचे आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही हे प्रकरणात वानखेडे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले. त्यानंतर याप्रकरणी अंमलीपदार्थ नियंत्रण विभाग(एनसीबी) विशेष दक्षता पथकाची स्थापना केली. त्या समितीच्या अहवालावरून याप्रकरणी सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण नेमके काय आहे? ते जाणून घेऊया.

आर्यन खान प्रकरण काय आहे?

अंमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने(एनसीबी) २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर छापा टाकला होता. त्यावेळी आर्यनला अटक करण्यात आली होती. अंमली पदार्थांचे सेवन करण्याचा प्रयत्न करणे, ते बाळगणे, बागळण्यासाठी प्रवृत्त करणे आणि अमलीपदार्थ प्रतिबंध कायद्याअंतर्गत कट रचल्याच्या आरोपाअंतर्गत एनसीबीने आर्यनला अटक केली होती. प्रकरणातील आरोपींकडून १३ ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम मेफेड्रोन एमडी, २१ ग्रॅम चरस आणि एमडीएमए एक्स्टसीच्या २२ गोळ्या जप्त केल्याचा दावाही एनसीबीने केला होता. आर्यनला २६ दिवस अटकेत राहिल्यानंतर उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. पुढे पुरेसे पुरावे नसल्याचे सांगत क्रुझवरील अमलीपदार्थ पार्टी प्रकरणी आर्यन खानसह सहाजणांवरील आरोप मागे घेण्यात आले.

विश्लेषण : उत्तर प्रदेशात योगी पुन्हा उपयोगी, भाजपचे सत्तेचे तिहेरी इंजिन

दिल्ली एनसीबीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मुंबईतील विशेष न्यायालयात या प्रकरणी सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यात एसआयटीने २० पैकी १४ आरोपींवर दोषारोप ठेवले आहेत, तर आर्यनसह सहाजणांवर पुराव्याअभावी कारवाई केली जात नसल्याचे नमूद केले आहे. आर्यनसह या प्रकरणी अवीन शाहू, गोपाल जी. आनंद, समीर सैघन, भास्कर अरोरा आणि मानव सिंघा यांच्यावरील आरोप एनसीबीने मागे घेतले आहेत. एसआयटीने वस्तुनिष्ठ पद्धतीने तपास केला. केवळ साशंकतेच्या पलीकडे ठोस पुरावे मिळवण्याच्या तत्त्वाचा वापर या प्रकरणाचा तपास करताना केला गेला. क्रुझवर छापा टाकण्यात आला तेव्हा आर्यन आणि अन्य काहीजण वगळता उर्वरित आरोपींकडे अमलीपदार्थ सापडल्याचेही एनसीबीने म्हटले होते.

आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने नेमके काय आरोप केले होते?

आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील ८ कोटी रुपये एसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप एनसीबीचे याप्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी त्यावेळी केला होता. साईलने प्रतिज्ञापत्राद्वारे अनेक धक्कादायक खुलासे केले होते. प्रभाकर यांच्या दाव्यानुसार, याप्रकणातील दुसरे पंच के. पी. गोसावी आणि सॅम डिसूझाचे आपण दूरध्वनीवरील संभाषण ऐकले होते. ‘२५ कोटींचा बॉम्ब टाका. १८ कोटीपर्यंत व्यवहार अंतिम करू. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ,’ असे या दोघांमध्ये संभाषण झाल्याचा प्रभाकर यांचा दावा केला होता. आपण के. पी. गोसावी यांचा सुरक्षा रक्षक असल्याचा दावाही प्रभाकर यांनी केला होता. त्यांच्या आरोपानुसार, क्रुझवर छापेमारी झाल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि के. पी. गोसावी, तसेच सॅमला निळ्या रंगाच्या मर्सिडीजमध्ये पाहिले होते. या तिघांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली होती, असा दावाही साईल यांनी केला होता. या आरोपानंतर एनसीबीने दक्षता विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. एप्रिल, २०२२ मध्ये पंच साईल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणात काय आरोप केले होते ?

आर्यन खान प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन हे प्रकरण बनावट असल्याचा आरोप केला होता. मलिक यांनी वानखेडे यांच्यावर विविध प्रकारचे आरोप केले आहेत. त्यानंतर प्रभाकर साईल या स्वतंत्र साक्षीदारानेही वानखेडे यांच्यावर खंडणीचे आरोप केले. त्यामुळे या प्रकरणाची दखल दिल्लीनेही घेतली. आर्यन खान प्रकणाचा तपास तत्कालीन मुंबई एनसीबी अधिकाऱ्यांकडून काढून घेऊन दिल्लीतील एनसीबीच्या विशेष तपास पथकाला सुपूर्त करण्यात आला. आर्यन खान प्रकरणासह समीर खान प्रकरण, अरमान कोहली प्रकरण, मुंब्रा एमडी प्रकरण, जोगेश्वरी चरस प्रकरण, डोंगरी एमडी प्रकरण तपासासाठी या एसआयटीकडे वर्ग केली. देश आणि विदेशात या गुन्ह्यांची व्याप्ती असल्याने हे सहा गुन्हे विशेष पथकाकडे देण्यात आल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. त्यावेळी एनसीबीचे उपमहासंचालक संजयकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने या प्रकरणाचा तपास केला.

विश्लेषण : परमबीर यांचे निलंबन मागे घेण्यामागे काय दडलंय? राजकीय संघर्षात अधिकाऱ्यांचाही वापर?

एनसीबीच्या दक्षता समितीने नेमके अहवालात काय म्हटले होते?

तत्कालीन मुंबई एनसीबी अधिकाऱ्यावर आर्यन खान प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर एनसीबीने याप्रकरणी विशेष दक्षता पथकाची स्थापना केली होती. वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील तपासात त्रुटी असल्याचा दावा एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष दक्षता पथकाने केला होता. उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी एनसीबीच्या आधिकाऱ्यांविरोधात झालेल्या आरोपांबाबत दक्षता चौकशी केली होती. या दक्षता अहवालात एनसीबीच्या तत्कालिन सात ते आठ अधिकाऱ्यांवर विभागीय व दक्षता पातळीवर काही चुका झाल्याचे नमुद केले होते. तसेच त्यांच्यावर कारवाईच्या सूचनाही केल्या होत्या. याच अहवालाच्या आधारावर सीबीआयने वानखेडे व इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आर्यन खानला न अडकवण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तसेच याप्रकरणी आरोपी व त्यांच्या साथीदारांनी ५० लाख रुपये आगाऊ स्वीकारल्याचा सीबीआयच्या गुन्ह्यांत करण्यात आला आहे.

सीबीआयने नेमकी काय कारवाई केली?

भारतीय महसूल सेवा (आयआरएस) अधिकारी समीर वानखेडे आणि अन्य चौघांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्या अटकेच्या वेळी २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एनसीबीचे तत्कालिन विभागीय संचालक समीर वानखेडे, एनसीबीचे तत्कालिन अधिक्षक विश्व विजय सिंह, तत्कालिन गुप्तवार्ता अधिकारी आशिष रंजन यांच्यासह खासगी व्यक्ती के. पी. गोसावी, सॅन्विल डिसोझा व इतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एनसीबीच्या चौकशीच्या आधारावर याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा व भादंवि कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई, दिल्ली, रांची, लखनौ, चेन्नई, गुवाहाटी आणि कानपूरमध्ये २९ ठिकाणी सीबीआयने शोध मोहीम राबविली. त्यात महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer wankhede career ncb officer acb raid nawab malik case print exp pmw
Show comments