समोसा हा भारतातील लोकप्रिय पदार्थ आणि त्यामुळेच भारतीय वंशाच्या प्रतिनिधींच्या गटाला ‘समोसा कॉकस’ असे संबोधले जाते. भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांच्या सेनेट किंवा हाऊसमध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या गटाचा उल्लेख ‘समोसा कॉकस’ असा केला जातो. मंगळवारच्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर कनिष्ठ सभागृहात सात सदस्यांची संख्या वाढली असल्याने पुन्हा एकदा समोसा कॉकसची चर्चा आहे. ‘समोसा कॉकस’ शब्द आला कुठून? अमेरिकेच्या निवडणुकीत याला किती महत्त्व आहे? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
‘समोसा कॉकस’ म्हणजे काय?
समोसा कॉकस हा शब्द किमान २०१८ पासून वापरला जात आहे. इलिनॉय जिल्ह्याचे राजा कृष्णमूर्ती यांनी अमेरिकेच्या राजकरणात भारतीय-अमेरिकन नागरिकांच्या वाढत्या प्रभावाबद्दल या शब्दाचा उल्लेख केला होता. त्या वर्षी ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात असे नमूद करण्यात आले होते की, कॉकस हा शब्द समोशाला जोडला गेला आहे. त्याचा अर्थ सेनेट किंवा हाऊसमध्ये निवडून आलेल्या समविचारी किंवा समान वंश, वर्ण इत्यादी असलेल्या प्रतिनिधींचा गट असा होतो.
हेही वाचा : ट्रम्प यांच्या विजयाने भारतीय स्थलांतरित चिंतित का आहेत?
समोसा कॉकसमध्ये कोणाकोणाचा समावेश?
सुहास सुब्रमण्यम
सुहास सुब्रमण्यम यांनी व्हर्जिनिया आणि ईस्ट कोस्टमधून हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये निवडून आलेले पहिले भारतीय-अमेरिकन म्हणून इतिहास घडवला. ते व्हर्जिनिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. ते सध्या व्हर्जिनियाच्या ३२ व्या जिल्ह्याचे सिनेटर आहेत. त्यांनी यापूर्वी व्हर्जिनिया राज्य विधानसभेत प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. या विजयामुळे ते पहिले दक्षिण आशियाई आणि या प्रदेशातून निवडून आलेले पहिले हिंदू ठरले आहेत. सुहास सुब्रमण्यम यांचे पालक बंगळुरू येथील आहेत. ते भारतीय-अमेरिकन वकील आहेत. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी यापूर्वी बराक ओबामा यांचे व्हाईट हाऊस सल्लागार म्हणून काम केले आहे. त्या वेळी त्यांनी तंत्रज्ञान धोरणावरील टास्क फोर्सचे नेतृत्व केले; ज्याने रोजगार निर्मिती आणि नवीन तंत्रज्ञानाचे नियमन केले. ते त्यांची पत्नी मिरांडा आणि दोन मुलांबरोबर व्हर्जिनियातील ॲशबर्न येथे राहतात.
अमी बेरा
अमी बेरा हे २०१३ पासून कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि मंगळवारच्या निवडणुकीत ते सलग सातव्यांदा पुन्हा निवडून आले. ते काँग्रेसमधील (अमेरिकेतील संसद) सर्वात ज्येष्ठ भारतीय अमेरिकन आहेत. बेरा हे फिजिशियन आहेत आणि कॅलिफोर्निया-इर्विन विद्यापीठातून एमडी आहेत. त्यांनी अमेरिकेतील आरोग्य सेवा प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. बेरा हाऊस फॉरेन अफेअर्स कमिटीमध्येदेखील काम करतात, जिथे ते अमेरिका-भारत संबंध मजबूत करण्यावर आणि जागतिक आरोग्य उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करतात. बेराचे आई-वडील मूळचे गुजरातमधील राजकोटचे आहेत. त्यांनी यापूर्वी सॅक्रामेंटो काउंटीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. ते कॅलिफोर्नियातील एल्क ग्रोव्ह येथे त्यांची पत्नी जेनिन आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलाबरोबर राहतात.
श्री ठाणेदार
श्री ठाणेदार २०२३ पासून मिशिगनचे नेतृत्व करत आहेत. आता ते पुन्हा एकद निवडून आले आहेत. त्यांनी २०२१-२३ मध्ये मिशिगनच्या विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. ठाणेदार कर्नाटकातील बेळगावी येथील अल्प उत्पन्न असलेल्या ब्राह्मण कुटुंबात जन्मले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. ते १९७९ मध्ये वयाच्या २४ व्या वर्षी अक्रोन विद्यापीठातून पीएचडी करण्यासाठी अमेरिकेत आले आणि तीन वर्षांनी पदवीधर झाले. त्यांनी एमबीएही केले आहे. त्यानंतर त्यांनी रासायनिक आणि औषध उद्योगात अनेक कंपन्या स्थापन करून एक व्यापारी आणि उद्योजक म्हणून यशस्वी कारकीर्द घडवली. २०१६ मध्ये त्यांनी त्यांचा मुख्य व्यवसाय, ‘Avomeen Analytical Services’ २० दशलक्ष डॉलर्समध्ये विकला. एका राजकीय विश्लेषणात ठाणेदार यांची ट्रम्प यांच्याशी तुलना केली आहे.
प्रमिला जयपाल
प्रमिला जयपाल वॉशिंग्टनचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुन्हा निवडून आल्या. त्या पुरोगामी धोरणे आणि इमिग्रेशन सुधारणांसाठी एक मुखर वकील आहेत. फेडरल स्तरावर वॉशिंग्टनचे प्रतिनिधित्व करणार्या त्या पहिल्या दक्षिण आशियाई आहेत. भारतातील चेन्नईस्थित मल्याळी कुटुंबात जन्मलेल्या जयपाल, २०१७ मध्ये यू.एस. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये निवडून आलेल्या पहिल्या दक्षिण आशियाई अमेरिकन महिला ठरल्या. काँग्रेसमध्ये निवडून येण्यापूर्वी, जयपाल यांनी २०१५ ते २०१७ या काळात वॉशिंग्टन स्टेट सिनेटर म्हणून काम केले. मेडिकेअर फॉर ऑल, इमिग्रेशन सुधारणा आणि हवामान बदल यांसारख्या मुद्द्यांवर त्यांच्या भूमिकेसाठी ओळखल्या जातात.
जयपाल सध्या काँग्रेसच्या प्रोग्रेसिव्ह कॉकसच्या अध्यक्षा म्हणून काम करत आहेत, हे पद त्यांनी २०२१ पासून सांभाळले आहे. त्यांच्या कार्यालयाने गेल्या वर्षी जातीय भेदभावावरील काँग्रेसच्या वागणुकीचाही उल्लेख केला. जयपाल यांनी जॉर्जटाउन विद्यापीठातून बीए आणि नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या केलॉग स्कूलमधून एमबीए केले आहे. जयपाल यांनी स्टीव्हन विल्यमसनशी लग्न केले आहे. त्या गर्भपाताच्या अधिकारांसाठी वकिली करतात.
रो खन्ना
रो खन्ना कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुन्हा निवडून आले. त्यांचा जन्म पंजाबमधील एका कुटुंबात झाला. त्यांचे पालक फिलाडेल्फियामध्ये १९७० च्या दशकात अमेरिकेत स्थलांतरित झाले. खन्ना हे काँग्रेसमध्ये तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे जोरदार समर्थक आहेत. ते हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी आणि हाऊस ॲग्रिकल्चर कमिटीवर काम करतात आणि ग्रामीण अमेरिकेत टेक नोकऱ्या आणण्यावर आणि शाश्वत कृषी पद्धतींना चालना देण्यावर लक्ष केंद्रित करतात. येल लॉमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी शिकागो विद्यापीठातून सर्वोच्च सन्मानांसह पदवी प्राप्त केली. २००४ आणि २०१४ मध्ये दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर खन्ना यांची पहिल्यांदा २०१६ मध्ये सेनेटमध्ये निवड झाली. खन्ना यांना एक प्रगतिशील भांडवलदार म्हणून ओळखतात आणि ते ग्राहकांना अमेरिकन वस्तू खरेदी करा, असे आवाहनही करतात.
राजा कृष्णमूर्ती
राजा कृष्णमूर्ती यांची इलिनॉयचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुन्हा निवड करण्यात आली, त्यांनी २०१७ पासून हे पद भूषवले आहे. शिक्षण आणि कार्यबल विकासावरील त्यांच्या कार्यासाठी ओळखले जाणारे कृष्णमूर्ती हे हाऊस इंटेलिजन्स कमिटी आणि हाऊस ओव्हरसाइट कमिटीवर काम करतात. ते चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या हाऊस सिलेक्ट कमिटीचे रँकिंग डेमोक्रॅटिक सदस्यदेखील आहेत. १९७३ मध्ये त्यांचा नवी दिल्ली येथे जन्म झाला आणि त्यानंतर ते आपल्या कुटुंबासह इलिनॉय येथील पिओरिया येथे आले. कृष्णमूर्ती यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे आणि ते हार्वर्ड लॉ ग्रॅज्युएट आहेत. कृष्णमूर्ती यांनी यापूर्वी राज्य उपकोषाध्यक्ष म्हणून काम केले आहे. ते त्यांची पत्नी प्रिया आणि त्यांच्या तीन मुलांसह इलिनॉयमधील शॉम्बर्ग येथे राहतात.
हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प भारतावर कर लादणार का? याचा उद्योग क्षेत्रावर काय परिणाम होईल?
अमिश शाह
अमिश शाह एक फिजिशियन आणि हेल्थकेअर ॲडव्होकेट आहेत. ते यापूर्वी २०१८, २०२० आणि २०२२ मध्ये ॲरिझोनाच्या राज्य विधानसभेत निवडून आले आहेत. शाह यांचा जन्म शिकागो येथे झाला. त्यांचे पालक भारतीय आहेत. त्यांनी नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ आर्ट्स कम लॉड आणि डॉक्टर ऑफ मेडिसिनची पदवी प्राप्त केली आहे. तसेच त्यांनी कॅलिफोर्निया-बर्कले विद्यापीठातून मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी यापूर्वी न्यूयॉर्क जेट्स फुटबॉल संघासाठी टीम फिजिशियन म्हणून काम केले आहे.