बुलढाणा येथे झालेल्या सभेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. नरेंद्र मोदींचा जन्म गुजरातच्या ज्या गावात झाला, त्या गावाजवळच औरंगजेबाचा जन्म झाला होता. याच कारणामुळे मोदी हे औरंगजेबासारखा विचार करतात, असे ते म्हणाले होते. विरोधकांच्या या टीकेवर पंतप्रधान मोदींनीही प्रत्युत्तर दिले. आमच्या विरोधकांनी माझ्याविषयी आतापर्यंत १०४ दूषणं वापरली आहेत. त्यांनी मला औरंगजेब केलं गेलं. मोदींचा शिरच्छेद करा, अशी घोषणा केली गेली आहे. अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी सुरू आहेत, असे ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, राजकारणाचा भाग बाजूला ठेवला, तर नेमकं तथ्य काय आहे? औरंगजेबाचा जन्म खरंच गुजरातमध्ये झाला होता का? आणि याबाबत इतिहासकारांचं म्हणणं काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

हेही वाचा – मनसेचे इंजिन आणखी उजवीकडे? भाजपशी आघाडीतून परस्परांना काय फायदा?

औरंगजेबाचा जन्म नेमका कुठे झाला?

औरंगजेबाचा जन्म ३ नोव्हेंबर १६१८ मध्ये दोहाद (काही ठिकाणी दाहोद असाही उल्लेख आढळतो) येथे झाला होता. दोहाद हे ठिकाण सध्या गुजरातमध्ये आहे. औरंगजेब हा मुघल राजकुमार खुर्रम याचा तिसरा मुलगा होता. त्याला दारा शुकोह व शाह शुजा असे दोन मोठे भाऊ होते. राजकुमार खुर्रमला एकूण सहा अपत्ये होती. राजकुमार खुर्रमलाच पुढे मुघल सम्राट शहाजहाँ या नावाने ओळखले जाऊ लागले.

१६१८ च्या सुरुवातील मुघल सम्राट जहांगीरने राजकुमार खुर्रमला गुजरातचा सुभेदार म्हणून नियुक्त केले. त्यामुळे औरंजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला आणि त्याचे बालपणही गुजरातमध्ये गेले. तो वयाच्या जवळपास आठव्या वर्षापर्यंत गुजरातमध्ये होता. पुढे १६२२ मध्ये राजकुमार खुर्रमने जहांगीरविरोधात बंड पुकारले; मात्र ते अपयशी ठरले.

इतिहासकारांच्या मते, खुर्रमने बंड पुकारल्यानंतर जहांगीरने औरंगजेब आणि दारा शुकोह यांना बंदी बनवले होते. त्यामुळे खुर्रमने त्याचे बंड मागे घेतले. त्यानंतर त्याने औरंगजेब आणि दारा शुकोह यांना बंदी म्हणून लाहोर येथील जहांगीरच्या कोर्टात पाठविले, असा उल्लेख इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांच्या अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ औरंगजेब (१९३०) या पुस्तकात आढळतो. अन्य इतिहासकारांच्या मते १६२५ मध्ये खुर्रम आणि औरंगजेब यांची पुन्हा भेट झाली.

हेही वाचा – राजकीय नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी गुप्तहेरांची नेमणूक; नेमकं प्रकरण काय?

मुघल साम्राज्यादरम्यानचे गुजरात

मुघल सम्राट अकबरने १५७३ मध्ये गुजरातचा सुलतान मुझफ्फर शाह तिसरा याचा पराभव करीत गुजरातवर ताबा मिळविला. त्यानंतर सुभेदारांची नियुक्ती करीत मुघलांनी गुजरातच्या भागावर शासन केले. मुघल साम्राज्यांच्या काळात गुजरात हा अतिशय महत्त्वाचा प्रांत होता. त्याच गुजरातमधील सुरत येथे १६१२ मध्ये ब्रिटिशांनी आपली पहिली औद्योगिक वसाहत स्थापन केली. त्यासाठी त्यांना मुघल बादशहा जहांगीरने परवानगी दिली. त्यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी अनेक कारखाने उभे केले.

१६५७ ते १७०७ या काळात औरंगजेब मुघल बादशहा होता. मात्र, याचदरम्यान शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वाऱ्या केल्याने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणता राजकीय अस्थिरता बघायला मिळाली. जवळपास १७५९ पर्यंत गुजरातवर मुघलांचे राज्य होते. त्यानंतर गुजरात ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut claimed aurangzeb was born in gujarat what historian says spb