छत्तीसगडमधील ‘सतनामी’ समाज आक्रमक झाला आहे. गिरौदपुरी धाममधील अमरगुफतील एका मंदिराची विटंबना झाल्यामुळे हा समाज संतप्त झाला आहे. हे स्थळ पवित्र असल्याची सतनामी समाजाची भावना आहे. समाजातील काही लोकांनी सोमवारी (१० जून) छत्तीसगडमधील बलौदा बाजार जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयाला आग लावली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर दगडफेकही केली आहे. या साऱ्या धुमश्चक्रीमध्ये शेकडो वाहने जळून खाक झाली आहेत. प्रामुख्याने अनुसूचित जाती प्रवर्गात मोडणारे सतनामी समाजाचे वा पंथाचे लोक छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाच्या सीमाभागात राहतात. अमरगुफेतील जैतखाम नावाच्या एका मंदिराची विटंबना झाली असल्याची त्यांची तक्रार आहे. सतनामी समाजासाठी पवित्र असलेले हे मंदिर गिरौद गावापासून पाच किमी अंतरावर आहे.

पंजाबमधील नारनौलमध्ये सतनामी पंथाची सुरुवात

या पंथाचे गुरु घसीदास यांचा जन्म १७५६ मध्ये झाला होता. मात्र, या पंथाचा इतिहास त्या आधीपासूनच सुरू होतो. ‘सतनाम’ या शब्दाचा अर्थच ‘सत्य नाम’ असा आहे. १५ व्या शतकातील भक्तकवी कबीर यांच्यामुळे या पंथाला अधिक प्रसिद्धी मिळाली. कबीर यांनी प्रस्थापित धर्मातील मूर्ती पूजा आणि कर्मकांडाला फाटा देऊन नव्या भक्तीची संकल्पना लोकांपुढे मांडली. त्यांनी ‘सगुण’ (मूर्ती पूजा करणारे) भक्तीऐवजी ‘निर्गुण’ (मूर्ती पूजा न करणारे) भक्तीला अधिक महत्त्व दिले. थोडक्यात, ईश्वर हा निर्गुण, निराकार आहे, तो दगडात मावू शकत नाही; त्यामुळे चराचरात ईश्वर आहे, अशी त्यांची शिकवण होती. कबीरांनी आपल्या अनेक दोह्यांमधून आणि रचनांमधून सतनाम म्हणजेच ईश्वराच्या सत्य नामाचा उल्लेख केला आहे. १६५७ मध्ये बिरभन नावाचे एक साधू कबीरांच्या या शिकवणुकीमुळे फार प्रभावित झाले आणि त्यांनी सध्याच्या हरियाणामधील नारनौलमध्ये सतनामी पंथाची स्थापना केली. मुघल दरबारातील इतिहासकार खाफी खान (१६६४-१७३२) यांनी सतनामींबद्दल लिहून ठेवले आहे की, “सतनामी पंथीयांची जवळपास चार ते पाच हजार घरे नारनौल आणि मेवात भागामध्ये आहेत. पोटापाण्यासाठी ते प्रामुख्याने शेती आणि अल्प व्यापारावर अवलंबून आहेत.” (संदर्भ : इरफान हबीब : द ॲग्रॅरियन सिस्टीम ऑफ मुघल इंडिया, १५५६-१७०७)

Mehkars Circuit youth detained for providing false information about emergency alert system
‘मंदिरावर हल्ला झाला’! ‘त्या’ क्रमांकावर संदेश आल्याने पोलिसांची धावपळ, प्रत्यक्षात…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
massajog sarpanch killed marathi news
मस्साजोगच्या सरपंचाचा अपहरणानंतर मृतदेह आढळल्याने केजमध्ये तणाव; ग्रामस्थ आक्रमक, रुग्णालय परिसरात जमाव
mla mahesh landge claim bangladeshi and rohingyas working in scrap warehouses
पिंपरी- चिंचवड: अनधिकृत भंगार गोदामात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे; आमदार महेश लांडगे
Two youths from Motala taluk along with international Attal gang robbed National Bank in Telangana state
तेलंगणा बँक दरोड्याचे ‘बुलढाणा कनेक्शन’ ! दोन आरोपी मोताळा तालुक्यातील

हेही वाचा : पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचे वादग्रस्त वक्तव्य, ‘१२ बजे के बाद सिख’; थट्टेचा विषय की अभिमानाची कहाणी?

“हा पंथ कर्मकांड आणि अंधश्रद्धेला फाटा देतो आणि कबीरांचा मार्ग अनुसरतो. या पंथामध्ये जातीपातीवरून भेदभाव करणे निषिद्ध होते. त्यांच्यामध्ये गरिबांबद्दल सहानुभूतीची भावना होती आणि संपत्ती तसेच अधिकार भावनेबाबत तुच्छता होती”, असे इरफान हबीब यांनी १९६३ सालच्या आपल्या पुस्तकात लिहिले आहे. सतनामी पंथामधील बहुतांशी लोक पूर्वाश्रमीचे अस्पृश्य होते आणि चामडे कमावण्याचे काम करायचे. मात्र, हा समाज कालांतराने या व्यवसायापासून दूर गेला.

औरंगजेबाविरोधात बंडखोरी

“सतनामी पंथातले लोक जुलूम आणि दडपशाही अजिबात सहन करायचे नाहीत. त्यांच्यापैकी बहुतेकांकडे हत्यारे असायची”, असेही खाफी खान यांनी नोंदवून ठेवले आहे. १६७२ मध्ये सध्याच्या पंजाब आणि हरियाणामध्ये राहणाऱ्या सतनामी पंथातील लोकांनी औरंगजेबाविरोधातही विद्रोह केला होता. औरंगजेबाने अधिक कर लादल्यानंतर हा समाज आक्रमक झाला होता. “या विद्रोहाची सुरुवात ग्रामीण भागातील छोट्या झगड्यापासून झाली होती. एक सतनामी आपल्या शेताची राखण करत बसला असता त्यावेळी मुघलांच्या पायदळातील एका सैनिकामुळे त्याच्या मक्याच्या पिकाचे नुकसान झाले. यामुळे रागावलेल्या त्या सतनामी शेतकऱ्याची आणि पायदळातील त्या सैनिकाची शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर त्या सैनिकाने आपल्या हातातील शस्त्राने त्या शेतकऱ्याच्या कपाळावर प्रहार केला. यामुळे संतप्त झालेले इतरही सतनामी आपल्या सवंगड्याच्या पाठीशी उभे राहिले आणि एकत्र येऊन त्या सैनिकाची जवळपास मरणासन्न अवस्था केली.” (संदर्भ : हबीब / ॲग्रॅरियन सिस्टीम)

जेव्हा स्थानिक मुघल सरदाराच्या कानावर ही गोष्ट पडली, तेव्हा त्याने या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी सैनिकांची छोटी तुकडी पाठवली. त्यानंतर इथूनच औरंगजेबाविरोधातील विद्रोहाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. औरंगजेबाविरोधात विद्रोह पुकारल्यानंतर नारनौल आणि बैरातमध्ये काही काळ सतनामींचे वर्चस्व राहिले, मात्र फार काळ हा विद्रोह टिकू शकला नाही. अंतिमत: सतनामींचा हा विद्रोह मोडून काढण्यात आला. “यामध्ये हजारो सतनामी मारले गेले. शस्त्रांची कमतरता असूनही सतनाम्यांनी औरंगजेबाविरोधात मोठा पराक्रम गाजवला होता.” मुघल इतिहासकार साकी मुस्ताद खान यांनी मासिर-ए-आलमगिरीमध्ये याबाबतची माहिती दिली आहे.

गुरु घसीदास यांच्यामुळे पंथाचे पुनरुज्जीवन

औरंगजेबाने मोडून काढलेल्या या विद्रोहानंतर पंथातील बरेच जण मारले गेले, तर उर्वरित लोक दडपशाहीला बळी पडले. त्यानंतर अठराव्या शतकाच्या मध्यानंतर या पंथाचे पुनरुज्जीवन झाले. सध्याच्या उत्तर प्रदेशमध्ये जगजीवनदास आणि छत्तीसगडमधील घसीदास यांनी हा पंथ पुन्हा उभा केला. घसीदास यांना संत रविदास आणि संत कबीराकडून प्रेरणा मिळाली असे म्हटले जाते. मात्र, “सध्याचे बहुतेक सतनामी घसीदास आणि पूर्वीच्या सतनामी चळवळीतील संबंध नाकारतात किंवा त्यांना त्याबद्दल काहीही माहिती नसते”, अशी माहिती अभ्यासक रामदास लँब यांनी ‘रॅप इन द नेम: द रामनामिस, रामनाम, आणि अनटचेबल रिलिजन इन इंडिया’ (२००२) मध्ये लिहिले.

असे असले तरी, गुरु घसीदास यांचे धार्मिक तत्त्वज्ञान जुन्या सतनामींप्रमाणेच होते. “त्यांनीही खऱ्या देवाची पूजा करण्याची शिकवण दिली. मूर्ती पूजा करण्यापेक्षा ‘सतनाम’ या नामजपाला अधिक महत्त्व दिले”, असे लँब यांनी लिहिले आहे. तत्कालीन दलितांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारला जात होता. अशावेळी मूर्ती पूजा नाकारण्याच्या शिकवणुकीमुळे अनेक अस्पृश्य सतनामी पंथामध्ये सामील झाले. घसीदास यांनी मांसाहार, मद्यसेवन, धूम्रपान आणि तंबाखू अशा गोष्टींपासून दूर राहण्याचीही शिकवण दिली. त्यांनी पंथीयांना मातीऐवजी पितळेची भांडी वापरण्यास प्रोत्साहन दिले, तसेच चामडे कमावण्याचे कामही थांबवण्यास सांगितले. कबीर आणि वैष्णवपंथी गळ्यात घालतात तशा तुळशीमाळ घालण्याचा संदेश सतनामींना दिला. आपल्या मूळ जातींची नावे न वापरता ‘सतनामी’ अशी ओळख सांगण्यावरही त्यांनी भर दिला.

हेही वाचा : विश्लेषण : महिला आरक्षणानंतरची पहिलीच लोकसभा निवडणूक…तरीही महिला खासदारांची संख्या घटली! 

सध्या सतनामींची असलेली अवस्था

घसीदासांच्या मृत्यूवेळी सतनामींची संख्या जवळपास अडीच लाखांच्या घरात होती. यातील बहुतांश अनुयायी अनुसूचित जातींमधील होते. गुरुंच्या मृत्यूनंतर पंथीयांनी घसीदास यांचा मुलगा बालकदास यांना आपला गुरु केले. लँब यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८०० च्या अखेरीस या पंथामध्ये गुरुंच्या खालोखाल द्विस्तरीय रचना विकसित झाली. त्याखालोखाल गावपातळीवरही अनेक पंथोपदेशक तयार झाले.

सध्याही हीच रचना अस्तित्वात दिसते. हे पंथोपदेशकच विवाह लावतात, वाद-तंटे मिटवतात, तसेच पंथाला पुढे नेण्यासाठीच्या गोष्टी करतात. मात्र, कालांतराने सतनाम पंथाची मूळ शिकवण मागे पडत चालली असून हिंदू धर्मातील जातींची प्रथा, श्रद्धा आणि कर्मकांडांचा प्रभाव सतनामींवरही पडताना दिसत आहे. ते स्वत:ला हिंदू धर्माचाच भाग मानू लागले आहेत. त्यातील काहींनी हिंदू देव-देवतांच्या मूर्तीही पूजण्यास सुरुवात केली आहे. त्यातले काही जण आपण राजपूत किंवा अगदी ब्राह्मण वंशाचे असल्याचाही दावा करतात. सध्याच्या काळात सतनामी पंथाचे लोकही एक प्रबळ राजकीय शक्ती म्हणून पुढे आले आहेत. सतनामी नेत्यांचे छत्तीसगड राज्यातील जवळपास १३ टक्के अनुसूचित जातींवर वर्चस्व आहे. खरे तर हा पंथ आधीपासून काँग्रेसच्या पाठीशी उभा राहताना दिसतो. परंतु, २०१३ पासून काही सतनामी गुरूंनी अनेक वेळा निष्ठा बदलली आहे. सध्या सतनामी मतेही छत्तीसगडमधील विविध राजकीय पक्षांमध्ये विभागली गेली आहेत.

Story img Loader