सूर्यमालिकेतील महत्त्वाचा ग्रह म्हणजे शनी. शनी ग्रहाभोवती विलोभनीय अशा कडा आहेत; ज्यामुळे या ग्रहाचे वेगळेपण दिसून येते. परंतु, या कडा लवकरच अदृश्य होतील, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. मार्च २०२५ पर्यंत या कडा अदृश्य होतील, अशी माहिती समोर आली आहे. परंतु, या कडा अदृश्य होण्याचे कारण काय? पृथ्वीसाठी ही धोक्याची घंटा आहे का? याविषयी जाणून घेऊ.

शनीच्या कडांबाबतचा अभ्यास काय सांगतो?

शनीभोवती असलेल्या कडांचे अस्तित्व संपेल, असे नाही. मात्र, त्या कडा पृथ्वीवरून दिसू शकणार नाहीत, हे खरे. हे एका ऑप्टिकल इल्युजनसारखे आहे. २६.७३ अंशाच्या कोनात झुकलेल्या शनीला सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे २९.४ वर्षे लागतात. याचा अर्थ असा की, शनी ग्रह एका प्रदक्षिणेच्या अर्ध्या कालावधीत म्हणजेच साधारणपणे १५ वर्षे सूर्याकडे झुकलेला असतो आणि उर्वरित अर्धा काळ तो त्यापासून दूर सरकलेला असतो. त्याच्या कडाही त्याच कोनात झुकलेल्या आहेत. ग्रह फिरत असल्याने पृथ्वीवरून पाहिल्यावर त्यांच्या बाजू बदलत असल्याचे लक्षात येते.

शनी ग्रहाभोवती विलोभनीय अशा कडा आहेत; ज्यामुळे या ग्रहाचे वेगळेपण दिसून येते. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : थायलंडपासून ते जपानपर्यंत; परदेशात कशी केली जाते बाप्पाच्या विविध रूपांची पूजा? गणपती तिथे कसे पोहोचले?

दर १३ ते १५ वर्षांनी शनीच्या कड्यांचा काठ पृथ्वीशी थेट संरेखित होतो. मार्च २०२५ मध्ये हेच घडेल जेव्हा पृथ्वीवरून या कडा दिसणे बंद होईल. शनीच्या कडा अतिशय पातळ आहेत. बहुतेक ठिकाणी त्या फक्त १० मीटर जाड आहेत. या स्थितीत त्या फारच कमी प्रकाश परावर्तित करतील आणि त्यामुळे या कडा अदृश्य झाल्याचे दिसून येईल. परंतु, शनी सूर्याभोवती फिरत राहिल्याने हळूहळू त्याच्या कडा पुन्हा दिसू लागतील. ही घटना यापूर्वी २००९ मध्ये घडली होती.

कडा कायमस्वरूपी अदृश्य होण्याचा धोका

‘नासा’ने २०१८ मध्ये सांगितले होते की, शनीच्या कडा खरोखर अदृश्य होतील. खरे तर, गुरुत्वाकर्षण आणि चुंबकीय क्षेत्रामुळे शनीच्या कडा ग्रहाकडे सतत खेचल्या जात आहेत. नासाचे शास्त्रज्ञ जेम्स ओ’डोनोघ्यू यांनी २०१८ मध्ये सांगितले, ” ‘रिंग रेन’मुळे शनीच्या कड्यांमधून अर्ध्या तासात ‘ऑलिम्पिक’ आकाराचा जलतरण तलाव भरू शकेल इतक्या पाण्याचा निचरा होईल, असा आमचा अंदाज आहे. या दराने शनी पुढील ३०० दशलक्ष वर्षांमध्ये किंवा कदाचित लवकरच या कडा गमावेल.

‘नासा’ने २०१८ मध्ये सांगितले होते की, शनीच्या कडा खरोखर अदृश्य होतील. (छायाचित्र-रॉयटर्स)

नासाच्या कॅसिनी अंतराळयानाच्या डेटावरून असे दिसून आले आहे की, शनीच्या कडा बर्फाच्या आणि खडकाच्या अब्जावधी तुकड्यांपासून तयार झालेल्या आहेत; ज्याचा आकार धुळीच्या कणांइतका लहान ते पर्वतांइतका मोठा आहे. मान्यतेनुसार, दोन बर्फाळ चंद्रांच्या टकरींमुळे १०० दशलक्ष वर्षांपूर्वी या कडा तयार झाल्या. हे शक्य आहे की गुरू, युरेनस व नेपच्युनसारख्या इतर ग्रहांनाही कडा होत्या. आज त्यांच्याकडे फक्त पातळ कडा आहेत. त्यामुळे त्यांच्या दुर्बिणीने पाहणेही कठीण आहे.

हेही वाचा : पुतिन विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अटक वॉरंट; मंगोलियाच्या कृत्याने वेधलं जगाचं लक्ष; नक्की काय घडलं?

दुसरीकडे शनीकडे कडा आहेत; मात्र त्यांच्यातील अंतर खूप जास्त आहे. हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या जवळपास पाच पट असल्याचे सांगितले जाते. शनीभोवती कडांचे सात प्रमुख विभाग आहेत आणि प्रत्येकाची रचना अतिशय जटिल आहे.