आपल्या सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाचे स्वत:चे वेगळे असे वैशिष्ट्य आहे. मात्र या सर्व ग्रहांमध्ये लोकांना शनी या ग्रहाचे सर्वाधिक आकर्षण आहे. या ग्रहाभोवती कडी आहेत. याच कारणामुळे तो पृथ्वीवरून आकर्षक आणि विस्मयकारक वाटतो. मात्र शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार २०२५ साली शनी ग्रहाभोवतीची कडी नाहीशी होणार आहेत. कोट्यवधी वर्षांपासून असलेली ही कडी २०२५ साली अचानकपणे नाहीशी का होणार आहेत? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याच पार्श्वभूमीवर २०२५ साली नेमके काय होणार आहे? शनीची कडी नाहीशी होण्यामागे नेमके कारण काय? हे जाणून घेऊ या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनी ग्रहाची कडी दिसणार नाहीत

आगामी २०२५ साली शनी ग्रहाभोवतीची कडी नाहीशी होणार आहेत. मात्र ही कडी कायमस्वरुपी नाहीशी होणार नाहीत. मुळात शनी ग्रहाची कडी आहेत त्याच जागेवर कायम असतील. फक्त २०२५ साली काही काळासाठी ती पृथ्वीवरून दिसणार नाहीत. विशिष्ट कालावधी संपल्यानंतर ही कडी पृथ्वीवरून पुन्हा दिसायला लागतील. शनी ग्रहाभोवतीची कडी नष्ट झाल्याचा भास आपल्याला होईल. म्हणजेच हा एक ऑप्टिकल इल्यूजनचाच एक प्रकार असेल.

हेही वाचा >>>उत्तराखंडमध्ये लवकरच समान नागरी कायदा? जाणून घ्या नेमक्या तरतुदी काय?

शनीची कडी का दिसणार नाहीत?

पृथ्वीचा अक्ष हा ( पृथ्वी स्वत: भोवती फिरताना ज्या अक्षाभोवती फिरते ) ज्याप्रमाणे २३.५ अंशात कलला आहे त्याचप्रमाणे शनीचा अक्ष २६.७ अंशाने कलला आहे. तसंच शनीच्या कडी या सुद्धा काही प्रमाणात कलल्या आहेत. त्यामुळेच शनी जेव्हा सूर्याभोवती परिक्रमा घालत असतो तेव्हा तो कललेला दिसतो आणि याचा एकत्रित परिणाम म्हणजे या कडी वेगवेगळ्या कोनातून दिसतात, वर खाली होताना दिसतात.

सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी लागतात २९.५ वर्षे

शनी ग्रह सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा २९.५ वर्षांत पूर्ण करतो. तर प्रत्येक १३ किंवा १५ वर्षांनी शनी ग्रहाभोवतीची कडी पृथ्वीच्या समांतर येतात. ही कडी जास्त जाड नसतात. सांगायचेच झाल्यास या कडींची जाडी काही मीटरमध्ये असते. ही कडी जेव्हा पृथ्वीच्या समांतर येतात तेव्हा त्या सूर्याचा फारच कमी प्रकाश परावर्तीत करतात. परिणामी शनीची कडी पृथ्वीवरून दिसणे कठीण होते. या काळात कडी पृथ्वीवरून जवजवळ दिसत नाहीत, अशी माहिती युनिव्हर्सिटी ऑफ साऊथर्न कॅलिफोर्नियातील भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राचे प्राध्यापक वाहे पेरोमैन यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नितीन गडकरी यांचा उपक्रम; अमरनाथ यात्रा आता वाहनाने करणे शक्य होणार?

भविष्यात शनी ग्रहाची कडी खरंच नाहीशी होतील?

२०२५ साली शनी गृहाची कडी पृथ्वीवरून काही काळासाठी दिसणार नाहीत. निश्चित कालावधीनंतर ती पुन्हा एकदा दिसू लागतील. मात्र भविष्यात ही कडी पूर्णपणे आणि कायमस्वरुपी नष्ट होतील, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) च्या २०१८ सालच्या एका अहवालानुसार शनी ग्रहाभोवतीची कडी साधारण ३०० दशलक्ष वर्षांनी नष्ट होतील. या कडींना नष्ट होण्यासाठी कदाचित यापेक्षाही कमी कालावधी लागेल. शनी ग्रहाला स्वत:ची अशी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. त्यामुळे या कडींना शनी ग्रह स्वत:कडे सतत ओढत असतो.

कडींतील घटकांचे तुकडे शनी ग्रहावर पडतात

शनीभोवतालची कडी या खडक, बर्फ आणि धुलिकणांनी बनलेल्या आहेत. सूर्याची युव्ही किरणे तसेच अंतराळातील इतर खगोलीय गोष्टींचा सतत मारा होत असल्याने या कडींमधील घटकांचे तुकडे होऊन ते शनीच्या भूपृष्ठभागावर पडतात. त्यामुळे आगामी वर्षांत शनी ग्रहाची कडी नष्ट होण्याची शक्यता आहे. शनीच्या वातावरणीय ढगांमध्ये कडींतील घटकांचे बाष्पीभवन होऊन त्या नष्ट होत चालल्या आहेत. खगोलशास्त्रज्ञ याला ‘रिंग रेन’ म्हणजे ‘कडींचा पाऊस’ असे म्हणतात.

हेही वाचा >>>विश्लेषण : आरोपांच्या फैरीमुळे छत्तीसगडच्या रणधुमाळीत रंगत; पहिल्या टप्प्यातील मतदानाचे संकेत काय?

शनी ग्रह ४ अब्ज वर्षे जुना

दरम्यान, शनी ग्रहाचे वय हे जवळपास ४ अब्ज वर्षे असल्याचे म्हटले जाते. तर शनी ग्रहाभोवतीची कडी या १०० दशलक्ष जुण्या आहेत. म्हणजेच शनी भोवतालच्या या कडी शनीच्या निर्मिती पासूनच्या नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saturns rings will disappear in year 2025 know detail information prd