सौदी अरेबियाने भारत आणि पाकिस्तानसह जगातील एकूण १४ देशांच्या व्हिसावर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला. ही बंदी तात्पुरती असल्याचे सांगितले जात आहे, मात्र हज यात्रेपूर्वी घालण्यात आलेल्या या बंदीचा परिणाम जगभरातील हजला येणाऱ्या यात्रेकरूंवर होणार आहे. या बंदीमुळे उमरा, व्यवसाय आणि कुटुंब भेटीसाठी सौदी अरेबियामध्ये येणाऱ्या नागरिकांच्या व्हिसावर परिणाम होणार आहे. सौदी अरेबियाने अल्जेरिया, बांगलादेश, इजिप्त, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, इराक, जॉर्डन, मोरोक्को, नायजेरिया, पाकिस्तान, सुदान, ट्युनिशिया आणि येमेन या देशांमधील नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी घातली आहे . भारताचे नाव या यादीत कसे? या व्हिसा बंदीचा भारतीयांवर काय परिणाम होणार? आणि किती काळ हे निर्बंध लागू राहतील? त्याविषयी जाणून घेऊ.

व्हिसा बंदीमध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश?

ज्या १४ देशांवर सौदी अरेबियाने व्हिसा बंदी घातली, त्याच १४ देशांमधून प्रामुख्याने हज यात्रेकरू येतात. दिवसेंदिवस हज यात्रेला येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे हज यात्रेदरम्यान होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सौदी अरेबिया सरकारकडून प्रवासावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात अनेकदा सौदी अरेबियामध्ये बेकायदा पद्धतीनेदेखील प्रवेश केला जातो. असे बेकायदा प्रवेश थांबवण्यासाठीदेखील हा निर्णय घेण्यात आल्याचे सौदी अरेबियातील अधिकाऱ्यांचे सांगणे आहे. गेल्या वर्षी अनियंत्रित अश्या गर्दीमुळे हज यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली होती, याच दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठीदेखील हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे. गेल्या वर्षी हजमध्ये तीव्र उष्णतेमुळे आणि बेकायदा पद्धतीने प्रवेश केलेल्या यात्रेकरूंमुळे चेंगराचेंगरी झाली होती.

सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अधिकाऱ्यांना व्हिसा प्रक्रिया अधिक कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. जारी केलेल्या सुधारित नियमांनुसार, यावर्षी उमरा व्हिसासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल आहे. हज कालावधी संपेपर्यंत पुढील उमरा व्हिसा जारी केला जाणार नाही, अशी माहिती अनेक माध्यमवाहिन्यांनी दिली आहे. काही परदेशी नागरिक उमरा किंवा व्हिजिट व्हिसाच्या मदतीने सौदी अरेबियात येत आहेत आणि मक्का येथील हजमध्ये सहभागी होण्यासाठी बेकायदा पद्धतीने रहात आहेत, अशी चिंतादेखील सौदी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

ज्या १४ देशांवर सौदी अरेबियाने व्हिसा बंदी घातली, त्याच १४ देशांमधून प्रामुख्याने हज यात्रेकरू येतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

व्हिसा निलंबित करण्यात आलेल्या १४ देशांच्या यादीमध्ये अल्जेरिया, बांगलादेश, इजिप्त, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, इराक, जॉर्डन, मोरोक्को, नायजेरिया, पाकिस्तान, सुदान, ट्युनिशिया आणि येमेन या देशांचा समावेश आहे. हज यात्रेकरूंची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ही कारवाई करण्यात आले आहे आणि त्याचा राजनैतिक बाबींशी त्याचा काहीही संबंध नाही, असे सौदीच्या हज आणि उमरा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे, असे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, ज्यांनी अधिकृतपणे नोंदणी केली आहे त्यांना हा नियम लागू होणार नाही. तसेच राजकीय व्यक्ती, सौदी अरेबियातील निवासी आणि हजसाठी जारी केले जाणारे व्हिसा वैध राहणार आहेत. सौदी अधिकाऱ्यांनी असेही स्पष्ट केले आहे की, योग्य परवानगी असल्याशिवाय हज करणाऱ्या किंवा व्हिसाची मुदत संपल्यानंतरही सौदी अरेबियात राहणाऱ्या व्यक्तीला देशात प्रवेश करण्यास पाच वर्षांची बंदी घातली जाऊ शकते.

भारताचा या यादीत समावेश कसा?

भारतातील अनेक यात्रेकरू हज यात्रेत परवानगीशिवाय सामील झाल्याची, त्यांच्याकडून व्हिसाचा गैरवापर करण्यात आल्याची माहिती सौदी अधिकाऱ्यांना मिळाली. परिणामी या १४ देशांच्या यादीत भारताचादेखील समावेश करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार, भारत आणि इतर ठिकाणांहून अनेक प्रवासी उमरा किंवा देशाला भेट देण्यासाठी असणाऱ्या व्हिसावर राज्यात दाखल झाले आणि नंतर अधिकृतरीत्या नोंदणी न करता त्यांनी हजमध्ये प्रवेश केला. मुख्य म्हणजे, हजमध्ये सहभागी होण्यासाठी हे लोक देशात परवानगीपेक्षा जास्त काळ राहिले.

सौदी अरेबिया प्रत्येक देशासाठी एका कोटा ठरवते. कोणत्या देशातून किती यात्रेकरूंना हज यात्रेला येण्यास परवानगी आहे, हे या कोट्यात दिले गेले असते. या कोट्याद्वारे यात्रेकरूंची संख्या निश्चित केली जाते. परंतु, बेकायदा प्रवेशामुळे सौदी अधिकाऱ्यांच्या नियोजनात अडथळा निर्माण होतो. २०२४ च्या हज यात्रेदरम्यान झालेल्या गर्दी आणि तीव्र उष्णतेमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले होते. या घटनेसाठी अधिकाऱ्यांनी बेकायदा पद्धतीने यात्रेत उपस्थित असणाऱ्या यात्रेकरूंना जबाबदार धरले. २०२४ च्या दुर्घटनेत १,२०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

ही बंदी कधीपर्यंत राहील?

सौदी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल २०२५ ही उमरा व्हिसा जारी करण्याची शेवटची तारीख असणार आहे. १३ एप्रिलनंतर हज यात्रा संपेपर्यंत यादीत असणाऱ्या देशांमधील नागरिकांना कोणतेही नवीन व्हिसा दिले जाणार नाहीत. हज यात्रा संपेपर्यंत म्हणजेच जूनच्या मध्यापर्यंत ही बंदी लागू राहील अशी शक्यता आहे, असे माध्यम वाहिन्यांचे सांगणे आहे.

२०२४ मधील दुर्घटना

सौदी अरेबियातील मक्का येथे दरवर्षी होणार्‍या हज यात्रेला मुस्लीम धर्मात खूप महत्त्व आहे. या यात्रेसाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने यात्रेकरू मक्का येथे पोहोचतात. मात्र, २०२४ साली हजमध्ये मोठी दुर्घटना घडली होती. उष्माघातामुळे जवळजवळ १,२०० हून अधिक यात्रेकरूंनी आपला जीव गमवला होता. गेल्या वर्षीची हज यात्रा सौदी अरेबियांच्या कडक उन्हाळ्यामध्ये पार पडली. या यात्रेला मुस्लीम धर्मात विशेष महत्त्व आहे, परंतु अनेकांना ही यात्रा परवडणारी नसल्यामुळे हजारोंच्या संख्येने लोक बेकायदा पद्धतीने या यात्रेत सामील होतात. दरवर्षी, अधिकृत हज परवान्यांची उच्च किंमत परवडणारी नसलेले हजारो लोक अनधिकृत मार्गांनी यात्रेत सामील होण्याचा प्रयत्न करतात.

अधिकृत नोंदणी नसलेल्या यात्रेकरूंना धोका जास्त असतो, कारण नोंदणीकृत यात्रेकरूंना मिळणाऱ्या सुविधा त्यांना मिळत नाही, जसे की वातानुकूलित सुविधांमध्ये प्रवेश. गेल्या काही वर्षांत हजमध्ये अनेक दुर्घटना घडल्या आहेत, ज्यात आग आणि चेंगराचेंगरीसारख्या घटनांचा समावेश आहे. २०१५ साली सौदीतील मीना येथे हजमधील दगड मारण्याच्या एका प्रथेदरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यात २,३०० यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. जिओफिजिकल रिसर्च लेटर्समध्ये प्रकाशित झालेल्या २०१९ च्या एका अभ्यासात सांगण्यात आले आहे की, हवामान बदलामुळे २०४७-२०५२ दरम्यान आणि २०७९-२०८६ पर्यंत हजदरम्यान उष्णतेची पातळी अतिजास्त असणार आहे.