Merchant Navy Officer Murder : उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात घडलेल्या एका हत्याकांडानं अख्ख्या देशाला हादरवून टाकलं. सौरभ राजपूत या मर्चट नेव्ही अधिकाऱ्याची त्याच्या पत्नीनं आणि तिच्या प्रियकरानं मिळून हत्या केली. हत्येनंतर त्यांनी सौरभच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकले. या घटनेची कोणालाही कुणकुण लागू नये म्हणून आरोपींनी ड्रममध्ये सिमेंटही भरलं. मात्र, ही घटना मृत सौरभच्या लहान मुलीनं आपल्या डोळ्यादेखत पाहिली. घराशेजारील मंडळी जेव्हा चिमुकलीला तिच्या वडिलांबद्दल विचारायचे, तेव्हा पप्पा ड्रममध्ये आहेत, असं ती सांगायची. दरम्यान, हत्याकांडाचं हे प्रकरणं नेमकं कसं उघडकीस आलं? याबाबत जाणून घेऊ…

पतीची हत्या करून मृतदेहाचे १५ तुकडे केले

मेरठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय मुस्कान रस्तोगीनं तिचा प्रियकर साहिल शुक्ला याच्याबरोबर मिळून ३ मार्चच्या रात्री पती सौरभ राजपूत याची हत्या केली. हत्येनंतर त्यांनी सौरभच्या मृतदेहाचे १५ तुकडे केले आणि प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकले. घडलेली घटना कुणालाही कळू नये म्हणून आरोपींनी ड्रममध्ये सिमेंटही भरलं. हा गुन्हा उघड होताच पोलिसांनी कटरच्या साह्यानं ड्रम कापून मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. याप्रकरणी मुस्कान आणि तिच्या प्रियकाराविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केलं असता दोघांनाही १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सौरभची लहान मुलगी शेजारच्यांना काय सांगायची?

पोटच्या मुलाची त्याच्या पत्नीने हत्या केल्याचं समोर येताच मृत सौरभच्या आई कविता देवी यांनी हंबरडा फोडला. घडलेल्या घटनेबाबत माध्यमांना माहिती देताना त्या म्हणाल्या, सौरभची हत्या करताना मुस्कान आणि तिच्या प्रियकराला माझ्या नातीनं (सौरभची छोटी मुलगी) पाहिलं होतं. जेव्हा शेजारी तिला विचारायचे की तुझे बाबा कुठे गेले, तेव्हा ती त्यांना सांगायची की पप्पा घरातील ड्रममध्ये आहेत. चिमुकलीच्या या गोष्टीवर कुणालाही विश्वास बसत नव्हता. कारण, सौरभ हा लंडनमध्ये नोकरी करतो आहे, असं त्यांना वाटत होतं.” दरम्यान, मेरठ पोलिसांनी कविता देवी यांचा हा दावा फेटाळून लावला. “मुस्कान आणि तिचा प्रियकर जेव्हा ड्रम विषयी बोलत होते, तेव्हा तिच्या लहान मुलीने ते ऐकलं असेल. मुलीला या घटनेबद्दल काहीही माहिती नव्हते,”असं पोलिस अधीक्षक विक्रम सिंह यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा : Adolescence Web Series : नेटफ्लिक्सवरील ‘या’ वेब सीरिजमुळे विखारी पौरुषत्वाची का होतेय चर्चा?

सौरभच्या आईनं माध्यमांना काय सांगितलं?

सौरभच्या हत्येबद्दल बोलताना कविता देवी म्हणाल्या, “माझ्या मुलाची हत्या केल्यानंतर मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल दोघेही हनीमूनसाठी सिमल्याला गेले होते. ज्या ड्रममध्ये त्यांनी सौरभच्या मृतदेहाचे तुकडे करून सिमेंट भरलं होतं, तो ड्रम घरातच पडून होता.” पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कान भाड्याच्या घरात राहत होती. घरमालकानं तिला नूतनीकरणासाठी घरं रिकामं करून देण्यास सांगितलं होतं. जेव्हा ती सिमला येथून परत आली, तेव्हा घरमालकानं खोलीतील सामान बाहेर काढण्यासाठी मजुरांना पाठवलं.

हत्येचा उलगडा नेमका कसा झाला?

मजुरांनी सिमेटने भरलेला हा ड्रम उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो खूपच जड असल्यानं त्यांना उचलता आला नाही. यामध्ये काय आहे असं मजुरांनी विचारलं असता ड्रममध्ये घरातील कचरा असल्याचं मुस्काननं त्यांना सांगितलं. यातील एका मजुराने ड्रमचे झाकण उघडल्यानंतर आतून मृतदेहाचा वास आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, पोलिस येण्याआधीच मुस्कान तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली होती. रेणू देवी यांनी असाही आरोप केला की, मुस्कानच्या आईला या घटनेबद्दल आधीपासूनच माहित होते, परंतु तिने मुलीचा गुन्हा लपविण्यासाठी तिला मदत केली.

सौरभ-मुस्कानचा झाला होता प्रेमविवाह

मृत सौरभ हा मेरठच्या ब्रह्मपुरी भागातील रहिवासी होता. त्याच्या घरापासून काहीच अंतरावर मुस्कान राहत होती. कालांतराने सौरभ आणि मुस्कानमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांनीही २०१६ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, सौरभच्या कुटुंबियांनी या लग्नाला विरोध केला होता. मात्र, कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता त्याने मुस्कानबरोबर लग्न केलं. लग्नानंतर लगेचच सौरभने आपल्या पत्नीबरोबर वेळ घालवण्यासाठी मर्चंट नेव्हीमधील नोकरीही सोडली, ज्यामुळे त्याचे कुटुंबीय आणखीच नाराज झाले.

मुस्कानच्या प्रेमसंबंधांची सौरभला कुणकुण

घरातील वादामुळे सौरभ आणि मुस्कान किरायाने घर घेऊन दुसरीकडे राहू लागले. सौरभच्या आईने असा आरोप केला आहे की, मुस्कानने त्याच्याबरोबर पैशासाठी लग्न केलं होतं. २०१९ मध्ये मुस्कानने एका मुलीला जन्म दिला. मात्र, सौरभचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण, त्याला मुस्कानचे साहिल शुक्ला या तरुणाबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचं कळालं. सौरभने मुस्कानला घटस्फोट देण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करून त्याने माघार घेतली. पण तरीही दोघांच्या नात्यात दुरावा तसाच कायम राहिला. २०२३ मध्ये सौरभ पुन्हा नौदलात रुजू झाला आणि देश सोडून लंडनला राहू लागला.

हेही वाचा : पाकिस्तानी तरुण व्हिसाविना मुंबईत येऊन वडापाव खाऊन गेला? हे शक्य आहे का?

मुलीच्या वाढदिवसासाठी आला होता सुट्टीवर

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, २४ फेब्रुवारी रोजी सौरभ लंडनहून भारतात परत आला. २८ फेब्रुवारी रोजी त्याच्या मुलीचा वाढदिवस होता. यानंतर ४ मार्चपासून तो अचानक बेपत्ता झाला. मेरठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कान आणि साहिलनं आधीच सौरभच्या हत्येची संपूर्ण योजना आखली होती. त्यांनी चाकू आणि बेशुद्ध करण्याची औषधंदेखील खरेदी केली होती. हत्येच्या दिवशी म्हणजे ३ मार्चच्या रात्री मुस्काननं सौरभच्या जेवणात बेशुद्ध होण्याचं औषध मिसळलं. जेव्हा सौरभची शुद्ध हरपली, तेव्हा साहिलनं त्याचा हात धरला आणि मुस्काननं त्याच्यावर चाकूनं वार केले.

मुस्कानने सौरभची हत्या कशी केली?

सौरभच्या हत्येनंतर आरोपींनी त्याचा मृतदेह बाथरूममध्ये नेला आणि त्याचे १५ तुकडे केले. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी घरातील खोली ब्लीचिंग पावडरनं धुतली. ४ मार्च रोजी मुस्काननं बाजारातून एक ड्रम विकत घेतला. त्यात सौरभच्या मृतदेहाचे तुकडे टाकले आणि ड्रममध्ये सिमेंट भरलं. मेरठचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आयुष विक्रम सिंह म्हणाले, “पोलिसांना मुस्कानच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाली. तपास केल्यावर आम्हाला सौरभचा मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये सिमेंटच्या ड्रममध्ये आढळून आला. त्यानंतर मुस्कान आणि तिच्या प्रियकराला आम्ही ताब्यात घेतलं. दोघांनीही खुनाची कबुली दिली आहे.”

मुस्कान आणि साहिलला फाशी देण्याची मागणी

मुस्कान आणि तिचा प्रियकर सौरभवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सौरभची आई कविता देवी आणि त्याच्या मुलाने केली आहे. मुस्कानच्या कुटुंबीयांनीही तिला फाशी देण्यात यावी, असं पोलिसांना सांगितलं आहे. “माझ्या मुलीने प्रियकराच्या साथीने नवऱ्याची हत्या केली आहे. ती या समाजात राहाण्यासाठी योग्य नाही आणि इतरांसाठीही धोकादायक आहे, तिला तत्काळ फासावर लटकवा”, असं मुस्कानच्या वडिलांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. सौरभ खूपच चांगला मुलगा होता, आमच्या मुलीनं त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली तिला शिक्षा झालीच पाहिजे, असं मुस्कानच्या आईने म्हटलं आहे.