भारताच्या लष्करी इतिहासामध्ये परमवीर चक्र हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार परम शौर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे. आतापर्यंत आपल्या देशाने २१ युद्धवीरांना परमवीर चक्राने सन्मानित केले आहे. प्रचंड प्रतिकूल परिस्थिती असतानाही हे भारतीय सैनिक शत्रूच्या विरोधात ठामपणे उभे राहिले होते, त्यामुळे त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना हे प्रतिष्ठित पदक प्रदान करण्यात आले. त्यामध्ये कारगिल युद्धातील चार शूर जवानांचाही समावेश आहे. कॅप्टन विक्रम बात्रा (मरणोत्तर), रायफलमॅन संजय कुमार, ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव, लेफ्टनंट मनोजकुमार पांडे (मरणोत्तर) या चार जवानांना कारगिल युद्धातील असीम कामगिरीबद्दल परमवीर चक्र देण्यात आले होते. मात्र, या प्रतिष्ठित पदकाची रचना कुणी केली असावी, असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्काराची रचना मराठी बोलणाऱ्या परदेशी महिलेने केली होती, असे सांगितले तर नक्कीच भुवया उंचावतील; मात्र हे खरे आहे. परमवीर चक्राची रचना आणि निर्मिती ही एका स्वीस वंशाच्या भारतीय महिलेने केली होती. सावित्री खानोलकर हे त्यांचे नाव! या सावित्रीबाईंचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. कोण होत्या सावित्री खानोलकर आणि त्यांनी परमवीर चक्राची रचना कशाप्रकारे केली, ते जाणून घेऊयात.
हेही वाचा : स्रियांचा सखा ते राष्ट्रपती भवनातील अशोक मंडप;अशोक वृक्षाचा प्रवास कसा?
स्वित्झर्लंडची मारोस कशी झाली सावित्री?
सावित्री खानोलकर यांचा जन्म २० जुलै १९१३ रोजी स्वित्झर्लंडमधील न्युचेटेलमध्ये झाला. त्यांचे मूळ नाव इव्ह इव्होन मॅडे डी मारोस असे होते. त्यांचे वडील आंद्रे डी मॅडे हे जिनिव्हा विद्यापीठातील समाजशास्त्राचे प्रतिष्ठित हंगेरियन प्राध्यापक होते; तर त्यांच्या आई मार्थे हेन्जेल्ट या जिनिव्हा येथील इन्स्टिट्यूट जीन-जॅक रुसो येथे रशियन शिक्षणतज्ज्ञ होत्या. इव्ह इव्होन मॅडे डी मारोस यांची ‘सावित्री’ होण्यामागची कथाही मोठी रंजक आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान, इव्ह इव्होन मॅडे डी मारोस या मेजर जनरल विक्रम खानोलकर यांच्या प्रेमात पडल्या. विक्रम खानोलकर हे ब्रिटनमधील रॉयल मिलिटरी अकादमीत प्रशिक्षण घेत होते. इव्ह इव्होन मॅडे डी मारोस यांच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. मात्र, तरीही मारोस यांनी धाडसाने विक्रम खानोलकर यांच्याशीच लग्न करणे पसंत केले. त्या विक्रम खानोलकर यांच्या पाठोपाठ भारतात परतल्या. १९३२ मध्ये त्यांनी विक्रम खानोलकर यांच्याशी लग्न केले. या लग्नानंतर त्यांना सावित्रीबाई खानोलकर हे नाव मिळाले. त्यानंतर त्यांचे उर्वरित आयुष्य भारतातच गेले.
भारतीय संस्कृती आणि इतिहासाशी जुळले घट्ट नाते
एका दूरच्या देशात जन्म होऊन भारतात आलेल्या सावित्रीबाईंना इथल्या देशाशी जुळवून घेण्यात तशा फारशा अडचणी आल्या नाहीत. याउलट अल्पावधीतच त्यांचे भारताचा इतिहास आणि संस्कृतीशी घट्ट नाते प्रस्थापित झाले. त्यांनी भारतीय पौराणिक कथा, परंपरा आणि धार्मिक ग्रंथांचा प्रचंड अभ्यास केला. त्यांनी स्वत: शाकाहारी जीवनशैलीही स्वीकारली. त्यांना अस्खलित मराठी, संस्कृत आणि हिंदी भाषा येत होत्या. याबरोबरच त्यांनी भारतीय संगीत, नृत्य आणि चित्रकलादेखील शिकून घेतली. निवृत्त स्क्वाड्रन लीडर पी. ए. पाथ्रीकर यांनी त्यांच्याबाबत बोलताना टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “त्या नेहमी असं म्हणायच्या की, त्या चुकून युरोपामध्ये जन्माल्या आल्या होत्या. कुणी त्यांना परदेशी म्हटल्यास त्यांना वाईट वाटायचे; कारण त्यांचा आत्मा खऱ्या अर्थाने भारतीयच होता.”
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून घेतली प्रेरणा
भारतीय संस्कृती आणि इतिहासाबाबत सावित्रीबाईंना सखोल जाण होती. त्यामुळे १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मेजर जनरल हिरा लाल अटल यांनी लढाईतील शौर्य पदक तयार करण्यासाठी त्यांची मदत घेतली. ब्रिटनच्या व्हिक्टोरिया क्रॉसची जागा घेणारा भारताचा लष्करी पुरस्कार तयार करण्याचे काम सावित्रीबाईंना सोपवण्यात आले. इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सावित्रीबाई खानोलकर यांनी भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार तयार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेतली होती. शिवाजी महाराजांचा सन्मान करण्यासाठी त्यांनी पदकाच्या दोन्ही बाजूला महाराजांची ‘भवानी’ ही पौराणिक तलवार समाविष्ट केली. या तलवारीच्या बाजूला इंद्र देवाच्या ‘वज्र’ या शक्तिशाली पौराणिक शस्त्राचाही समावेश केला. नॅशनल वॉर मेमोरिअलने नमूद केल्याप्रमाणे, सावित्रीबाईंना वैदिक ऋषी दधीची यांच्याकडून प्रेरणा मिळाली होती. दधीची ऋषी यांनी आपल्या शरीराचा त्याग करून परम यज्ञ केला होता; जेणेकरून देवांना त्यांच्या मणक्यातून ‘वज्रा’ या घातक शस्त्राची निर्मिती करता येईल.
हेही वाचा : पॅरिस ऑलिम्पिक हे आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक पर्यावरणपूरक आयोजन का असणार आहे?
अशी केली परमवीर चक्राची रचना
परमवीर चक्राच्या रचनेमध्ये गोलाकार कांस्य तबकडीचा वापर करण्यात आला आहे. या तबकडीचा व्यास १.३७५ इंच (३.४९ सेमी) आहे. त्याला ३२ मिमी जांभळ्या रंगाची रिबन लावलेली असते. योगायोग म्हणजे भारताच्या पहिल्या प्रजासत्ताकदिनी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी पहिले परमवीर चक्र सावित्रीबाईंच्याच एका नातेवाईकांना प्रदान करण्यात आले होते. सावित्रीबाईंची मोठी मुलगी कुमुदिनी शर्मा यांचे मेहुणे मेजर सोमनाथ शर्मा यांना १९४७-४८ च्या काश्मीरमधील भारत-पाक युद्धातील शौर्याबद्दल हे चक्र प्रदान करून मरणोत्तर सन्मानित करण्यात आले होते.
‘महाराष्ट्रातील संत’ नावाचे पुस्तक लिहिणारी अस्सल मराठी बाई
सावित्रीबाईंनी फक्त परमवीर चक्रच नव्हे तर आणखीही प्रतिष्ठित शौर्य पदकांची रचना केली होती. त्यामध्ये महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र यांचा समावेश होतो. सावित्रीबाईंचा सामाजिक कार्यातही मनापासून सहभाग होता. त्यांनी नंतरची बरीच वर्षे सैनिकांना, त्यांच्या कुटुंबीयांना आणि फाळणीदरम्यान विस्थापित झालेल्या निर्वासितांना मदत करण्यासाठी समर्पित केली. १९५२ मध्ये पतीच्या निधनानंतर त्यांनी रामकृष्ण मिशनमध्ये सामील होऊन अध्यात्मात आपले मन रमवले. त्यांनी ‘महाराष्ट्रातील संत’ नावाचे पुस्तकही लिहिले होते. हे पुस्तक आजही लोकप्रिय आहे.