कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) जनक म्हटले जाते, ते जेफ्री हिंटन यांनी अलिकडेच शिक्षणाच्या भविष्याबद्दलची मते व्यक्त केली आहेत. त्यांनी म्हटले आहे, की एआयमुळे नजीकच्या भविष्यात शाळा आणि विद्यापीठे या संकल्पनाच कालबाह्य होणार आहेत…
जेफ्री हिंटन कोण आहेत?
जेफ्री हिंटन हे ब्रिटिश-कॅनेडियन संगणक तज्ज्ञ आणि कॉग्निटिव्ह सायकॉलॉजिस्ट आहेत. डीप लर्निंग आणि आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्कमधील त्यांच्या संशोधनासाठी त्यांना २०२४ चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांना एआयचे जनक असे संबोधले जाते. त्यांनी केम्ब्रिज आणि एडिनबरा विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. २०१२ मध्ये त्यांनी त्यांच्या दोन सहकाऱ्यांसोबत केलेल्या संशोधनामुळे एआय क्रांतीची सुरुवात झाली. हेच संशोधन गुगलने विकत घेतले. हिंटन यांनी पुनरुज्जीवित केलेल्या बॅकप्रॉपगेशन अल्गोरिदममुळे डीप लर्निंगसारख्या एआयच्या मूलभूत पद्धतीत मोलाचे संशोधन करता आले. त्यांनी एआयचा वापर दृश्य ओळख, भाषा प्रक्रिया आणि ऑटोनॉमस सिस्टीममध्ये कसा करता येऊ शकतो, याचे ज्ञान जगाला दिले.
एआयमुळे शिक्षण क्षेत्रावर कोणते परिणाम?
जेफ्री हिंटन यांनी अलिकडेच वेस रॉथ (तंत्रज्ञान सल्लागार) यांना दिलेल्या एका मुलाखतीत एआय ट्युटरविषयी भविष्यवाणी केली. भविष्यात एआय इतके प्रगत होईल की ते वैयक्तिक शिक्षकासारखे काम करू शकेल. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या गरजेनुसार शिकवणारा एक एआय ट्यूटर असू शकेल, असे जेफ्री म्हणाले. अर्थात सध्या एआयच्या प्रणाली इतक्या पूर्ण क्षमतेच्या नाहीत. पण पुढील दशकभरात एआय तंत्रज्ञान इतके प्रगत होईल की ते खूपच सक्षमपणे अनेक गोष्टी करू शकणार आहे. भविष्यात एआय ट्युटर शिक्षकांपेक्षा कैक पटींनी चांगले काम करतील. कारण त्यांना तसे व्यापक ज्ञान आणि माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेले असेल. ते माहिती आणि पॅटर्न ओळखू शकतील. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला काही शिकायचे असेल तर एआयची सिस्टीम हे समजू शकेल की त्या विद्यार्थ्याला नेमके काय समजत नाही आणि नेमके तेच त्या विद्यार्थ्याला एआय त्याला कळेल अशा भाषेत शिकवेल. एका वेळी लाखो विद्यार्थ्यांचे शिकण्याचे पॅटर्न लक्षात आल्याने एआय विद्यार्थ्याची शिकण्याची पद्धत, गती आणि आवड लक्षात घेऊन त्याप्रमाणे शिक्षण देऊ शकेल. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या पातळीवर समजेल अशा भाषेत आणि पद्धतीने शिकवता येईल. प्रत्येक विद्यार्थ्यागणिक शिकवण्यासाठी उदाहरणे बदलतील, अत्यंत अचूक, सफाईदार पद्धतीने विश्लेषण करून विषय सोपा करून समजावला जाईल. ही प्रक्रिया मानवी प्रक्रियेपेक्षा तीन ते चार पटींनी चांगली असेल. म्हणजेच शिक्षकांपेक्षा तीन-चार पटींनी एआय उत्तम अध्यापन करेल. याचा थेट परिणाम शाळा आणि विद्यापीठांच्या परिचालनावर संभवतो. याचा विचार शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना करावाच लागेल, हे हिंटन यांच्या मुलाखतीने अधोरेखित केले.
सध्या एआयचा वापर कोणत्या शाळेत?
वेस रॉथ यांनी त्यांच्या एक्स हँडलवर जेफ्री यांच्या मुलाखतीचा अंश व्हिडिओद्वारे पोस्ट केला होता. त्यावर त्याखालीच एका वापरकर्त्याने टेक्सासमधील एका शाळेचे उदाहरण दिले. या शाळेने दिवसभरातले फक्त दोन तासांचे अध्यापन विद्यार्थ्यांना एआयद्वारे सुरू केले आणि अल्पावधीतच त्याचे खूप चांगले परिणाम दिसून आले. या शाळेने देशातल्या उच्चतम दोन टक्के शाळांमध्ये स्थान मिळवले. चीनमध्येही मोठ्या प्रमाणावर शिक्षणात एआयच्या समावेशाचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
शिक्षकांची गरज संपेल का?
वेस रॉथ यांच्या एक्स हँडलवर जेफ्री यांच्या शिक्षणविषयक भविष्यवाणीबद्दल अनेकांनी वेगवेगळी मते मांडली. एका वापरकर्त्याने असे निदर्शनास आणून दिले की एआय जरी ज्ञाननिर्मिती करू शकणार असले तरी त्याच्या ज्ञानात भर घालण्यासाठी जी सामग्री तयार करावी लागेल ती अर्थातच माणसेच तयार करणार आहेत. यात तथ्यही आहे. याचाच अर्थ मानवी मेंदू पारंपरिक मार्गांनी कमी सक्रिय होतील, पण ही बौद्धिक ऊर्जा नव्य क्षेत्रांमध्ये वळती होईल. ती कशी याची आपण सध्या तरी संपूर्ण कल्पना करू शकलो नाही तरी इतके सांगता येईल की शैक्षणिक सामग्री शिक्षकच तयार करतील, म्हणजे त्यांची पारंपरिक अध्यापनाची भूमिका बदलेल. शिक्षक फक्त माहिती देणारी व्यक्ती न राहता मार्गदर्शक, समुपदेशक आणि भावनिक आधार देणारे बनतील. कारण एआय माहिती देऊ शकतो, पण माणसांमधील संवाद, भावना आणि समज या गोष्टी हाताळण्यात कायम माणूस एआयच्या एक पाऊल पुढेच असेल.
शिक्षण सर्वदूर पसरेल का?
एआयनंतरच्या जगात शिक्षण आधीपेक्षा अधिक जलद आणि अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा एका वापरकर्त्याने व्यक्त केली. एआयमुळे एक गोष्ट मात्र नक्की होणार आहे ते म्हणजे शिक्षण ही कोणा एका नामवंत शाळेची, विद्यापीठाची मक्तेदारी राहणार नाही. एआयमुळे शिक्षण सोपे तर होईलच शिवाय ते परवडणारे होईल. एआयच्या साहाय्याने ग्रामीण भागातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांनाही चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळू शकेल.