Science on Wearing Shoes in House : अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे नेते व भारतीय वंशाचे उद्योजक विवेक रामास्वामी हे ओहायो राज्याच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या पाठिंब्यानंतर त्यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे. मात्र, एका जुन्या व्हिडीओवरून सध्या रामास्वामींना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अनवाणी पायांनी मुलाखत देतानाचा जुना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रामास्वामींना लक्ष्य केलं जात आहे. अमेरिकेतीतील टीकाकारांनी त्यांच्या कृतीला ‘असभ्य’ आणि ‘अमेरिकाविरोधी’ असल्याचे म्हटलं आहे. हा भारत नाही, तर अमेरिका आहे, अशा प्रतिक्रियाही काहींनी दिल्या आहेत. दरम्यान, घरात बूट घालावेत की नाही, यावर खूप दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या विषयावर विज्ञान काय सांगते, ते जाणून घेऊ…
घरात चप्पल आणि बूट घातल्यास काय होतं?
प्राचीन काळापासून चालत आलेल्या रूढी-परंपरा पद्धती आजही प्रचलित आहेत. त्यापैकीच एक परंपरा चप्पल आणि बूट यांच्याशी संबंधित आहे. भारतातील अनेक लोक आजही घरात चप्पल किंवा बूट घालून वावरत नाहीत. त्यामागची कारणं वेगवेगळी आहेत. काही जण वास्तुशास्त्रानुसार, घरात चप्पल आणि बूट घालणं टाळतात; तर काही लोक घराबाहेरची घाण आणि जंतू घरामध्ये येऊ नये म्हणून अनवाणी पायांनी वावरणं पसंत करतात. आंतरसांस्कृतिक संवादतज्ज्ञ लुसीना अलेक्झांड्रोविच-पेडिच यांच्या मते, “घरात प्रवेश करण्यापूर्वी बूट काढण हे सार्वजनिक आणि खासगी जीवनाच्या सीमारेषा ओलांडण्याचं एक प्रतीकात्मक कृत्य आहे.”
भारतात दाराबाहेर बूट काढणं सामान्य
भारतात दाराबाहेर बूट काढणं आणि घरात चप्पल घालणं अगदी सामान्य बाब आहे. परंतु, इतर देशांतील पद्धती वेगळ्या आहेत. न्यूझीलंडमधील लोक घराबाहेर आणि घरात दोन्ही ठिकाणी अनवाणी राहणंच पसंत करतात; तर जर्मन लोक बाहेर वापरलेले बूट कधीही घरात घालत नाहीत. त्याऐवजी ते घरात वापरण्यासाठी दुसरे बूट विकत घेतात. विशेष म्हणजे घरात बूट घालावेत की नाहीत याबाबत अमेरिकेतील लोकांमध्ये विविध मतांतरं आहेत. तेथील तज्ज्ञांमध्येही या विषयावरून मतभेद आहेत.
आणखी वाचा : Egg Shortage 2025 : रेंट-द-चिकन म्हणजे काय? अमेरिकेत अंड्यांचा तुटवडा का निर्माण झाला?
“अमेरिकेतील कोणतीही व्यक्ती नेहमीच लादी वा फरशीवर अनवाणी पायांनी चालत नाही. मऊ गवताळ जमीन किंवा समुद्रकिनाऱ्यावर चालणं आणि अभियांत्रिक पद्धतीनं तयार केलेल्या फरशीवर चालणं यामध्ये मोठा फरक आहे”, असं ‘Mid-Atlantic Foot and Ankle Specialists’ या संस्थेच्या चिकित्सक (podiatrist) डॉ. प्रिया पार्थसारथी यांनी TIME Magazine ला सांगितले. एकीकडे शिष्टाचार तज्ज्ञांचं या विषयावर अजूनही एकमत नाही, तर दुसरीकडे शास्त्रज्ञांनी असे पुरावे गोळा केले आहेत, जे सूचित करतात की, बुटाला चिकटून अवांछित घाण घरात येते. मात्र, त्या घाणीमुळे मानवी आरोग्याला नेमका किती धोका आहे याची अद्यापही स्पष्टता नाही.
विज्ञानानुसार, घरात बूट का घालू नयेत?
२०२३ च्या विश्लेषणातून असे दिसून आले की, घरामध्ये अर्ध्याहून अधिक धुळीचे कण बाहेरून येतात. संशोधकांनी असा इशारा दिला आहे की, शिशापासून ते विष्ठेपर्यंतची सर्व काही घाण बुटाला चिकटून घरात येऊ शकते.”बागेतील मातीच्या तुलनेत, घरातील धुळीत बहुतांश घटकांचे प्रमाण अधिक असते,” असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.विशेषतः कार्पेट्समध्ये बाहेरील घाण अडकण्याची अधिक शक्यता असते. २०१९ मध्ये पर्यावरण तज्ज्ञांच्या एका पथकाने केलेल्या अभ्यासात नमूद केले आहे की, “कार्पेट्स हे अशा ठिकाणी असतात, जे घरातील धुळीसाठी स्रोत आणि संकलन केंद्र (सिंक) दोन्ही म्हणून काम करतात”, असे पर्यावरण तज्ज्ञांच्या एका पथकाने २०१९ च्या एका अभ्यासात म्हटले आहे.
नॅशनल जिओग्राफिकच्या अहवालानुसार, या अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे की, दूषित कार्पेट्समुळे लोकांना आरोग्य समस्या उद्भवू शकतात. मात्र, यामुळे होणाऱ्या पूर्ण आरोग्य धोक्यांचा अजून सविस्तर अभ्यास होणे बाकी आहे. दरम्यान, घरगुती दूषित पदार्थांचा अभ्यास करणाऱ्या पर्यावरण रसायनशास्त्रज्ञांच्या गटाने या चर्चेत भाग घेतला होता. त्यांनी असा निष्कर्ष काढला की, बाहेर वापरलेले बूट घरात घालून येणे हे केवळ कार्पेट्ससाठीच वाईट नाही, तर ते वैज्ञानिकदृष्ट्याही अस्वच्छ आहे.
घरात शूज घालणे अस्वच्छतेस किती कारणीभूत?
The Guardian च्या वृत्तानुसार तज्ज्ञांनी सांगितले की, घरातील जवळपास एक-तृतियांश धूळ बाहेरून येते. त्यातील बहुतांश धूळ बुटाच्या तळव्यांना चिकटून आतमध्ये येते. संशोधकांना बुटावर मोठ्या प्रमाणात सूक्ष्म जैविक रोगजंतू आढळून आले आहेत. त्यामध्ये डांबरी रस्त्यावरील अवशेषांतील कर्करोगाला आमंत्रण देणारे विषारी पदार्थ आणि हार्मोन्सचा समतोल बिघडवणारी गवतावरील रसायने असतात. त्यामुळे शूजवरील घाण तुम्हाला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावीशी वाटू शकते. अनेक संस्कृतींमध्ये घरात प्रवेश करण्यापूर्वी शूज काढणे हा एक प्रथेचा भाग मानला जातो. काहींसाठी हा फक्त अंधश्रद्धेचा विषय आहे आणि काही लोक स्वच्छता राखण्यासाठी घरात बूट घालून येणे टाळतात.
आरोग्यतज्ज्ञ घरात बूट वापरण्याबद्दल काय सांगतात?
रिफ्लेक्सोलॉजिस्ट्स असे सांगतात की, अनवाणी चालल्यानं रक्ताभिसरण सुधारतं आणि झोपेची गुणवत्ता वाढते. तसेच अनवाणी चालण्यामुळे पायांच्या तळव्यावरील दाबबिंदू सक्रिय होतात, ज्यामुळे जळजळ, शरीरातील वेदना व तणाव कमी होण्यास मदत होते. पाहुण्या मंडळींना त्यांचे बूट घराबाहेर काढण्यास प्रवृत्त करणं हे तुमच्या घरातील शिस्तीचं पालन सुनिश्चित करण्याचा एक उत्तम मार्ग असू शकतो. अॅरिझोना विद्यापीठातील पर्यावरण सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ व प्राध्यापक केली रेनॉल्ड्स यांनी Real Simple मासिकाला सांगितले की, घरातील दूषित पदार्थ हे नेहमी एका ठिकाणी राहत नाहीत. ते चुंबकासारखे असतात आणि धुळीच्या कणांना ते चिकटतात. घरातील धूळ साफ करताना हे जीवाणूयुक्त कण वायुप्रवाहात मिळतात. श्वासाद्वारे ते आपल्या शरीरात गेल्याने संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
विज्ञानानुसार घरी शूज का घालावेत?
जर तुम्ही नियमितपणे घरातील फरशी स्वच्छ ठेवत असाल, तर अधूनमधून घरात बूट घालणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. त्यामागचं कारण म्हणजे फरशीवर जास्त वेळ अनवाणी चालल्यानं तुमच्या पायांवर दबाव येऊ शकतो आणि त्यामुळे जळजळ व इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. घरातील टणक फरशी हे पाय दुखण्याच्या समस्येचं प्रमुख कारण असल्याचं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. डॉ. प्रिया पार्थसारथी यांनी टाइम या मासिकाला सांगितलं, “चुकून फर्निचरला लाथ लागल्यानं किंवा तोल जाऊन घसरून पडल्यानं बऱ्याच लोकांच्या पायांची हाडं फ्रॅक्चर झाली आहेत. मधुमेहींसाठी अशा दुखापती चिंताजनक ठरू शकतात. अनवाणी किंवा मोजे घालून चालण्यापेक्षा चप्पल घालणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. “डेट्रॉईटमधील हेन्री फोर्ड हेल्थ येथील सर्जन डॉ. निकोल ब्रुएट यांनी लोकांना बुटांच्या दोन जोड्या वापरण्याचा सल्ला दिला आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीनं घराबाहेर आणि घरात वापरण्यासाठी दोन वेगवेगळे बूट जोड ठेवायला हवेत; जेणेकरून बाहेरची घाण घरामध्ये येणार नाही.
विवेक रामास्वामींच्या कृतीमुळे वादविवाद
साधारणत: एक वर्षापूर्वी विवेक रामास्वामी यांनी अमेरिकन वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ही मुलाखत रामास्वामी यांच्या घरातच घेण्यात आली होती. मुलाखतीच्या वेळी रामास्वामी यांनी पायांत बूट घातलेले नव्हते. त्यावरून अमेरिकेतील लोकांनी सोशल मीडियावर रामास्वामींना ट्रोल करण्यास सुरुवात केली. “विवेक हे कधीही ओहायोचे गव्हर्नर होणार नाहीत. हे अमेरिकेसाठी अस्वीकार्य आहे”, अशी प्रतिक्रिया एका अमेरिकन व्यक्तीने दिली. काही टीकाकारांनी त्यांची कृती ‘असभ्य’ आणि ‘अमेरिकाविरोधी’ असल्याचं म्हटलं. दरम्यान, समालोचक इयान माइल्स चेओंग हे रामास्वामींच्या मदतीला धावून आले. त्यांनी रामास्वामी यांच्यावरील टीका “सर्वांत मूर्ख युक्तिवाद” आहे, अशी कानउघाडणी केली. “घरात अनवाणी चालणं हे अजिबात अमेरिकाविरोधी नाही,” असं चेओंग यांनी स्पष्ट केलं.