Can We Hear Anything In Sleep: हा प्रसंग तुम्ही अनुभवला आहे का? कुणीतरी आपल्या बाजूला फार मोठमोठ्याने बोलत असतं आणि आपण त्यांना म्हंटल की जरा हळू बोल तर ते वर आपल्यालाच सांगतात की तू तुझे कान बंद कर.. अगदी ऑफिसमध्ये शक्य नसेल तरी घरी भावंडांमध्ये, मित्रांमध्ये मस्करीत हा युक्तिवाद आपण ऐकलाच असेल. पण खरंच आपण आपले कान बंद करू शकतो का? किंवा ज्यात आपल्याला आजूबाजूला घडणारं काहीच ऐकू येणार नाही निदान अशी कोणती स्थिती आहे का? गंमत बघा, जर आपल्याला एखादं दृश्य बघायचं नसेल तर आपण डोळे बंद करतो आपल्याला काहीच दिसत नाही. शांत राहायचं असेल तर तोंड बंद करतो पण कानांच्या बाबत असं घडत नाही.
झोपेत कान बंद होतात का?
कान बंद करायचे म्हणजे फार तर आपण कानात कापूस घालतो पण त्यानेही तुम्हाला काहीच आवाज येणार नाही असं होत नाही. काही न ऐकण्याचे नियंत्रण हे केवळ आपल्या मेंदूकडे असते. जेव्हा आपले शरीर अत्यंत गाढ झोपेत असते तेव्हाच मेंदू आजूबाजूच्या आवाजांना, हालचाली व वासाला फिल्टर करून आपल्याला जाणीव होऊ देत नाही. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की म्हणजे आपण झोपेत असताना कान काम करत नाहीत का? तर असं नाही. आपल्या कानाचे काम दिवसाचे २४ तास सुरु असते. अगदी तुम्ही झोपेत असतानाही कान आजूबाजूचे आवाज ऐकून तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचवतात पण इथे मेंदू तुमचा नियंत्रक असतो. महत्त्वाची एखादी गोष्ट वगळल्यास तो इतर आवाजांवर प्रतिक्रिया देण्यासाठी तुमच्या अन्य अवयवांना संकेत देत नाही.
झोपेत कुठलाच आवाज येत नाही का?
आता दुसरा मुख्य मुद्दा म्हणजे समजा एखादा मोठा आवाज झाला किंवा अगदी तुमच्या घड्याळाचा गजर झाला तर अशावेळी आवाज कसा येतो? तर जेव्हा तुम्ही जागे असता तेव्हा काही आवाजांवर तुमची प्रतिक्रिया ही मेंदूमध्ये रेकॉर्ड होत असते. अशाच प्रकारचा ओळखीचा आवाज आल्यावर तुमची ती प्रतिक्रिया आठवून मेंदू त्याच अवयवांना संकेत देतो. तसेच जेव्हा तुमचे शरीर कुठल्यातरी संभाव्य धोक्यात येणार असते तेव्हाही सतर्क होऊन मेंदू आवाज ऐकून इतर अवयवांना जागे करतो.
हे ही वाचा<< विश्लेषण: भारतात Sperm Donor कोण होऊ शकतं? १० सर्वात महत्त्वाचे निकष जाणून घ्या
गाढ झोप कशी येते?
दरम्यान झोपेबाबत विज्ञानाने अनेक उलगडे केले आहेत. यातील एक गाढ झोप व हलकी झोप. अगदी बारकाईने पाहिल्यास तुम्हाला या दोन्ही स्थितीतील फरक जाणवेल. तुम्हाला झोपेत असतानाही आजूबाजूच्या हालचाली जाणवतात, आवाज येतात पण तुम्ही त्यावर प्रतिक्रिया देत नाही. तुम्हाला जाग आल्यावर पुन्हा या हालचाली व आवाज लक्षातही असतात तर अशावेळी आपण हलक्या झोपेत असता. तर दुसरीकडे जेव्हा तुम्हाला कुठलाच आवाज व हालचाल आठवत नाही तेव्हा तुमचे शरीर गाढ झोपलेले असते.