जगभरात चीजचे विविध प्रकार प्रसिद्ध आहेत. सध्याच्या घडीला चीज चाखलेच नाही अशी व्यक्ती सापडणे तशी विरळच. आपल्याकडे गेल्या शतकापासून मोठी प्रसिद्धी मिळालेल्या चीजची निर्मिती हजारो वर्षांपूर्वी पासून केली जाते. खरे तर चीजची निर्मिती युरोपमध्येच मोठ्या प्रमाणात होत असताना, त्याचे मूळ मात्र चीनमध्ये असल्याचे आढळून आले आहे. हा पुरावा काय, चीज निर्मिती किती जुनी आहे याविषयी…

३६०० वर्षांपूर्वीच्या चीजचे पुरावे…

दोन दशकांपूर्वी शिओहे लोकांचे ममी केलेले अवशेष पश्चिम चीनमधील शिनजियांगमधील वाळवंटात सापडले. ते अवशेष एका तरुणीचे असून ते सुमारे ३,६०० वर्षांपूर्वी शवपेटीत जतन करून ठेवण्यात आले होते. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी ती उघडून अभ्यास केला असता तरुणीच्या गळ्यातील दागिन्यांजवळ एक विचित्र पदार्थ त्यांना सापडला. उल्लेखनीय म्हणजे, ते चीज असल्याचे त्यांना आढळले. ‘संशोधकांचा विश्वास आहे की, हे आतापर्यंतचे सर्वात जुने ज्ञात चीज आहे’, असा अहवाल याबाबत ‘लाइव्ह सायन्स’ने दिला आहे.

सापडलेल्या अवशेषांतून काय लक्षात येते?

२००३ मध्ये आढळलेली कांस्ययुगीन शवपेटी झियाओहे स्मशानभूमीच्या उत्खननादरम्यान सापडली. तारिम बेसिन वाळवंटातील रखरखीत हवामानामुळे, तरुणीची शवपेटी अद्याप सुस्थितीत होती. त्यामुळे तरुणीचे बूट, टोपी आणि तिच्या शरीराजवळ सापडलेले चीज याचे योग्य पद्धतीने जतन झाले होते. प्राचीन दफन पद्धतींमध्ये, महत्त्वाच्या वस्तू मृत व्यक्तीच्या बाजूला ठेवल्या जात होत्या. शवपेटीतील तरुणीजवळ आढळलेले केफिर चीज सूचित करते, की चीज त्या काळात दैनंदिन जीवनातील महत्त्वपूर्ण हिस्सा होते.

पशुपालन संस्कृतीवर प्रकाश?

बीजिंगमधील चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसचे पॅलिओजेनेटिक शास्त्रज्ञ आणि ‘सेल’ जर्नलमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात म्हटले आहे की, नियमित चीज मऊ असते. मात्र, शवपेटीतील तरुणीजवळ आढलेले चीज सुकले आहे. ते घट्ट, कडक असून त्याची पावडर बनली आहे. त्या चीजचे ‘डीएनए’ विश्लेषण झिओहे लोकांच्या जीवनावर प्रकाश टाकते. हे लोक आताच्या शिनजियांगमध्ये राहत होते. चीजचे डीएनए विश्लेषण झिओहे लोकांनी पाळलेल्या सस्तन प्राण्यांवर आणि पूर्व आशियातील पशुपालनाच्या संस्कृतीवरदेखील प्रकाश टाकते. यात कांस्ययुगातील समृद्ध संस्कृती दिसून येते. या संस्कृतीत इतर समाजातील लोकांबरोबर प्राण्यांची देवाणघेवाण केली जात असावी. त्यातूनच पूर्व आशियामध्ये चीजची निर्मिती करण्यास मदत केली असावी असा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे.

चीजच्या विश्लेषणात आणखी काय?

शास्त्रज्ञांच्या गटाने झियाओहे स्मशानभूमीतील अन्य तीन थडग्यांमधूनही काही नमुने गोळा केले. त्यातील डीएनएचे विश्लेषण करत हजारो वर्षांपासून चीज बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जीवाणूंच्या उत्क्रांतीचा शोध घेतला. तेव्हा त्यांना ते केफिर चीज असल्याचे लक्षात आले. तसेच ते चीज शेळी आणि गायीच्या दुधापासून बनवले असल्याचेही आढळून आले. पाश्चरायझेशन आणि रेफ्रिजरेशन पद्धतींच्या शोधापूर्वी शिओहे लोक, जे आनुवंशिकदृष्ट्या लॅक्टोज सेवनाबाबत संवेदनशील असूनही, दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कसे करत होते याचादेखील या अभ्यास करण्यात आला. चीज उत्पादन करताना किण्वन प्रक्रियेत लॅक्टोज पातळी कमी होत असल्याने शिओहे लोक त्यांच्या आहारात चीजचा वापर करू शकले असावेत, असेही या अभ्यासात म्हटले आहे.