भारतात काही उपकरणांच्या वापरावर बंदी आहे आणि ही उपकरणे कोणत्या नागरिकाजवळ आढळल्यास अटक होऊ शकते. अशाच एका प्रकरणात गुरुवारी स्कॉटलंडच्या एका महिलेला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. कारण- या महिलेजवळ भारतात बंदी असलेले एक जीपीएस उपकरण आढळून आले. हीथर नावाची ही महिला गिर्यारोहक आहे, जी स्कॉटिश आहे. हिथरने तिचा अनुभव तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आणि सहप्रवाशांना सॅटेलाइट कम्युनिकेटर किंवा गार्मिन इनरिच यांसारखी उपकरणे भारतात आणू नयेत, असा सल्ला दिला. कारण- भारतात ही उपकरणे बेकायदा मानली जातात. भारतात या जीपीएस उपकरणांवर बंदी का आहे? काय आहे गार्मिन इनरिच आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो? त्याविषयी जाणून घेऊ.
नक्की काय घडले?
हीथर हृषिकेशला जात असताना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षा यंत्रणेकडून तिला गार्मिन इनरिच हे जीपीएस उपकरण घेऊन जात असताना ताब्यात घेतले. इन्स्टाग्रामवर हीथरने स्पष्ट केले की, सकाळी १०.३० वाजता मी हृषिकेशला जाण्यासाठी फ्लाइट घेण्याच्या उद्देशाने दिल्ली विमानतळावर सुरक्षा प्रक्रियेतून जात होते. स्कॅन करण्यासाठी इतर वस्तूंसह कोणत्याही भीतीशिवाय मी माझे गार्मिन इनरिच ट्रेमध्ये ठेवले आणि त्या क्षणी मला सुरक्षा यंत्रणेने तातडीने बाजूला घेतले आणि थांबण्यास सांगितले. ती म्हणाली की, प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, तिला सांगण्यात आले की, ‘गार्मिनवर भारतात बंदी घालण्यात आली आहे आणि ते मला पोलिसांच्या ताब्यात देत आहेत. “शेवटी मला पोलिस ठाण्यामध्ये नेण्यात आले, जिथे माझी खूप मैत्रीपूर्ण पद्धतीने चौकशी करण्यात आली आणि कागदपत्रांवर सही करायला सांगण्यात आले. मी ‘नो कमेंट’ अशी भूमिका घेतली नाही. प्रामाणिक असणे हा माझा स्वभाव आहे आणि शेवटी, माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता,” असेही तिने सांगितले.
रात्री ९ च्या सुमारास तिला पोलिसांनी सोडल्याचा दावा हीथरने केला. अनेक तास तिला ताब्यात ठेवल्यानंतर, परंतु तिला सांगण्यात आले की, तिला न्यायालयात हजर राहावे लागेल. “या कायद्याला बळी पडलेली मी एकमेव व्यक्ती नाही. म्हणूनच मला हr पोस्ट लिहिण्यास भाग पाडले आहे,” असे तिने सांगितले. डिसेंबरमध्ये भारतात अशाच प्रकारचे उपकरण बाळगल्याबद्दल अटक केलेल्या कॅनेडियन धावपटूचा समावेश असलेल्या अलीकडील प्रकरणाचा संदर्भही तिने आपल्या पोस्टमध्ये दिला. तिने सांगितले की, तिने दूतावासाला कॉलदेखील केला; परंतु त्यांनी तिला सांगितले की, ते काहीही करू शकत नाहीत. कारण- तिचे प्रकरण भारतीय कायद्याच्या अंतर्गत आहे. तिला ताब्यात घेत असताना पोलिसांनी तिला पाणी देण्यास नकार दिल्याचेही हीथरने सांगितले. ही स्कॉटिश गिर्यारोहक म्हणाली की, ती अटकेमुळे निराश झाली. “परिणाम काय होईल ते मला माहीत नाही. मला वाटते की, मला फक्त प्रतीक्षा करावी लागेल,” असे ती म्हणाली.
‘गार्मिन इनरिच’ म्हणजे काय?
गार्मिन इनरिच हे स्विस-आधारित लोकप्रिय जीपीएस आणि सॅटेलाइट मेसेजिंग डिव्हाइस आहे जे सहसा बॅकपॅकर्स आणि गिर्यारोहक वापरतात. कंपनीच्या वेबसाइटने भारताचा समावेश १४ देशांपैकी एक म्हणून केला आहे, ज्यांनी या उपकरणावर बंदी घातली आहे. इतर राष्ट्रे जेथे या उपकरणावर बंदी घालण्यात आली आहे, त्यात अफगाणिस्तान, युक्रेनियन क्रिमिया, क्युबा, जॉर्जिया, इराण, उत्तर कोरिया, म्यानमार, सुदान, सीरिया, थायलंड, व्हिएतनाम, चीन व रशिया या देशांचा समावेश आहे. आधुनिक सेलफोनमध्ये थेट उपग्रह संप्रेषणाची वैशिष्ट्ये अधिकाधिक सामान्य होत आहेत. अॅपलच्या आयफोनच्या नवीन आवृत्त्या सॅटेलाइट कनेक्शनचा वापर करू शकतात. उपग्रह संप्रेषणाद्वारे आयफोन वापरकर्ते आपत्कालीन संपर्कात राहू शकतात, त्यांचे स्थान सामायिक करू शकतात आणि सेल्युलर किंवा वाय-फाय कनेक्टिव्हिटीशिवाय आपत्कालीन सेवांना संदेश पाठवू शकतात.
भारतात यावर बंदी का?
१८८५ च्या भारतीय टेलिग्राफ कायदा आणि १९३३ च्या वायरलेस टेलिग्राफी कायद्यानुसार उपग्रह संप्रेषणावर बंदी घालण्यात आली आहे. या जुन्या नियमांना २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी बळकटी देण्यात आली; ज्यामध्ये एका दहशतवादी गटाने बॉम्बस्फोट आणि गोळीबाराची योजना आखण्यासाठी उपग्रह कम्युनिकेटरचा वापर केला होता, ज्यामुळे अनेकांचा जीव गेला. ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, सुरक्षा धोके आणि बेकायदा पाळत ठेवण्यासाठी फोन आणि इतर संप्रेषण उपकरणे यांसारख्या उपग्रह संप्रेषण तंत्रज्ञानाच्या बेकायदा वापरावर भारताने बंदी घातली आहे. ही उपकरणे संभाव्य धोकादायक किंवा बेकायदा क्रियाकलापांसाठी वापरली जाऊ शकतात; जसे की तस्करी, हेरगिरी किंवा संवेदनशील ठिकाणी संप्रेषण निर्बंध घालणे.
उपकरणाच्या वापरामुळे झालेल्या कारवाया
६ डिसेंबर रोजी गोव्यातील दाबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका कॅनेडियन महिलेला ताब्यात घेण्यात आले होते. टीना लुईस गार्मिन हे जीपीएस उपकरण घेऊन कोचीला जात होती. तिने स्कॅनिंग ट्रेमध्ये यंत्र ठेवल्यानंतर सुरक्षेने तिची चौकशी केली आणि त्यानंतर सशस्त्र रक्षकांनी तिला लाइनमधून बाहेर नेले. या ५१ वर्षीय महिलेला चार तास ताब्यात ठेवण्यात आले आणि डिव्हाइसबद्दल चौकशी करण्यात आली. त्यानंतर तिला ११ डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला; परंतु, तिला जामीन आणि कायदेशीर शुल्क म्हणून २,००० डॉलर्सपेक्षा जास्त पैसे भरावे लागले.
हेही वाचा : करोनानंतर चीनमध्ये नव्या व्हायरसचा हाहाकार; ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस काय आहे? याचा भारताला धोका किती?
‘पीटीआय’ने दिलेल्या माहितीनुसार, अशाच आणखी एका घटनेत ९ डिसेंबर रोजी एका नागरिकावर गार्मिन एज ५४० जीपीएस उपकरण बाळगल्याप्रकरणी गोव्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उत्तर गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे प्रतिबंधित उपकरण आढळून आले. मार्टिन पोलेस्नी याच्यावर आरोप ठेवण्यात आले होते आणि १९३३ च्या भारतीय वायरलेस टेलिग्राफी कायद्यांतर्गत गोवा पोलिसांसमोर हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. त्याच कारणास्तव, एका महिन्यापूर्वी चेन्नई विमानतळावर आणखी एका अमेरिकन नागरिकाला अटक करण्यात आली होती.