The Mystery of Egypt’s Screaming Mummy: इजिप्त म्हटलं की डोळ्यासमोर जे चित्र उभे राहते ते म्हणजे मोठं मोठाल्या पिरॅमिड्सचे आणि त्याभोवती असणाऱ्या गूढतेचे. याच गूढ, गहन इतिहासाचा शोध घेण्यासाठी अभ्यासक नेहमीच उत्सुक असतात, तर या पिरॅमिड्सच्या आत नेमके कोणते रहस्य दडलेले आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा प्रत्येक इतिहासप्रेमीमध्ये असते. याच हजारो वर्षांच्या रहस्याच्या पेटाऱ्यात आणखी एक भर पडली ती १९३५ साली उघडकीस आलेल्या ओरडणाऱ्या बाईची. या बाईच्या शोधाने अभ्यासक चक्रावून गेले होते. त्या बाईच्या चेहऱ्यावरील वेदना, तोंडातून बाहेर पडणाऱ्या किंकाळीने कदाचित शोधकर्त्यांच्या हृदयाचा देखील ठोका चुकवला असेल. म्हणूनच तिच्या या वेदनेमागे नक्की कारण काय होते, याचा ठाव घेण्याचा प्रयत्न नेहमीच अभ्यासक करत होते. अलीकडेच नव्या संशोधनाच्या माध्यमातून या बाईच्या अवस्थेमागे नेमके काय कारण असू शकते यावर प्रकाश टाकण्यात आला, त्याच संशोधनाचा घेतलेला हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इजिप्तमधील ओरडणाऱ्या या बाईचे थडगे इजिप्तमधील लक्सरजवळील डेअर एल-बहारी येथे सेनमुतच्या थडग्याजवळ सापडले. नंतर तिला कायरो येथील इजिप्शियन म्युझियममध्ये ठेवण्यात आले. सेनमुत हा राणी हत्शेपसुत हिच्या कारकिर्दीतील एक प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ होता. हत्शेपसुत ही प्राचीन इजिप्तमधील सर्वात प्रभावशाली महिला शासकांपैकी एक होती. त्यामुळे ही ओरडणारी ममी सेनमुतची नातेवाईक किंवा त्याच्या जवळचा संबंध असलेली व्यक्ती असावी अशी शक्यता अभ्यासक व्यक्त करतात.

मृत्यूबद्दल अनेक वेगवेगळे सिद्धांत

ही ममी तिच्या पूर्णपणे उघडलेल्या तोंडामुळे ओरडणारी स्त्री किंवा किंचाळणारी स्त्री म्हणून ओळखली जाते. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव किंचाळत असल्यासारखे दिसतात. या भीषण आणि गूढ भावनेमुळे तिच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले. या महिलेचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असावा, अशी शक्यता काही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. विषामुळे स्नायूंमध्ये कडकपणा येऊ शकतो किंवा त्यांचे आकुंचन होऊ शकते. त्यामुळे तिचे तोंड उघडे राहिले असावे. शिवाय तिच्या शरीरावर कोणत्याही शारीरिक जखमेचे पुरावे नाहीत.

बळी की, तत्काळ मृत्यू?

प्राचीन इजिप्तमध्ये राजकीय कटात विषबाधेचा वापर केला जात असे. म्हणूनच तिच्या मृत्यूसाठी ही शक्यता व्यक्त करण्यात आली. काही संशोधकांनी या स्त्रीचा धार्मिक विधीत बळी दिलेला असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली. प्राचीन इजिप्तमध्ये काही थडग्यांमध्ये मानवी बळीचे पुरावे सापडले आहेत. तिच्या दफन प्रक्रियेत काही असामान्य पद्धती आढळल्या आहेत. काही वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की तिचे उघडे तोंड ममीकरण प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे झाले असावे किंवा ती तत्काळ मृत्यू होणाऱ्या एखाद्या आजाराने बहुदा मेंदूज्वर (Meningitis) किंवा धनुर्वाताने (Tetanus) मरण पावली असावी.

नवीन संशोधन काय सांगते?

कायरो विद्यापीठाच्या रेडिओलॉजीच्या प्राध्यापिका साहर सलीम यांच्या नेतृत्वाखाली अलीकडेच पार पडलेल्या संशोधनात या ओरडणाऱ्या स्त्री ममीबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या संशोधनात सीटी स्कॅनच्या मदतीने आभासी विच्छेदन करण्यात आले. या विश्लेषणातून सुमारे ४८ वर्षांच्या असलेल्या या स्त्रीचे मृत्युसमयी स्नायू आकुंचन झाले असावेत, (cadaveric spasm) असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. ही स्थिती मृत्युसमयी तत्काळ उद्भवते आणि या स्थितीमुळे तिच्या चेहऱ्यावर वेदनेचे भाव कायम राहिलेले असण्याची शक्यता आहे.

वैज्ञानिक तपासणी आणि मृत्यूचे कारण

अलीकडील वैज्ञानिक संशोधनात सीटी स्कॅन करून तिचे आभासी विच्छेदन (virtual dissection) करण्यात आले. या तपासणीत असे आढळून आले की, तिला मृत्युसमयी अतिशय वेदनादायक स्थिती अनुभवावी लागली असावी. ती कॅडव्हेरिक स्पॅझम (cadaveric spasm) नावाच्या दुर्मिळ अवस्थेने ग्रस्त होती. या अवस्थेत मृत्यूसमयी स्नायू अचानक घट्ट होतात. तिच्या पूर्णपणे उघडलेल्या तोंडाचा भाव कदाचित अचानक आणि वेदनादायक मृत्यूमुळे निर्माण झाला असेल. काही संशोधक विषबाधा किंवा शारीरिक आघात देखील तिच्या मृत्यूची संभाव्य कारणे असू शकतात, असे मानतात.

या ममीचे जतन कसे करण्यात आले?

त्या महिलेच्या पाठीच्या कण्याला सौम्य संधिवात होता आणि तिचे काही दात पडले होते असे परीक्षणातून असे उघड झाले आहे. तिचे शरीर चांगल्या स्थितीत जतन करण्यात आले होते. सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी प्राचीन इजिप्तच्या नव्या राज्यकालात (New Kingdom) तिला जंबू तेल आणि लोभानाच्या राळेसारख्या महागड्या आयात केलेल्या पदार्थांचा वापर करून संरक्षित (एम्बॉम) करण्यात आले होते. पारंपरिक ममीकरण पद्धतींप्रमाणेच तिच्या शरीरातील अंतर्गत अवयव काढण्यात आले असले तरी हृदय मात्र तसेच होते. “प्राचीन इजिप्तमध्ये ममीकरण करणारे कारागीर मृतदेहाचे काळजीपूर्वक संवर्धन करत असत. जेणेकरून मृत्यूनंतरचे जीवन सुंदर असावे अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच ते मृताच्या तोंडाला बंद ठेवण्यासाठी जबडा डोक्याला बांधत असत जेणेकरून मृत्यूनंतर जबडा खाली पडण्यापासून रोखता येई,” असे सलीम यांनी सांगितले.

स्नायू आकुंचनाची कारणे

ममीकरणासाठी वापरलेल्या उच्च प्रतीच्या वस्तूंमध्ये दोन सोन्या-चांदीच्या अंगठ्या आणि खजुराच्या झाडाच्या तंतूपासून तयार केलेला लांब केसांचा विग समाविष्ट होता. त्यामुळे या महिलेच्या उघड्या तोंडासाठी निष्काळजीपणा किंवा तोंड बंद करण्याकडे दुर्लक्ष केल्याची शक्यता फेटाळली गेली आहे. त्यामुळे संशोधकांनी तोंड इतके मोठे उघडे राहण्याची इतर कारणे विचारात घेतली. ती स्त्री मृत्युसमयी तीव्र वेदनांमुळे किंचाळत असेल किंवा मृत्यूनंतर स्नायू आकुंचन (cadaveric spasm) झाल्यामुळे तिच्या चेहऱ्याचे स्नायू ताठर झाले असतील अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली असेल.

स्त्री नेमकी कोण होती?

ओरडणाऱ्या स्त्रीची ममी एका लाकडी शवपेटीमध्ये आढळली. तिचे शरीर उच्चपदस्थ अधिकारी सेनमुतच्या कुटुंबीयांच्या थडग्याच्या खाली असलेल्या समाधी कक्षात ठेवण्यात आले होते. सेनमुत हा राणी हत्शेपसुतचा वास्तुशास्त्रज्ञ, राजकीय प्रकल्पांचा प्रमुख आणि कथित प्रियकरही होता. या महिलेची ओळख अज्ञात राहिलेली असली तरी तिच्या दागिन्यांवरून ती उच्च सामाजिक आणि आर्थिक स्तराची कल्पना येते आणि कदाचित सेनमुतच्या कुटुंबातील जवळची सदस्य असण्याची शक्यता आहे. अभ्यासातून या महिलेच्या विगविषयीही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. तिच्या विगमध्ये सर्पिल वेण्यांचा समावेश होता. ज्यांना खनिज पदार्थांनी कठीण करून तरुणपणाचे प्रतीक दर्शवणारा काळा रंग देण्यात आला होता. तिचे नैसर्गिक केस मेंदी आणि जंबू तेलाने रंगवलेले होते. तिच्या मृत्यूचे नेमके कारण निश्चित करता आलेले नसले तरी या संशोधनाने या रहस्यमय प्राचीन इजिप्शियन ममीच्या जीवन आणि मृत्यूविषयी मौल्यवान माहिती प्रदान केली आहे.

भविष्यातील शक्यता

प्राचीन इजिप्शियन संस्कृतीतील या रहस्यमय ममीमागील सत्य अलीकडच्या वैज्ञानिक संशोधनामुळे समोर आले आहे. तिच्या उघड्या तोंडामागे कॅडव्हेरिक स्पॅझम, विषबाधा, अकाली मृत्यू किंवा धार्मिक बळी असे अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत. मात्र, नवीन संशोधनामुळे तिच्या मृत्यूच्या कारणावर नव्याने प्रकाश टाकण्यात आला आहे. ही ममी प्राचीन इजिप्शियन संस्कृतीतील ममीकरणाची समृद्ध परंपरा आणि त्यामागील धार्मिक विश्वासांची साक्ष देते. तरीही, तिच्या मृत्यूबद्दलच्या सर्व गोष्टी अद्याप स्पष्ट नाहीत. भविष्यातील संशोधनातून आणखी रहस्ये उलगडू शकतात. परंतु आतातरी ही किंचाळणारी स्त्री प्राचीन इजिप्तच्या इतिहासातील एक रहस्यमय आणि वेदनादायक कथा होऊन मागे राहिली आहे.