सध्या उत्तर प्रदेशमधील प्रशासकीय अधिकारी ज्योती मौर्य सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहेत. पती आलोक मौर्य यांनी ज्योती यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. ज्योती यांनी पती-पत्नीच्या नात्यामधील विश्वासार्हता गमावली आहे. तसेच मोठ्या पदावर गेल्यानंतर ज्योती यांनी मला धोका दिला आहे, असा दावा आलोक यांनी केला आहे. आलोक यांच्या या आरोपानंतर ज्योती यांच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्योती मौर्य आणि आलोक मौर्य यांच्यातील वाद काय आहे? आलोक यांनी ज्योती यांच्यावर काय आरोप केले आहेत? या आरोपांवर ज्योती यांनी काय स्पष्टीकरण दिले आहे? हे जाणून घेऊ या ….
नेमके प्रकरण काय?
ज्यौती मौर्य या उत्तर प्रदेशमधील बरेली येथे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) या पदावर कार्यरत आहेत. जून महिन्यात त्यांचे पती आलोक मौर्य वृत्तवाहिन्यांसमोर रडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून ज्योती मौर्य देशभरात चांगल्याच चर्चेत आहेत. आलोक यांनी त्यांच्या पत्नीचे अन्य व्यक्तीशी प्रेमसंबंध आहेत, असा दावा केला आहे. तसेच शासकीय नोकरी लागल्यानंतर ज्योती मौर्य मला टाळत आहेत, असा आरोपही आलोक यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार- आलोक मौर्य हे उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथे पंचायतराज विभागात चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचारी आहेत.
ज्योती मौर्य यांना अभ्यासासाठी केली आर्थिक मदत
ज्योती मौर्य या मूळच्या वाराणसीच्या आहेत. त्यांचा आलोक यांच्याशी २०१० मध्ये विवाह झाला होता. २०१५ साली या दोघांना दोन जुळ्या मुली झाल्या. आलोक यांच्या दाव्यानुसार त्यांनी ज्योती मौर्य यांना अभ्यास करण्यासाठी प्रेरित केले आणि त्या काळात त्यांना आर्थिक मदतही केली. पत्नी शासकीय अधिकारी व्हावी म्हणून त्यांनी ज्योती मौर्य यांना पाठिंबा दिला. दुसरीकडे ज्यौती मौर्य यांनीदेखील संधीचे सोने करीत उत्तर प्रदेश राज्य लोकसेवा आयोगात १५ वा क्रमांक मिळवीत शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले.
आलोक मौर्य यांचे ज्योती मौर्य यांच्यावर गंभीर आरोप
मात्र, काही वर्षांपासून या दोघांमध्ये वाद होऊ लागले. दोघांच्या नात्यात कटुता निर्माण झाली. आलोक मौर्य यांनी ज्योती मौर्य यांचे होमगार्ड कमांडंट मनीष दुबे यांच्याशी प्रेमसंबंध आहेत, असा आरोप केला आहे. २०२० साली मी, मनीष आणि की माझ्या पत्नीला हॉटेलमधून बाहेर पडताना पाहिले होते, असा दावा आलोक यांनी केला आहे. तसेच ज्योती आणि मनीष मला मारण्यासाठी कट रचत आहेत. माझ्याकडे या दोघांचा व्हॉट्सॲपवरील संवाद आहे, असा दावा आलोक यांनी केला आहे.
ज्योती मौर्य भ्रष्टाचार करायच्या?
विशेष म्हणजे ज्योती मौर्य यांनी भ्रष्टाचार केल्याचाही आरोप आलोक यांनी केला आहे. ज्योती मौर्य भ्रष्टाचारातून मिळवलेल्या पैशाचा हिशोब एका डायरीत लिहायच्या. ती डायरी माझ्याकडे आहे, असे आलोक मौर्य यांनी माध्यमांना सांगितले.
आलोक यांच्या आरोपांवर ज्योती मौर्य यांचे मत काय?
ज्योती मौर्य यांनी आलोक यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. २०१९ साली माझ्याशी लग्न करताना आलोक, तसेच त्यांचे कुटुंबीय खोटं बोलले. आलोक मौर्य हे ग्रामपंचायतीमध्ये अधिकारी असल्याचं मला सांगण्यात आलं होतं; मात्र आलोक मौर्य प्रत्यक्षात सफाई कर्मचारी होते. लग्न झाल्यानंतर मला हे सत्य समजलं. आमच्या लग्नपत्रिकेवरही आलोक यांच्या शासकीय नोकरीतील कथित पदाचा उल्लेख करण्यात आला होता. ज्योती मौर्य यांच्या वडिलांनीदेखील या आरोपाला दुजोरा दिला आहे. आलोक यांचं कुटुंब अप्रामाणिक आहे. लग्न लावताना ते आमच्याशी खोटं बोलले, असा दावा ज्योती मौर्य यांच्या वडिलांनी केला.
उल्लेख करण्यात आला होता. ज्योती मौर्य यांच्या वडिलांनीदेखील या आरोपाला दुजोरा दिला आहे. आलोक यांचं कुटुंब अप्रामाणिक आहे. लग्न लावताना ते आमच्याशी खोटं बोलले, असा दावा ज्योती मौर्य यांच्या वडिलांनी केला.
व्हायरल झालेली व्हॉट्सॲप चॅटिंग खोटी?
मनीष आणि माझ्यातील व्हायरल झालेली कथित व्हॉट्सॲप चॅटिंग खोटी असल्याचं ज्यौती मौर्य यांनी सांगितले आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत ज्योती यांनी आलोक यांच्याविरोधात धुमनगंज पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. “व्हॉट्सॲपवरील माझा खासगी संवाद व्हायरल केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत ज्या तरतुदी आहेत, त्या तरतुदींचा आधार घेऊन माझे पती आलोक मौर्य यांच्याविरोधात मी पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिस याबाबत तपास करतील आणि पुरावे गोळा करतील,” अशी प्रतिक्रिया ज्योती मौर्य यांनी दिली.
“आलोक मानसिक त्रास द्यायचे”
पती आलोक मौर्य यांच्यासोबत माझं सलोख्याचं नातं नव्हतं, असेदेखील ज्यौती मौर्य यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार- ज्योती मौर्य यांनी घटस्फोटासाठी अर्ज केलेला आहे. सध्या फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली जात असून, ते दुर्दैवी आहे, अशी भावना ज्यौती मौर्य यांनी व्यक्त केली आहे. आलोक मौर्य मला मानसिक त्रास द्यायचे. त्यांच्या स्वभावामुळेच आमच्यात दुरावा निर्माण झाला. लग्न करताना सरकारी नोकरी असल्याचा बनाव त्यांनी केला होता, असे ज्योती मौर्य यांनी सांगितले. या प्रकरणावर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मी माझी बाजू न्यायालयातच मांडणार आहे, असेही ज्योती मौर्य यांनी स्पष्ट केले.
प्रकरणाची अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा
दरम्यान, अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणावर काही लोकांनी गीतदेखील रचले आहे. त्यामुळे चर्चेत असलेल्या या प्रकरणाचे आगामी काळात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.