केंद्रीय मत्स्य व्यवसाय विभागाच्या पूर्व परवानगीने आता समुद्र शैवालांची आयात करता येणार आहे. सौंदर्य प्रसाधने, औषध निर्माण उद्योग आणि प्रामुख्याने पोषणमूल्य (न्यूट्रीशन) उद्योगात समुद्र शैवालांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आग्नेय आशियाई देशांत समुद्र शैवालाचा मानवी आहारात वापर केला जातो. हा निर्णय किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्या परिणामांविषयी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्र सरकारचा नेमका निर्णय काय?

केंद्र सरकारने समुद्र शैवाल आयातीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. केंद्रीय मत्स्य उत्पादन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाने समुद्र शैवालांच्या आयातीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परदेशातून उच्च गुणवत्ता आणि दर्जाची समुद्र शैवाल, समुद्र शैवालांची बीजे किंवा वर्गीकृत केलेल्या पेशींची आयात करता येणार आहे. आयात करण्यात येणाऱ्या समुद्र शैवालांच्या जाती, समुद्र शैवालांसोबत हानिकारक जंतू, रोग, किडीची आयात होऊ नये, यासाठी विलगीकरणाची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. जैवसुरक्षा आणि संभाव्य धोक्यांचा विचार करून अत्यंत काटेकोर आणि शास्त्रीय पद्धतीने परीक्षण झाल्यानंतरच समुद्र शैवालांची आयात करता येणार आहे. या बाबत स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय समितीकडे अर्ज केल्यानंतर सर्व प्रक्रिया पार पाडून चार आठवड्यात आयातीचा परवाना दिला जाणार आहे.

हेही वाचा >>>लंडनमध्ये चोरांचा हजारो टन चेडर चीजवर डल्ला! चेडर चीज म्हणजे काय? मुळात त्याची चोरी करावीशी का वाटली?

देशात शैवालांची शेती विकसित होईल?

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या किनारपट्टीवरील शेतकऱ्यांना समुद्र शैवालाची शेती करता येईल. देशाच्या मध्यवर्ती भागातही कृत्रिम जलस्रोतांमध्ये समुद्री शैवालाची शेती करणे शक्य होईल. तरीही प्रामुख्याने समुद्र किनाऱ्यावर खडकाळ भागात समुद्र शैवालाची शेती विकसित करण्याची मोठी संधी आहे. देशात सध्या पारंपरिक पद्धतीने शैवालांची शेती केली जाते. आता उच्च दर्जांची आणि विविध पोषणमूल्ये असलेल्या आयात केलेल्या शैवाल बीजांपासून लागवड करता येईल. त्यामुळे जागतिक बाजारात मागणी असलेल्या उच्च दर्जाच्या शैवालाच्या उत्पादनाला चालना मिळेल. शिवाय सध्या प्रयोगशाळांध्ये अभ्यास, संशोधनासाठीही शैवालाची आयात करता येत नव्हती. त्यामुळे संशोधनातही अडथळे येत होते. 

समुद्र शैवालांचा नेमका उपयोग काय?

सौंदर्य प्रसाधने, औषध निर्माण उद्योग आणि प्रामुख्याने पोषणमूल्य (न्यूट्रीशन) उद्योगात समुद्र शैवालांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आग्नेय आशियाई देशांत समुद्र शैवालाचा मानवी आहारात वापर केला जातो. त्यासह पोषक अन्न, औषधे, जैव इंधनासाठी, बायोमास निर्मितीसाठीही शैवालाचे उत्पादन घेतले जाते. सांडपाण्यावरही शैवाल शेती करता येते. त्यामुळे पाणीही शुद्ध होते. अलिकडे शैवाल बायोमास म्हणून जैवइंधन निर्मितीसाठी वापरणे सुरू झाले आहे. शैवालापासून बायो इथेनॉलची निर्मिती सुरू झाली आहे. क्लोरेला वुलगॅरिस या शेवाळापासून जैवइंधन, बायो इथेनॉल तयार केले जाते. शैवालाची एक वेगळी जागतिक बाजारपेठ विकसित झालेली आहे. शैवालात मानवी शरिरासाठी महत्त्वाची असलेली कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे अ, ब, क आणि ई तसेच लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, मॅंगेनिज आणि झिंक भरपूर प्रमाणात आढळतात. म्हणूनच जपान, चीन, जर्मनी, अमेरिका, स्कॉटलंड, आयर्लंड या देशांतील लोक अन्न म्हणून शैवालाचा वापर करतात. विकसित देशांत शैवाल कोंबडी खाद्यात, पशुखाद्यात, चारा म्हणूनही मोठ्या प्रमाणात वापरले जाते. आपल्याकडे दुग्ध उत्पादन वाढीसाठी  पोषक पशुखाद्य निर्मितीची गरज आहे. देशातील एकूण पशुधनाचा विचार करता शैवालांचा वापर करण्यास मोठा वाव आहे. मत्स्य शेतीसाठी शैवाल पूरक आणि पोषक आहे. माशांचे खाद्य म्हणूनही शैवालाचा वापर होतो.

हेही वाचा >>>Alexander the great’s purple tunic: ३००० वर्षे प्राचीन ‘अलेक्झांडर द ग्रेट’चा जांभळा अंगरखा अखेर सापडला; नवीन संशोधन काय सांगते?

शैवाल शेतीतून पर्यावरणाचे रक्षण होईल?

शैवाल नैसर्गिकरित्या पाण्यातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. पाण्यातील ऑक्सिजन प्रमाण वाढवण्यास मदत करते. त्यामुळे सागरी पर्यावरणाचे संवर्धन होते. शैवालांमध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर असल्यामुळे जैविक खते किंवा द्रवरूप खते म्हणूनही शैवालांचा वापर केला जातो. त्यामुळे जमिनीतील नायट्रोजनच्या पातळीत वाढ होते. जमिनीची पीएच (आम्लता) पातळी कमी करता येते. त्यामुळे शैवाल मृदा संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावतात. युग्लेना आणि क्लोरेला या सारख्या शैवालांच्या मदतीने जल प्रदूषण तपासले जाते. वाढत्या लोकसंख्येबरोबर ऊर्जेची आणि ऊर्जा स्रोतांची गरज वाढतच चालली आहे. त्यासाठीच शैवालांचा विविध प्रकारे वापर केला जावू शकतो. शैवाल कार्बन डायॉक्साईडचे ग्रहण करतात. वनस्पती प्रमाणे कार्बनचा वापर करून अन्न तयार करतात. त्यामुळे कार्बन स्थिरीकरणात शैवाल शेती मोठी भूमिका पार पाडू शकते.

मानवी अन्न, पशुखाद्यात…

शैवाल प्रथिनांचा, जीवनसत्त्वांचा आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहेत. त्यांचा थेट, सरळ अन्न म्हणून किंवा अन्नात मिसळून खाण्यासाठी उपयोग केला जातो. जपानी लोक उलवा नावाचे शैवाल सॅलड म्हणून खातात. ग्लिलारिया या शैवालाचा कोंबड्यांना चारा म्हणून खाऊ घातल्यास त्या अधिक अंडी देतात. समुद्रात मासेही शैवालावरच जगत असतात. लामिनारीया शैवालाचा वापर पशूंना चारा म्हणून होतो. स्पिरुलिना शैवाल मासे, कोंबड्या, जनावरांच्या आहारात दिल्यानंतर त्यांची उत्पादनक्षमता वाढते. समुद्रात वाढणारे प्लॅकटन शैवाल ओमेगा ३ मेदाम्लांचे (फॅटी ॲसिड) नैसर्गिक स्रोत आहेत. हा घटक शैवालाशिवाय फक्त माशांमध्येच आढळतो. अलिकडे शैवाल बायोमास म्हणून जैवइंधन निर्मितीसाठी वापरणे सुरू झाले आहे. शैवालापासून बायो इथेनॉलची निर्मिती सुरू झाली आहे. औषध उद्योग, सौंदर्य प्रसाधन उद्योगात आणि पूरक अन्न म्हणून किंवा मल्टिव्हिटॅमीनच्या गोळ्यांमध्येही शैवालांचा वापर वाढत आहे.

dattatray.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seaweed imports what is the use of the element what is the benefit of this decision of the central government print exp amy