तुमच्या ट्रेडिंग खात्यातील कोणत्याही संशयास्पद व्यवहाराबद्दल काळजी वाटत असेल तर आता तुमची समस्या दूर होणार आहे. कारण आता डेबिट आणि क्रेडिट कार्ड सारखे ट्रेडिंग खातेसुद्धा ब्लॉक करता येणार आहे. बाजार नियामक सेबीने ब्रोकरेज कंपन्यांना एक यंत्रणा तयार करण्याचे आदेश दिले आहेत, ज्याद्वारे गुंतवणूकदार त्यांच्या इच्छेनुसार ट्रेडिंग खाती गोठवू किंवा ब्लॉक करू शकतील. तसेच गुंतवणूकदार डीमॅट खात्यातील व्यवहार गोठवू शकतात. सेबीने दिलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, १ एप्रिलपर्यंत ब्रोकर्सनी इंडस्ट्री स्टँडर्ड्स फोरम (ISF) ट्रेडिंग अकाऊंट फ्रीज आणि ब्लॉक करण्यासाठी फ्रेमवर्क तयार करावे. ही संपूर्ण प्रक्रियेची अंमलबजावणी १ जुलैपर्यंत करावी, असेही नियामकाने म्हटले आहे.त्यामुळे यंदाच्या जुलैपासून गुंतवणूकदारांना कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्यांना ट्रेडिंग खाती गोठवण्याची किंवा ब्लॉक करण्याची परवानगी दिली जाणार आहे.
सेबीने काय प्रस्तावित केले?
ट्रेडिंग खातेदारांना संशयास्पद हालचालींमुळे त्यांना खात्याचा ऑनलाइन प्रवेश ऐच्छिक पद्धतीने गोठवण्याची/ब्लॉक करण्याची सुविधा प्रदान करण्यासाठी एक फ्रेमवर्क १ एप्रिल २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी तयार करावे लागेल. त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील, असंही SEBI ने घेतलेल्या निर्णयात म्हटले आहे. ब्रोकर्स इंडस्ट्री स्टँडर्ड्स फोरम (ISF) द्वारे स्टॉक एक्स्चेंजच्या नेतृत्वाखाली आणि भांडवली बाजार नियामकाशी सल्लामसलत करून सध्या सेबीने गुंतवणूकदारांना त्यांची डीमॅट खाती ऐच्छिकपणे ब्लॉक करण्याची किंवा गोठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक ब्रोकरने आपल्या ग्राहकांना या फीचरबद्दल तपशीलवार माहिती देखील दिली पाहिजे. जेणेकरून गरज असेल तेव्हा येणाऱ्या काळात त्याचा जास्तीत जास्त वापर करता येईल. अनेकदा असे घडते की, गुंतवणूकदारांना त्यांच्या ट्रेडिंग खात्यांमध्ये संशयास्पद हालचाली दिसतात. अशा परिस्थितीत एटीएम आणि क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्याची सुविधा आहे. परंतु ट्रेडिंग खाती ब्लॉक करण्याची सुविधा शक्य तितक्या लवकर सुरू करणे आवश्यक आहे, असंही SEBI ने सांगितले.
सेबी ही सुविधा का सुरू करू इच्छिते?
भारतातील स्टॉक ब्रोकिंग उद्योग हा आता कॉल आणि ट्रेड प्रकारातून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पद्धतीने चालवला जात आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार त्यांना ट्रेडिंग सदस्यांनी दिलेले लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरतात. ट्रेडिंग सदस्य हा स्टॉक एक्सचेंजचा स्टॉक ब्रोकर असतो आणि सेबीमध्ये नोंदणीकृत असतो. सदस्याला त्यांच्या खात्यावर तसेच त्यांच्या ग्राहकांच्या खात्यावर व्यापार करण्याचे अधिकार आहेत, परंतु ते हे व्यवहार स्वतःच्या मर्जीनं करू शकत नाहीत आणि सेटल करू शकत नाहीत. बऱ्याचदा संशयास्पद हालचाली गुंतवणूकदारांच्या निदर्शनास येतात, परंतु खाती गोठवण्याची/ब्लॉक करण्याची सुविधा बहुसंख्य ट्रेडिंग सदस्यांकडे उपलब्ध नसते, असेही बाजार नियामकाने सांगितले. नवीन सुविधेमुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या ट्रेडिंग खात्यातील कोणत्याही संभाव्य फसवणुकीपासून संरक्षण मिळणार आहे.
हेही वाचाः विद्यार्थी आंदोलनमुळे गुजरातमधील ‘त्यां’ची सत्ता गेली, नेमके काय घडले होते?
मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काय समाविष्ट आहे?
SEBI ने सांगितले की, मार्गदर्शक तत्त्वांमध्ये क्लायंटच्या ट्रेडिंग खात्याचा ऑनलाइन प्रवेश स्वेच्छिक गोठवणे किंवा ब्लॉक करणे यासाठी तपशीलवार धोरण तयार करावे लागणार आहे. यामध्ये अशा पद्धतींचा समावेश असेल, ज्याद्वारे क्लायंट ट्रेडिंग मेंबरला त्यांची ट्रेडिंग खाती स्वेच्छेने ब्लॉक करण्याची विनंती करू शकतो आणि तात्काळ ब्लॉकही करावे लागेल. ट्रेडिंग खाते गोठवण्याची विनंती मिळाल्यानंतर ट्रेडिंग मेंबरला करावयाची कारवाई आणि क्लायंटला ट्रेडिंग खाते पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेबद्दलही मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत.
हेही वाचाः विश्लेषण: तैवानच्या निवडणुकीत चीनचा किती हस्तक्षेप? आशियातील शांततेसाठी ही निवडणूक महत्त्वाची का?
अंमलबजावणीसाठी टाइमलाइन काय आहे?
SEBI ने स्टॉक एक्स्चेंजना ग्राहकांची ट्रेडिंग खाती ऐच्छिक गोठवण्याबाबत जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे १ जुलै २०२४ पासून ट्रेडिंग मेंबर्सद्वारे अंमलात आणली जातील, याची खात्री करण्यास सांगितले आहे. स्टॉक एक्स्चेंज हे अंमलात आणण्यासाठी ट्रेडिंग मेंबर्सकडून योग्य रिपोर्टिंगची आवश्यकता लागू करतील. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत स्टॉक एक्स्चेंजद्वारे सिस्टम आणि त्यावरील नियमातील अटी SEBI कडे सादर कराव्या लागतील. १ जुलैपासून ही प्रक्रिया सुरू केल्यानंतर स्टॉक एक्सचेंजने ३१ ऑगस्टपर्यंत वरील सुविधेबाबत नियामकाकडे अनुपालन अहवाल सादर करणे आवश्यक आहे. दुसऱ्या एका परिपत्रकात सेबीने म्हटले आहे की, स्टॉक एक्सचेंजने गुंतवणूकदारांच्या निधीवर लक्ष ठेवण्यासाठी स्टॉक ब्रोकर्सच्या सहकार्याने एक प्रणाली तयार करणे आवश्यक आहे.
ट्रेडिंग खाते म्हणजे काय?
ट्रेडिंग खाते तुम्हाला शेअर्स, ईटीएफ आणि शेअर बाजारात सूचीबद्ध इतर आर्थिक साधनांची खरेदी आणि विक्री करण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही ब्रोकरबरोबर ट्रेडिंग खाते उघडता, तेव्हा तुम्हाला एक ट्रेडिंग सॉफ्टवेअर किंवा अॅप दिले जाते ज्याचा वापर करून तुम्ही शेअर खरेदी आणि विक्री ऑर्डर देऊ शकता किंवा तुम्ही ब्रोकरला कॉल करून ऑर्डर देऊ शकता. ऑनलाइन ट्रेडिंग ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग प्लॅटफॉर्मद्वारे आर्थिक साधने खरेदी आणि विक्री करू शकता. ब्रोकर तुम्हाला मोबाइल किंवा डेस्कटॉप अॅप किंवा वेबसाइटद्वारे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म प्रदान करू शकतो.