देशाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एका दिवसात करोना लसीकरणासंदर्भातील दोन महत्वाचे निर्णय घेतलेत. दोन नव्या लसींना परवानगी देण्याबरोबरच एका अ‍ॅण्टी व्हायरल गोळीलाही परवानगी दिली आहे. मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) विभागाने करोनाच्या कोवोवॅक्स आणि कॉर्बेवॅक्स या दोन लसींना परवानगी देण्याबरोबरच अ‍ॅण्टी व्हायरल मोलनुपिरवीर (Molnupiravir) या गोळीच्या वापरालाही आप्तकालीन वापरासाठी परवानगी दिलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटरवरुन काही ट्विट करत यासंदर्भातील तपशील दिला असून देशाचं अभिनंदन केलं आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोलनुपिरवीर एक अ‍ॅण्टी व्हायरल औषध आहे. हे औषध देशातील १३ कंपन्यांकडून करोनाच्या वयस्कर रुग्णांवर उपचार करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरलं जाईल असंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय.

एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार देशातील दहा औषध कंपन्यांनी अ‍ॅण्टी व्हायरल गोळ्यांच्या क्लिनियल ट्रायल्स पूर्ण केल्या आहेत. या गोळीच्या वापराने वयस्कर रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याचं प्रमाण ३० टक्क्यांनी कमी झाल्याचं दिसून आलं आहे.

नक्की वाचा >> ओमायक्रॉनबाधितांवर या गोळ्यांचा वापर करुन केला जातोय उपचार; डॉक्टरांनीच दिली माहिती

ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या गोळीच्या वापराने रुग्णांवर उपचार करणं आणि रुग्णालयातील रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल असा अंदाज आहे. अ‍ॅण्टी व्हायरल गोळ्यांच्या मदतीने संसर्ग आटोक्यात आणण्यास मदत होणार आहे.

या निर्णयाच्या आधी या क्षेत्रातील तज्ज्ञांची बैठक सोमवारी सायंकाळी नवी दिल्ली येथे पार पडली. करोना लसींसाठी परवानगी देण्यात यावी यासाठी वेगवगेळ्या कंपन्यांनी अर्ज केले होते. तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यासंदर्भातील अर्जही या तज्ज्ञांनी पडताळून पाहिले आणि त्यानंतरच या दोन लसी आणि एका औषधाला परवानगी देण्यात आलीय.